मध्यंतरी औरंगाबादला गेले होते बहिणीकडे. त्या वेळी माझा भाचा- सिद्धेशला निवांत मूडमध्ये पोहे करताना पाहिलं आणि उडालेच. ‘बारावी आहे’ म्हणून स्वत:च्या प्रत्येक सेकंदाचं नियोजन करून ते जस्संच्या तस्सं पाळणारा सिद्धेश अभ्यासाचा इतका महत्त्वाचा वेळ बाजूला ठेवून चक्क पोहे?..
माझ्या चेहऱ्यावरच्या प्रश्नचिन्हाला पूर्णविराम देत सिद्धेश म्हणाला, ‘मावशी, अगं पोहे शिकतोय मी. तुला माहितीय की दहावीपर्यंत मला काहीच येत नव्हतं. अगदी साध्या चहासाठीपण मी आईवरच अवलंबून राहायचो. पण मागच्या वर्षी आम्ही मित्र गप्पा मारत होतो तेव्हा लक्षात आलं की समजा बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी मला बाहेर राहावं लागलं तर रोज रोज मेसचं ठरावीक चवीचं ते पानचट खाऊन माझी वाटच लागेल. त्यामुळे अधूनमधून का होईना थोडे पदार्थ यायलाच हवेत. खरं तर बारावीच्या अभ्यासाचं सॉलिड टेन्शन आहे. पण तरीही वेळात वेळ काढून दर महिन्याला एक झक्कास रेसिपी शिकतोय आईकडून. तुला माहितीय मावशी ? मी चक्क दहा पदार्थ शिकलोय आतापर्यंत. मजा यायला लागलीय शिकताना. अजूनही शिकणार आहे मी, पण आता आफ्टर द शॉर्ट ब्रेक, म्हणजेच एक्झाम के बाद !
सिद्धेशचं ते बोलणं ऐकून सुखद धक्काच बसला. एवढीशी ही मुलं, पण आपल्याला गरज पडली तर स्वयंपाक करता आला पाहिजे हे किती सहजपणे स्वीकारलंय या मुलांनी. बरं बोलताना किंवा वागताना मी मुलगा आहे, तरीही स्वयंपाक करतोय, असे कुठेही भावही नाहीत. सिद्धेशच्या पिढीचं हे असं सहज स्वीकारणं हा काळाचा परिणाम असावा नक्की. कारण असं आनंदानं स्वयंपाकघरात रमणाऱ्या तरुण वा मध्यमवयीन पुरुषांचीच नव्हे तर अगदी आजोबा पिढीतल्या पुरुषांचीही संख्या वाढताना दिसतेय. आपल्या आईला किंवा बायकोला स्वयंपाकघरात मदत करायला हवीय, हे आजच्या पुरुषांनी बरंचसं स्वीकारलंय, याची खात्री वेगवेगळ्या
काही वर्षांपूर्वी पुण्यात असलेल्या ‘तेजाज् रेस्टॉरंट’ आणि ‘पुनू दा ढाबा’ या रेस्टॉरंटचे मालक या ओळखीबरोबरच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या करिअरच्या ऐन बिझी असण्याच्या टप्प्यावर घर, स्वयंपाकघर दोन्ही उत्कृष्टपणे सांभाळणारे त्यांचे पती आणि तेजस्विनी पंडितचे बाबा असलेल्या रणजित पंडित यांच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या. ते म्हणाले, ‘‘लहानपणी माझी आई स्वयंपाक करत असताना मी तिला नेहमी मदत करायचो. माझी आई सुगरण होती. त्यामुळे खूप शिकायला मिळालं. पुढं केटरिंग कॉलेजला वडिलांच्या इच्छेसाठी म्हणून प्रवेश घेतल्यानंतर तर स्वयंपाकाबाबत शास्त्रशुद्ध शिकलोच आणि मग लग्नानंतर ज्योती दौऱ्यावर असताना त्या शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोगही होत गेला. सुरुवातीला गरज म्हणून मी स्वयंपाक करायचो. पण हळूहळू त्यात आवड निर्माण होत गेली. त्या वेळेस इंद्रजीतसिंग काबरा नावाचे एक इंटरनॅशनल कूक होते. त्यांचं स्वयंपाकाबाबतचं खूप संशोधन होतं. त्यांची पुस्तकं वाचून त्यांचे शोज बघून मी एक नवनवीन प्रयोग करायला