मैत्रेयी केळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृदुंग वादन अत्यंत कठीण मानलं जातं, म्हणूनच पुरुषांचंच त्यात आधिक्य होतं, मात्र निदुमुल सुमथी यांनी या वादनातील काठिण्यावर विजय मिळवत त्यातील सुमधुर सूर जगापर्यंत पोहोचवले. इतकंच नव्हे, तर त्या अनेक मृदुंग वादक घडवीत आहेत. पहिल्या स्त्री मृदुंग वादक मानल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेशातील निदुमुल सुमथी यांना या वर्षीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचा प्रवास मेहनत आणि कलेप्रति समर्पण यांची साक्ष देणारा आणि म्हणूनच प्रेरणादायीही..

एखाद्या सुरेख गायनाला वाद्यांची उत्तम साथ लाभली की ते गायन अधिकच सुरेल होतं. म्हणूनच गायनाला वादनसाथ महत्त्वाची. मृदुंगाला ‘देव वाद्य’ म्हणून अनेक वाद्यांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. ब्रह्मदेवानं या वाद्याची निर्मिती केली असं मानलं जातं. शंकरांनी जेव्हा तांडव नृत्य केलं, त्या वेळी नंदी त्यांना मृदुंगाची साथ करत होते असा पुराणात उल्लेख सापडतो. महादेवाच्या तांडवाला साथ करणं हे काही साधसुधं काम नाही. त्यासाठी लागणारं वाद्यही तेवढय़ाच ताकदीचं हवं. प्रचंड वेग आणि शक्तीचा आविष्कार करू शकेल असं. पुराणातल्या या एका प्रसंगातूनच खरंतर या वाद्यवादनाचं काठिण्य अधोरेखित होतं. म्हणूनच बहुधा वर्षांनुवर्ष मृदुंगवादनात पुरुषांची मक्तेदारी होती. या पुरुषी परंपरेला छेद देत यात प्रावीण्य मिळवलेल्या सुमथी देवींना यंदाचा ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर झाला असून त्या पहिल्या स्त्री मृदुंग वादक मानल्या जातात.

गुरुप्रति अन्योन्य भक्ती, वादनावरील कमालीची निष्ठा, समर्पण भाव, कलेतील सच्चेपणा, पावित्र्य, अपार कष्ट आणि तरीही अत्यंत विनम्रता असा गुणसमुच्चय असलेलं हे प्रसन्न व्यक्तिमत्त्व. सुमथी यांना बघता क्षणी आपण नतमस्तक होतो. त्यांच्या वादनाचा आनंद घेत असताना नकळत त्यांच्या खडतर जीवनप्रवासाचा मन वेध घेऊ लागतं.

१६ ऑक्टोबर १९५० रोजी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ात ‘इलरू’ येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील निदुमुल राघवैय्या मृदुंग विद्वान होते. आई नीदुमुल वेंकटरत्नाम्मा यांची त्यांना उत्तम साथ लाभली होती. चौदा अपत्य असलेल्या या संसारात कुटुंबाची आर्थिक स्थिती ओढगस्तीची. कष्टमय आणि काटकसरी जीवन. पण संगीत साधनेतील आनंद मात्र कधी उणावला नाही. वादनासाठी कठीण मानल्या जाणाऱ्या या वाद्याची पहिली तालीम सुमथीला आपल्या वडिलांकडून मिळाली. आठ-दहा किलो वजनाचं तालवाद्य पायावर तोलत बोटांनी वेगवान, लयबद्ध वादन करण्याची कला सुमथी त्यांच्याकडे शिकली. खरं तर मुली प्रामुख्यानं वीणा, तानपुरा, व्हायोलिन वादन करतात. अत्यंत ताकदीनं वाजवायला लागणारं मृदुंग म्हणूनच त्यांचं वाद्य नव्हे, असं समजलं जातं. पण सुमथी यांनी ते लीलया आत्मसात केलं.

वयाच्या सहाव्या वर्षी सुमथी यांचं शिक्षण सुरू झालं. वडिलांची तालीम आणि प्रोत्साहन सतत लाभत असल्यामुळे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच त्यांनी अतिशय प्रगल्भ असं वादन गुणीजनांसमोर सादर केलं होतं. त्या वेळी श्रेष्ठ वादक दंडामुडी श्री राम मोहन राव यांचं वादन सुमथींच्या वडिलांना विशेष आवडे. त्यांच्या वादनाचा वडिलांवर फार प्रभाव होता. त्यामुळेच संगीतातील प्रमाणपत्र व पदविका प्राप्त झाल्यावर त्यांनी सुमथींना राम मोहन राव यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी पाठवलं.  त्या वेळी सुमथींचं घर दंडामुडी यांच्या घरापासून पाच किलोमीटर लांब होतं. त्या म्हणतात, की माझी शिकवणी संपल्यावर अनेक वेळा मी घरी एकटी परतत असे. पण या कष्टांचं त्या वेळी काहीच वाटत नसे, कारण ध्येयावर अढळ निष्ठा होती. एक प्रकारची अनोखी झिंग होती. माझ्या गुरूंनी मला फक्त वादनातील तंत्रं, कौशल्यच शिकवली नाहीत, तर वाद्यावरचं प्रेम माझ्यात रुजवलं. खरोखरच मी भाग्यवान, की मला असे गुरू  लाभले.

