घरातील वृद्ध व्यक्ती आजारी असो किंवा दीर्घायुषी, विभक्त आणि नोकरदारांच्या कुटुंबपद्धतीत त्यांची काळजी घेण्यासाठी ‘केअर टेकर’ वा काळजीवाहकाची गरज वाढत चालली आहे. त्याबरोबरीने त्यांच्या संस्थाही वाढत चालल्या आहेत आणि साहजिकच त्यांच्याविषयीच्या चर्चाही. कधी काळजीवाहकांचा अनुभव कटू असतो तर कधी वृद्धांचा त्यांना येणारा अनुभव मनस्ताप देणारा असतो. कसे असतात वृद्धांचे आणि या काळजीवाहकांचेही अनुभव?
‘आजाराने पोखरलेलं शरीर घेऊन जास्त काळ जगणं म्हणजे शाप आहे, शाप माणसाला!’ असं हताशपणे बोलून मनोहरराव आपल्या मित्राजवळ, शामरावांजवळ बसले. त्यावर अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे गेली चार वर्षं जवळपास अंथरुणाला खिळलेले शामराव व्यथित होऊन म्हणाले, ‘‘शापच आहे रे बाबा, पण खरा शाप आहे तो सेवा करणाऱ्याला. मनातून कितीही अगतिक वाटत असलं तरी सेवा करून घेणारा जागेवरच असतो, पण ‘हा’ आहे म्हणून दिलासा आहे, आम्हा सर्वांनाच.’’ त्यांनी अंगुलीनिर्देश केला, तिथे समोरच खुर्चीवर पस्तिशीतला तरुण बसला होता. तो ‘हा’ म्हणजे काकांच्या नोकरी करणाऱ्या मुलासुनांच्या अनुपस्थितीत दिवसभर काकांना सांभाळायची जबाबदारी घेणारा त्यांचा ‘केअर टेकर’ अर्थात रुग्ण काळजीवाहक…
शामरावांना अतिशय चांगला ‘काळजीवाहक’ मिळाला होता. घरातील कोणाचीच त्याच्याविषयी कसली तक्रार नव्हती. उलट ‘तो’ आहे म्हणून खूप दिलासा आहे, अशी घरातील सर्वांचीच भावना होती. हा त्यांच्या एका नातेवाईकाच्या परिचयातील असल्यामुळे विश्वासूही होता. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे श्यामरावांना व्यवस्थित निवृत्ती वेतन मिळत होते आणि कुटुंबाचीही आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यामुळे ते काळजीवाहक ठेवू शकत होते. कौटुंबिक वातावरण जिव्हाळ्याचं, आनंदी असल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती सुसह्य होती.
पूर्वीपासून मालकाच्या गैरहजेरीत त्याच्या जागेची, मालमत्तेची किंवा त्याच्या एखाद्या वस्तूची काळजी घेणारी व्यक्ती अशी ‘काळजीवाहका’ची व्याख्या सर्वज्ञात आहे. मात्र सध्याच्या काळात मुलांच्या गैरहजेरीत आजारी, वृद्ध, दिव्यांग, परावलंबी झालेल्या ज्येष्ठांना सांभाळणारा, अंथरुणावरील रुग्णाची घरी किंवा रुग्णालयात जाऊन काळजी घेणारा महत्त्वाचा आणि ‘मोला’चा आधार म्हणजे पुरुष वा स्त्री काळजीवाहक किंवा ‘पेशंट केअर टेकर’ही त्या व्याख्येची व्याप्ती अधिक प्रचलित होत आहे. आजकालचं आयुष्यच धावपळीचं झालंय, हे कोणीच नाकारू शकत नाही. कुटुंबातील वयोवृद्धांचा जेव्हा विषय येतो, तेव्हा घरातील सदस्यच जिथे नाईलाजास्तव वेळ देऊ शकत नाही, तिथे इतर नातेवाईकांची अपेक्षा कशी करणार? काहींच्या सुदैवाने हाकेला धावणारे नातेवाईक असले तरी त्यांच्या मदतीलाही मर्यादा असतेच. म्हणूनच पैसे देऊन हक्काने सेवा घेण्यास किंवा मदतनीस म्हणूनही काळजीवाहकाचा विचार केला जातो.