लागलो. माझे स्वत:चे असे काही वेगळे पदार्थ आहेत. कोळंबीचं लोणचं, तांदळाच्या पिठाची धिरडी यांसारख्या पदार्थामध्ये तर माझा हातखंडाच आहे. मी सहा प्रकारच्या सोलकढी बनवतो. ज्या तुम्हाला इतरत्र कुठेही चाखायला मिळणार नाहीत. याशिवाय माझा दावा आहे की पुण्यात बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोणत्याही हॉटेलमध्ये मी बनवतो तशी उत्तम चवीची बिर्याणी मिळणारच नाही. सध्या मी ६८ वर्षांचा आहे. आता खूप वेळ स्वयंपाकघरात उभं राहणं होत नाही. पण कोणी चिरणं, कापणं अशी पूर्वतयारी करून दिली तर अजूनही अत्यंत आनंदानं मी वेगवेगळे पदार्थ बनवतो. रणजित पंडित महाराष्ट्रीय, पंजाबी, मोगलाई, चायनीज सगळ्याच पदार्थाचे चाहते तर आहेत, नि त्यात त्यांचा हातखंडाही आहे. बोलता बोलता चांगला स्वयंपाक कसा बनवायचा, यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्ससुद्धा खूप सहजपणे त्यांनी दिल्या. ते म्हणाले, स्वयंपाक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती उष्णता. बऱ्याच स्त्रिया गॅस मोठ्ठा ठेवून स्वयंपाक करतात. स्वयंपाक प्रेमानं करायचा असेल तर गॅसची ज्योत ही लहानच हवी. मी तर फक्त भांडं तापेपर्यंतच गॅस मोठा करतो. एरवी माझा स्वयंपाक अत्यंत ‘प्रेमानंच’ असतो.
सत्तावीस वर्षे वयाचा माझा मित्र अमित फ्रीलान्स व्हिडीओ एडिटर आहे. पदार्थ करून खाऊ घालणं अमितला आवडतं हे माहितीच होतं पण मागच्या रामनवमीला ७०-८० लोकांचा पूर्ण स्वयंपाक अमितनंच केला होता हे समजल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं. हे कसं काय, असं विचारल्यावर अमित म्हणाला, ‘‘आईनं अगदी छोटा होतो तेव्हापासून दूध गरम कर, चहा कर, कुकर लाव, असं हळूहळू शिकवलं. सुरुवातीला ती जसं सांगेल
कायमच ओसंडून वाहणारी हॉटेल्स बघता हॉटेलिंगचं प्रमाण बरंच आहे, हे खरं असलं तरीही आजची हेल्थ कॉन्शस पिढी मोठय़ा प्रमाणावर घरच्या स्वच्छ, ताज्या, सकस अन्नाला महत्त्व देणारीही आहे, म्हणूनच आजकालची तरुण मुलं, मध्यमवयीन पुरुष कुठलाही पुरुषी अहंकार न ठेवता स्वयंपाक करण्याकडे वळतोय. औरंगाबादचे विवेक दीक्षित ऑप्टोमेस्ट्रिस्ट आहेत. वय ४७ वर्षे. एक मुलगा, एक मुलगी, सुगरण बायको. एकंदरीत स्थिरस्थावर संसार. दीक्षितांना रोजच्या कामाच्या व्यापात वेगवेगळे पदार्थ बनवायला जमतातच असं नाही. पण वेळ मिळेल तेव्हा ते दाल फ्राय, साबुदाण्याची खिचडी, पोहे आणि रस्सा भाज्या अगदी आनंदानं बनवतात. ते म्हणाले, ‘‘मी मेडिकलच्या क्षेत्रात असल्यामुळे जरा जास्तच हेल्थ कॉन्शस आहे. त्यामुळे बाहेरचं खाणं जवळजवळ नाहीच. मला चांगलंचुंगलं खायला आणि खाऊ घालायला खूप आवडतं. माझ्या मते घरी बनवलेलं अन्न हे आपल्याला हव्या त्या चवीचं, हायजिनिक आणि खिशाला परवडणारंही असतं. मला अन्न वाया गेलेलं अजिबात आवडत नाही. शिळं काही उरलं असेल तर त्याचा टिपिकल कुस्करा किंवा फोडणीचा भात करण्यापेक्षा त्यापासून मी खूप छान छान रेसिपीज् बनवतो. घरात सगळ्यांना त्या खूप आवडतात आणि वेगळ्या चवीचंही होतं नेहमीपेक्षा.’’