हळूहळू वादनाची साथ करता करता सुमथी स्वतंत्रपणे एकल वादनाचे कार्यक्रम करु लागल्या. राम मोहन राव यांच्याबरोबर, तसंच स्वतंत्रपणे जुगलबंदीच्या किती तरी संगीत सभा सुमथींनी गाजवल्या. पुढे २००३ मध्ये आपल्या गुरूंचाच- म्हणजे राम मोहन राव यांचाच त्यांनी पती म्हणून स्वीकार केला. पवित्र असा गुरू -शिष्येचा बंध अर्धांगिनी म्हणून अधिकच दृढ झाला. श्री राम मोहन रावांविषयी बोलताना सुमथी आत्यंतिक भावुक होतात. राम मोहन राव हे अतिशय निश्चयी आणि शिस्तबद्ध होते. साधनेच्या बाबतीत ते अत्यंत काटेकोर होते आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपला निश्चय आणि नियम कधी मोडला नाही. सुमथींना प्राप्त झालेलं हे अपूर्व यश, ही प्रवीणता हा केवळ गुरूंचा आशीर्वाद आहे, असं त्या मानतात.

कठीण परिश्रम करत नेटानं त्या मृदुंग वादन करत होत्या. त्याच वेळी सरकारी संगीत महाविद्यालयात अध्ययापनही करत होत्या. अनेक उत्तम शिष्य त्यांनी या २० वर्षांच्या अध्यापन काळात घडवले. एवढंच नव्हे, तर तरुण उदयोन्मुख वादकांना आपली कला सादर करता यावी म्हणून त्यांनी ‘लय वेदिका’ या व्यासपीठाची स्थापना केली. अनेक स्पर्धाचं आयोजन करून प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रावीण्य पदवी देऊन त्यांचा गौरव केला. सुमथी देवींनी पं. भीमसेन जोशी. डॉ. एम. बालमुरलीकृष्णन्, डॉ. एम. एस्. सुब्बलक्ष्मी, चिट्टी बाबू अशा दिग्गजांना मृदुंग साथ केली आहे. २००९ मध्ये त्यांना केंद्र संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. २०१५ मध्ये आंध्र सरकारतर्फे ‘युगादी’ पुरस्कार देण्यात आला. १९७४ मध्ये उत्तम मृदुंग वादक पुरस्कार, पळणी सुब्रह्मण्यम् पिल्लई स्मृती पुरस्कार, इंडियन फाइन आर्टस् सोसायटीतर्फे उत्कृष्ट मृदुंग वादक पुरस्कार, गुरुवायुर दोराई पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘मृदुंग  शिरोमणी’, ‘मृदुंग लय विद्यासागर’, ‘गायत्री संगीत विद्वान मणी’, ‘मृदुंग महाराणी’, अशा पुरस्कारांच्या नावांतूनच त्यांचं श्रेष्ठत्व समजतं.

इतकं अपूर्व यश त्यांना मिळालं, तरी हा प्रवास सोपा मात्र नव्हता. केवळ स्त्री आहे म्हणून त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. प्रसंगी काही दिवस कलेपासून लांबही राहावं लागलं. परंतु अनेक आव्हानं पेलत त्यांनी आपली कला टिकवली, फुलवली, एवढंच नव्हे तर एक आदर्श घालून दिला. पुरुषप्रधान समाजात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी स्त्रीला द्यावी लागणारी परिश्रमांची कठीण परीक्षा सुमथी देवींना चुकली नाही. पण निष्ठा, मेहनत आणि ध्यास यांच्या बळावर त्यांचं वादन सोन्यासारखं झळाळून उठलं.

कर्नाटकी संगीतातील काठिण्य, परंपरेची जपणूक आणि पावित्र्य सुमथी देवींच्या वादनातून झळकतं. पदुकोट्टई वादन शैलीतील त्यांचं वादन ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करतं. आपल्या घराण्यातील वादनाची शुद्धता जपत, ताल आणि लयीचा अनोखा संगम साधणारं त्यांचं वादन, त्यातील मधुरता, रस आणि सहजता मनाला स्तंभित करते. अपार कष्टांची जाणीव मनात घट्ट रुजवते.

mythreye.kjkelkar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nidumul sumathi from ap considered to be the first female mridung player has been awarded this year padma shri abn