डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

‘‘कसं आहे ना डॉक्टर, पसा कमवा, ध्येय ठेवा हे सगळं ठीकच की, पण ते किती ताणायचं, यालाही मर्यादा हवीच, नाही का?’’ सत्तरीतले एक आजोबा माझ्यासमोर त्यांची कैफियत मांडत होते. त्यांची दोन्ही मुले परदेशस्थ. इथे अगदी एकाकी असणारे आजोबा काही महिने तिकडे, काही महिने इकडे असा खेळ खेळत होते. परंतु यंदा काही महिन्यांसाठीसुद्धा परदेशात न जाण्याचा निर्णय त्यांनी हट्टाने घेतला होता. शहरातल्या किमान दहापैकी, सात कुटुंबात आढळणारी ही सध्याची परिस्थिती! परदेशस्थ कुटुंबीय, आणि त्यांचे काही दोर त्यांच्या इतर कुटुंबीयांच्या रूपात, इथे भारतात मागे रेंगाळणारे! खरे तर कुठल्याही देशात, कधीही प्रवास करणे हे गणितच खूप सोपे झाले असले तरीही, मनातून असणारा का? कशासाठी? हा प्रश्न, मात्र दिवसेंदिवस वाढत चाललाय. यात काही मंडळींची अवस्था ना धड इकडे ना तिकडे या स्वरूपाची आहे.

‘आपलं ध्येय कायम उच्च असावं’,

अशी शिकवण देणारी वडीलधारी पिढी कमालीच्या वार्धक्याकडे झुकली, आणि हीच ध्येयं आता ‘टोचायला’ लागली. ध्येयांपेक्षा ती साध्य करण्यासाठी म्हणून, किंवा साध्य झालीयेत पण टिकवण्यासाठी म्हणून समोर उभी राहिलेली परिस्थिती, याचा कदाचित कधीच विचार केला गेला नाही म्हणूनच ध्येय म्हणजे काय? त्यांचं नातेसंबंधातलं गणित नेमकं काय सांगतं? ते समजून घेण्याची गरज किती? याचा प्रथम विचार व्हायला हवा.

ध्येय म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असणारे विविध केंद्रिबदू! आता इथे विविध कसे असा प्रश्न पडू शकेल. आपले शिक्षण घेतानाचे ध्येय, आयुष्यात आपल्याला जे साध्य करायचे आहे, ज्या पद्धतीचे काम करायचे आहे, जो पेशा करायचा आहे, तिथपर्यंत नेण्याचा ते सोपान असे असू शकते. परंतु त्याचसोबत, एकंदरीत आयुष्य व्यक्तिश: मला कसे जगायचे आहे याची उलगडत जाणारी जाणीव, ज्याचे निकष, अर्थातच व्यक्तिनिहाय वेगवेगळे असू शकतात. हीच ती ध्येयं, ज्यामुळे गल्लत होण्याची शक्यता असते.

माणूस म्हणून जन्मल्यानंतर पुढच्याच क्षणी हे सगळंच सरसकट ठरवता येणे केवळ अशक्यच, किंवा दुसऱ्याच कोणा व्यक्तीने ते आपल्यासाठी ठरवून टाकणे, हे तर अजूनच व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. अनेकदा, स्वतला आयुष्यात साकारायला न मिळालेल्या स्वप्नांची पूर्तता करण्याचे अकारण ओझे पुढच्या पिढीवर नकळत लादले जाते. शिवाय, या फार जुन्या पिढीच्या चुका आहेत असे अजिबातच नाही. बालपणापासून, स्वत:ला थोडीफार समज आल्यानंतर; त्यातही व्यक्ती म्हणून, स्वतच्या विशिष्ट आवडीनिवडी, प्राधान्य हे समजायला लागल्यानंतर आयुष्य अमुक पद्धतीने जगावे अशी संकल्पना रुजण्यास सुरुवात होते. यात सुरुवातीची काही वाढीची वर्ष खूपच महत्त्वाची. म्हणूनच आपल्याकडे काही प्रेरक व्यक्तिमत्त्वांविषयी याच वयात जाणीवपूर्वक सांगितले-शिकवले जाते. आपली पूर्वापार गोष्टी सांगण्याची पद्धत म्हणजे अशा शिकवणीची खाणच! कारण आपल्या आयुष्याचा आराखडा बनवण्याआधी, त्याविषयी काही दृढ मते तयार करण्याआधी इतरांची आयुष्ये नमुन्यादाखल आपण वाचतो, ऐकतो, अभ्यासतो! इथे ‘नमुन्यादाखल’ हा शब्द खटकू शकेल, परंतु ते तसेच असते. उदाहरणार्थ, स्वामी विवेकानंद वाचताना, स्वतमध्ये असणाऱ्या जिज्ञासू वृत्तीला हाक मारून, ती माझ्यात कितपत आहे, ते खुद्द विवेकानंदांच्या जिज्ञासू वृत्तीची पट्टी समोर धरून मोजले जाते. तसेच इतर वीरांची इतिहासातील चरित्रे अभ्यासताना हीच पट्टी साहस, धाडस याबाबत वापरली जाते. इथे काही स्वप्निल वाटणारी चरित्रे, व्यक्तिमत्त्वेदेखील आपल्या संपर्कात येतात. काही क्षेत्रांमधील उच्च स्तरावर पोचलेली मंडळी, त्यांची कारकीर्द; सोनेरी-रुपेरी पडद्यांवर गाजलेल्या व्यक्ती इत्यादी. हे जास्त जवळचे, किंवा असेच जगावे, हेच करावे असे वाटले तर त्यात नवल नाही. कारण मुळात असलेली, लोकप्रिय, जगन्मान्य होण्याची; थोडक्यात मला नसले तरीही माझ्या नावाला अमरत्व प्राप्त व्हावे असे वाटण्याची तीव्र इच्छा! यातही काही मंडळी मात्र संशोधन करणे, एका कोपऱ्यात राहून शांत आयुष्य व्यतीत करणे याने प्रभावित होतात. हा प्रभाव पहिल्या काही वर्षांत जास्त प्रबळ असला, तरीही आयुष्यभर कोणामुळे किंवा कशाने तरी प्रभावित होणे चालूच राहते. अशा वेळेस ध्येयाच्या पट्टयादेखील बदलत जातात. बऱ्याचदा काही व्यक्ती मात्र, स्वतच एका प्रभावशाली स्वरूपात वावरू लागतात. हे घडताना काही घटकांचा विचार आपण कळत-नकळत करतोच.