मध्यंतरी, आमच्या सोसायटीत एका काकूंकडे कुठल्याशा पूजेनिमित्त मला जेवायला बोलावलं होतं. गरमागरम पुरणपोळीनं तृप्त होत मी काकूंच्या पुरणपोळीचं तोंडभरून कौतुक केलं तेव्हा समजलं की त्या सगळ्या पुरणपोळ्या ६५ वर्षांच्या काकांनी केल्या होत्या. मी अगदी अविश्वासानंच काका-काकूंकडे बघितलं. कारण एरवीही पुरण करणं बायकांनाही तसं किचकटच वाटतं. पण काकांनी मात्र ते पुरण वेलदोडा, जायफळ टाकून मस्त केलं होतं. ते सुद्धा सोवळ्यात.. काकांनी सांगितलं की त्यांच्या आईचं खूपच कडक सोवळं असायचं. घरात जवळजवळ प्रत्येक सणाला नैवेद्य म्हणून पुरणच व्हायचं. त्यांची आई या काकांना पुरण करायला सांगायची आणि नंतर ती पोळ्या करायची. त्यातून सवय होत गेली आणि तेच वर्षांनुर्वष करत आल्यामुळे आता त्यांना छान जमतंय.
काकांसारखे अनेक जण आहेत ज्यांना एखादा ठरावीक पदार्थच करायला आवडतो आणि मस्त जमतोही. तर काहींना वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. माझ्या एका ‘सुगरण’ मित्राचं दहा वर्षांपूर्वी लग्न झालं, पण सुगरण बायकोमुळे त्याचं स्वयंपाकघर सुटलं. तो आता आपली हौस दरवर्षी महालक्ष्मीच्या सणाला लाडू, जिलेबी, करंज्या करून भागवतो. काही मित्रांच्या बाबतीतही तेच होतं, स्वयंपाक करायला येतो पण घरचा रोजचा स्वयंपाक बायको स्वत:कडे ठेवते. अर्थात याचा फायदा असा होतो की जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांचं कुठं अडत नाही. कुणाकडे मुद्दाम ‘पाहुणे’ म्हणून जायची गरज उरत नाही.
अर्थात सगळेच पुरुष काही आवड किंवा छंद म्हणून स्वयंपाक करत नाहीत. कित्येकांना ती गरज म्हणूनही करणं भाग पडतंय. हैदराबादला राहणारे प्रशांत ४२ वर्षांचे आहेत. त्यांचं अजून लग्न झालेलं नाही. घरात लहान दोन भाऊ आणि आजारी आई-वडील. त्यामुळे रोज सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करूनच प्रशांत ऑफिसला जातात. अर्थात त्यांची त्याबद्दल काही तक्रार नाही. उलट गरजेला ते उपयोगीच पडतंय. सचीनचंही तसंच आहे. कर्नाटकमध्ये राहणारा २८ वर्षे वयाचा सचिन सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. पहिलीपासून मेरिट स्टुडंट असलेल्या सचिननं व्हीजेएनटीसारख्या इंजिनीअिरग कॉलेजमधून उत्तम गुणांनी पास होत बंगळुरूमधल्या एका नामांकित कंपनीत नोकरी पटकवलीय. सचिन आताच्या पिढीचाच, पण खूप
या सगळ्या मित्रांना भेटत असताना अजून एक सुखद धक्का माझी वाट पाहतोय हे मला माहीत नव्हतं. अंबर कर्वे या मित्राला भेटले आणि या लेखाला पूर्णत्व मिळाल्यासारखं वाटलं. ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे, अशांसाठी पाककलेबाबतची शेकडो पुस्तकं आहेतच. शिवाय खानाखजानाचे अनेक शोज वेगवेगळ्या चॅनेल्सवरून जवळजवळ रोज दाखवले जातात. पण ज्यांना मुळात आवडच नाही ते याकडे फारसे फिरकतच नाहीत. अंबरना स्वयंपाकातलं काहीच येत नव्हतं. पण बायको गरोदर असताना स्वत: स्वयंपाक शिकणं ही त्यांना गरज वाटायला लागली. त्यातच त्यांनी एक आगळीवेगळी जाहिरात बघितली. ‘पुरुषांसाठी स्वयंपाकाचे वर्ग.’ पुण्याच्या मेधा गोखले यांच्या या वर्गात अंबर यांनी प्रवेश घेतला आणि त्यांना स्वयंपाक आवडू लागला. ते म्हणाले, ‘‘पूर्वी मी खूप सहजपणे बायकोला म्हणायचो की ‘कांदा तर चिरायचाय, कर पटकन.’ पण जेव्हापासून मी स्वयंपाक शिकलो तेव्हा मला लक्षात आलं की बोलणं खूप सहज आणि सोपं असतं पण करणं कठीण. किती सहजपणे आम्ही विचारतो, ‘अजून झाला नाही स्वयंपाक?’ आता मात्र एखाद्या पदार्थाची डिमांड करताना तो पदार्थ बनविण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो हे गृहीत धरून मी डिमांड करायला लागलोय. माझं बाळ छोटं असल्यामुळे एरवी बायको स्वयंपाक करत असली तरी वेळ पडली तर मी स्वयंपाक नक्की करू शकतो. अंबर यांनी केलेल्या कौतुकामुळे ‘पुरुषांसाठी स्वयंपाकाचे वर्ग’च्या संचालिका मेधा गोखले यांना भेटणं अपरिहार्य होतं..
मेधा गोखले यांनी हा अनोखा क्लास सुरू केला २००६ मध्ये आणि बघता बघता त्यांची शिकविण्याची हातोटी, हलक्याफुलक्या वातावरणात हसतखेळत संवाद साधण्याची त्यांची ढब, त्याचबरोबर रोजच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त कुकर लावताना त्यात किती पाणी टाकायचं, मीठ हातानंच का घालायचं, लसूण हातानं का सोलायला हवा, इथपासून ते टोमॅटो चिरला की त्याचा रस चेहऱ्याला लावून का टाकायचा. इथपर्यंतच्या अनेक मोलाच्या टिप्स देण्याच्या पद्धतीनं क्लासला तरुणांपासून आजोबांपर्यंत सर्वाची उपस्थिती तर असतेच, शिवाय ती दिवसागणिक वाढतही गेलीय. मेधा गोखले यांच्या या क्लासचं वैशिष्टय़ म्हणजे अजिबातच स्वयंपाक न येणाऱ्यांनाही पूर्ण स्वयंपाक करण्याचा आत्मविश्वास त्या देतात. प्रशिक्षणार्थीना भारंभार रेसिपीज् शिकवण्यापेक्षा चार दिवसांत ब्रेकफास्टचे दोन पदार्थ, रस्सा भाज्या, कणिक भिजवून पोळ्या करणे, पांढरा भात, पुलाव, खिचडी असे भाताचे पदार्थ, वरण, कोथिंबीर, रायता आणि दोन गोड पदार्थ असा रोजचा स्वयंपाक त्या शिकवतात. शिकवताना होमवर्कसोबतच विज्ञान आणि सौंदर्य या दोन्हीच्या दृष्टीनं आवश्यक अशा महत्त्वाच्या सूचना असतातच.