पहिला विचार म्हणजे, माझे ध्येय आणि आयुष्य मला जसे जगायचे आहे ते आणि माझे कुटुंब, याचे नाते कसे आहे? ते माझ्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून अवास्तव ठरणारे असू शकते का? उदा. एखाद्या मध्यमवर्गीय घरात, सरधोपट नोकरी करण्याचा सल्ला दिला जात असेल आणि तिथे एखादी मुलगी उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवत असेल, त्यानुसार स्वतच्या आयुष्याची आखणी करत असेल, तर तिचा कुटुंबासोबतचा संघर्ष अटळच. याउलट एखाद्या प्रस्थापित राजकीय नेत्याच्या घरात, एखादी व्यक्ती शास्त्रज्ञ होऊन, प्रसिद्धीपरांङमुख आयुष्य व्यतीत करू इच्छित असेल तर तोही कुटुंबाला धक्का. प्रत्येकाच्या कामाचे क्षेत्र निवडले जाते, तिथून पुढे आयुष्यातल्या इतर ध्येयांना आपसूक कलाटणी मिळते, प्राधान्ये ठरतात. आपण अनेकदा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत, किंवा वेगवेगळी ध्येये ठेवून एकत्र, किंवा एका कुटुंबात नक्कीच गुण्यागोविंदाने राहू शकतो.

आपापले स्पष्ट असलेले ध्येय, त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट, करावा लागणारा संघर्ष, याविषयी कुटुंबातील सर्व सदस्यांशी मोकळेपणाने बोलावे. विस्तृत चर्चा करावी. कित्येकदा आपण निवडलेल्या वाटेत थोडेसे पुढे गेलो किंवा यश मिळायला सुरुवात झाली, की सांगावे असेही मत असू शकते. कारण त्यावेळेस असणारी द्विधा मन:स्थिती किंवा यशाबाबत असलेली शंका. कमी आत्मविश्वास. यश मिळाले नाहीच, तर त्यावर कुटुंबाकडून हेटाळणी तर होणार नाही ना ही भीती. असे असल्यास, ही भीती स्पष्ट बोलून दाखवावी. स्वत: काय स्थितीत आहोत हेही सांगावे. अमुक एक गोष्ट सुरू केली आहे, बघूया काय होतंय, हे बोलणे खूपच सोपे असते. त्यातून कुटुंबात एकमेकांविषयीचा विश्वास जास्तच घट्ट होतो. त्यामुळे आपण करत असलेले बदल सहजतेने इतरांकडून स्वीकारले जातात. जसे, त्यासाठी लागणारी मानसिकता, बुद्धी, पसा, वेळ साऱ्यांची गुंतवणूक किंवा काही प्रसंगी करावे लागणारे मूलभूत बदल, जसे स्थानबदल इत्यादी. आयुष्य बदलते तसे, स्वत:ला कसे जगावेसे वाटते याचेही निकष बदलतात. अशा वेळेस आपण कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असू, तर इतरांना आपण घेतलेले वळण, किंवा घेतलेली विश्रांती मान्यच आहे असे ठरवून मोकळे होऊ नये. कुटुंबाला गृहीत धरू नये. त्यासाठी त्यांचे मत नक्कीच विचारात घ्यावे. उदा. एखाद्या घरात सतत बदलीच्या ठिकाणी जावे लागण्याची नोकरी असणारे आई-वडील असतील, तर यात मुलांना काय विचारायचे असा दृष्टिकोन न ठेवता, त्यांचे मानसिक जग यातून पूर्ण बदलणार आहे, त्यातून त्याचा परिणाम त्यांच्या जडणघडणीवर होणार आहे, हे लक्षात घ्यायलाच हवे. तसे त्यांच्याशी बोलावे. कोणाचा आक्षेप असेल तर त्यातून काय आणि कसा मार्ग काढता येईल हेही पहावे.