आपल्याक्लासमध्ये येणाऱ्या व धमाल करत शिकणाऱ्या १७ ते ७५ वयोगटातल्या ‘विद्याथ्र्यर’बद्दल मेधा गोखले भरभरुन बोलतात, ‘‘माझ्याकडे क्लासला गरज किंवा आवड म्हणून तर पुरूष येतातच पण बघूयात या बाई काय शिकवतात, या उत्सुकतेपोटी येणारेही बरेचजण असतात. गम्मत म्हणजे येणाऱ्यांपैकी ३० टक्के पुरूष हे बायकोला न सांगता आलेले असतात. अर्थात कधी बायकोला सरप्राईज देणे हा हेतू असतो. तर कधी आपला नवरा शिकतोय तेही पैसे देऊन हे कळल्यावर बायको कटकट करेल, तेव्हा नकोच, असा विचार करून तिला न सांगता येणारे ‘विद्यार्थी’ही असतात. खरं सांगू, कारणं वेगवेगळी असली तरीही माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकमेकांशी आणि माझ्याशी खूप छान रॅपो जमतो. आणि क्लासनंतरही तो टिकून राहतो हे विशेष. पुष्कळदा त्यांच्यापैकी कुणी स्वयंपाकघरात एखादा चांगला प्रयोग केला किंवा आजारी बायकोला करुन खाऊ घातल्याचं समाधान मिळालं असं सांगणारे त्यांचे फोन मला खूप समाधान देऊन जातात.’’ हे सांगतांना मेधाताईंचा चेहराही खुलला होता. त्या म्हणाल्या,‘‘मला वाटतं, स्वयंपाक ही कला आहे त्यामुळे कला शिकण्यात कसला आलाय स्त्री-पुरूष भेद ? ’’
पूर्वी नवरा स्वयंपाकात मदत करतो, हे सांगायला स्त्री काहीशी बिचकायची आणि पुरुषालाही इतरांसमोर ते सांगणं कमीपणाचं वाटायचं. पण या सगळ्या मित्रांशी बोलल्यानंतर जाणवलं की आजचा पुरुष मग तो १७ वर्षांचा असो की सत्तरीचा. सध्याच्या युगाची गरज समजून घेण्याचा तो प्रयत्न करतोय. खरं तर साठी ते सत्तरीतला पुरुष हा आधीच्या पिढीचा. पण तरीही कमावती बायको असो की मुलगी किंवा सून, त्यांना मदत करायला हवीय, ही पुरेपूर जाणीव त्यांना होतेय. मध्यमवयीन पुरुष तर नव्या आणि जुन्या पिढीची मानसिकता समजून घेणारा दुवाच आहे. त्यामुळे कधी हौस, आवड तर कधी गरज म्हणून तिच्या भूमिकेत शिरून तोही स्वयंपाकघरात रमतोय. आजच्या तरुणांमध्ये तर तू मुलगी आहेस म्हणून तूच स्वयंपाक करायला पाहिजेस, ही मानसिकता अभावानंच आढळते.
आजच्या जेंडर बायसच्या काळात स्वयंपाक कोणी करायचा यावर वाद घालत बसण्यापेक्षा स्वयंपाकघर हा परस्परांमधलं नातं दृढ करणारा दुवा ठरू शकतो. आलेले पाहुणे, बाहेर गप्पा ठोकणारा पुरुष आणि आत राबणारी बाई, असं चित्र बऱ्याच घरात बदलत चाललं असलं तरी ते प्रमाण वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी घरच्या पुरुषानं मनापासून केलेली मदत घरातलं वातावरण निकोप ठेवण्यास मदत करतेय. समोरच्याच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातूनच जातो म्हणतात, आता एखाद्या स्त्रीच्या मनात शिरण्यासाठी पुरुषांनीही हा अवलंबून बघायला हरकत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2013 रोजी प्रकाशित
घरचे बल्लवाचार्य
पूर्वी नवरा स्वयंपाकात मदत करतो, हे सांगायला स्त्री काहीशी बिचकायची आणि पुरुषालाही इतरांसमोर ते सांगणं कमीपणाचं वाटायचं. पण या सगळ्या मित्रांशी बोलल्यानंतर जाणवलं की आजचा पुरुष मग तो सतरा वर्षांचा असो की सत्तरीचा. सध्याच्या युगाची गरज समजून घेण्याचा तो प्रयत्न करतोय.
First published on: 16-02-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men cooking at home