बऱ्याचदा आपली आणि जोडीदाराची आयुष्याविषयीची ध्येयं, कल्पनाही एकसारख्या असत नाहीत. म्हणजे हवे असणारे आयुष्य, त्यातील एकंदरीत, सोयीसुविधा, किंवा निवडलेला खडतर प्रवास. मग बहुतांश वेळा खटके उडतात. तेव्हा यावर बसून चर्चा करणे योग्य.

आता यापुढे जाऊन, जर आपले ध्येय इतरांना समजण्यासारखे नसेल, त्यात मदत होण्याऐवजी कुटुंब म्हणवणाऱ्या व्यक्तींकडून कायम आडकाठीच होत असेल, तर मात्र यावर सखोल विचार करणे, त्याविषयी स्पष्टपणे विचारणे, प्रसंगी स्वतसाठी उभे राहणे हेही आवश्यक. नाहीतर, मनात कुढत राहण्याशिवाय काहीही उरत नाही.

आपल्याच कुटुंबातील एखादी व्यक्ती, यशाच्या शिखरावर जाताना, तिच्या ध्येयात जर आपणच आडकाठी आणत असू, तर ते नक्कीच अप्रस्तुत म्हणावे लागेल. आश्चर्य वाटेल, पण बऱ्याचदा प्रौढ म्हणवणाऱ्या; मनाने, वयाने, मोठया व्यक्तींकडून असे होताना जास्त प्रमाणात दिसते. याचे साधे कारण म्हणजे, स्वत:विषयी वाटणारे अवास्तव महत्त्व आणि कुटुंबाच्या संज्ञेविषयीच्या भ्रामक, बुरसट संकल्पना. अशा वेळी  ‘एकला चलो रे!’ हे लक्षात ठेवून, आपला मार्ग योग्य असेल तर शांतपणे वाटचाल करत राहावी. खऱ्या नात्यांसाठी, मत्रीसाठी, प्रेमासाठी आपली ध्येयं, मार्ग सोडावा लागत नाही. ती उलट वृद्धिंगत होतात. एकमेकांना समजून घेणाऱ्या व्यक्ती कुटुंबात, आजूबाजूला असतील तर प्रत्येकाचीच वाटचाल सुखकर होते. हीच खरी नाती!

स्वतच्या इच्छा-आकांक्षा यांच्यासाठी, काहीतरी उच्च ध्येय गाठण्यासाठी सर्व पाश सोडून राहणाऱ्या व्यक्तींना स्वार्थी ठरवणाराही सूर अनेकदा दिसतो. परंतु त्यांच्यासमोर असणारे ध्येय हे कदाचित तितके कठीण असू शकेल याचा विचार होताना दिसत नाही. त्यांच्यासमोर कर्तव्याचे एक अकारण जाळे पसरून त्यात त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणे, हे तर निव्वळ स्वार्थीपणाचे!

जन्माला येणारी पुढची पिढी, ही केवळ आपल्याला सांभाळण्यासाठी आहे. प्रसंगी त्यांनी आपापल्या महत्त्वाच्या ध्येयांची तिलांजली दिलीच पाहिजे, हे समीकरण चुकीचेच. तसेच स्वत:समोर असणाऱ्या क्षुल्लक बाबींना महान ध्येयांचे स्वरूप देऊन, त्यांचा ढालीसारखा वापर करत, घरातील वडीलधाऱ्या मंडळींना केवळ स्वतच्या स्वार्थासाठी वापरणे हेही चुकीचेच!

वैयक्तिक घटक म्हणून स्वतचा विचार डोळसपणे झाला, तर तसाच कुटुंबाचा आणि आसपासच्या लोकांचाही घडू शकेल. त्यातून सुसूत्रता नक्कीच येऊ शकेल.

urjita.kulkarni@gmail.com