शमाताईंच्या बाबतीत असंच झालं. त्यांची परदेशस्थ बहीण बऱ्याच वर्षांनी त्यांच्याकडे राहायला आली. दोघींनी फिरण्याचे खूप मनसुबे रचले होते. पण आठ दिवस झाले नाही, तोवर त्यांच्या सगळ्या इच्छांवर पाणी फिरलं. त्यांची बहीण रस्त्यात पाय घसरून पडली आणि पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला. साहजिकच दीड ते दोन महिने त्यांना पूर्णपणे बिछान्यावर झोपून विश्रांती घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. बहिणीचा मुलगा परदेशात तर विवाहित मुलगी मुंबईत. मुलीचं एकत्र कुटुंब, शिवाय घरही लहान. सर्व बाजूनं विचार करून, दोघींच्याही मुलांशी बोलून शमाताईंनी स्वत: सगळी जबाबदारी घेतली. एका केंद्रामार्फत दिवसभरासाठी एक काळजीवाहू मुलगी ताबडतोब नियुक्त केली. तिच्या मदतीनं दोन महिने त्यांनी बहिणीची सेवा केली. शमाताईंच्या नोकरी करणाऱ्या मुला-सुनेनंही त्यांना पाठिंबा दिला. दोन महिन्यांनंतर त्यांची बहीण संपूर्णपणे बरी होऊन परदेशी परतली. त्यांच्या सुदैवानं खूप चांगली काळजीवाहक मिळाली आणि अचानक ओढवलेल्या परिस्थितीला घरच्यांच्या सहकार्याने सहजपणे सामोरं जाता आलं.
दुर्दैवानं सर्वांच्याच बाबतीत असं अनुभवास येत नाही, हेही तितकंच खरं आहे. सुनीताचे सासरे जवळजवळ तीन वर्षांपासून ‘डिमेंशिया’चे रुग्ण. दोघेही नवरा-बायको नोकरीला असल्यामुळे दिवसा बारा तासांच्या काळजीवाहकाची गरज भासली. तिच्या शेजारीच राहणारे त्यांचे एक नातेवाईक अधूनमधून लक्ष द्यायलाही होते; पण तरीही या तीन वर्षांत एका केंद्रामार्फत उपलब्ध झालेले अनेक काळजीवाहक तिला या ना त्या कारणाने बदलावे लागले. थोडा वेळ बाहेर जातो सांगून दारू पिऊन येणारे, जेवण,औषधं वेळेवर न देणारे, खोटं बोलणारे, वारंवार सुट्टी घेणारे काळजीवाहकही तिच्या वाट्याला आले. एकदा तर एकानं आपली बायको त्रास देते म्हणून मानसिक त्रागा करून घेत मद्यापान करीत तिच्याच घरात धिंगाणा घातला. गेल्याच वर्षी तिच्या सासऱ्यांना देवाज्ञा झाली. ‘काळजीवाहक’ या शब्दानं आताही धडकी भरते, असं ती सांगते. महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील ज्येष्ठ रुग्ण आणि त्याचा काळजीवाहक जर आपल्या नजरेसमोरच असेल तर ठीक; मात्र विभक्त राहत असल्यामुळे दृष्टीआड असेल तर विशेष लक्ष ठेवावंच लागतं.
अर्थात प्रत्येक वेळी काळजीवाहकाचाच वाईट अनुभव येतो असं नसून, कधी-कधी याविरुद्धही परिस्थिती असते. रुग्णच हट्टी, विक्षिप्त, आक्रस्ताळी स्वभावाचे असतात. प्रसंगी काळजीवाहकावर हातही उगारतात, आरडाओरड करतात, रागवतात, काही घरांत त्यांना माणूस म्हणून न पाहता फारच वाईट वागणूक दिली जाते, दुजाभाव दाखवला जातो अशा परिस्थितीत हे काळजीवाहक फार काळ त्या घरात टिकत नाहीत.
दिवसांगणिक ‘काळजीवाहक’ पुरवणाऱ्या खासगी संस्थांची वाढती संख्या पाहता समाजात असलेली काळजीवाहकाची वाढती गरज ही एक ज्वलंत समस्या होत चालली आहे. त्यांची सहा तास, आठ तास, बारा तास, चोवीस तासांची नोकरी आणि त्यानुसार त्यांचा दिवसाचा असलेला रोजगार पाहता तो देण्यासाठी रुग्णाची किंवा त्याच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थितीही तेवढीच मजबूत असेल तर हा ‘काळजीवाहक’ परवडतो, हेही तेवढंच निर्विवाद सत्य आहे. सामान्यांच्या खिशाला मात्र कितीही गरजेचा असला तरी तो नक्कीच परवडणारा नसतो.
दुसरी गोष्ट म्हणजे रुग्ण अनेकदा संपूर्णपणे अंथरुणाला खिळलेला नसतो. नैसर्गिक विधी तो स्वत:च्या स्वत: करू शकतो तसेच हिंडू-फिरू शकतो. पण तरीही वेगवेगळ्या आजारांनुसार किंवा गरजेनुसार सोबत म्हणून वा ज्येष्ठांना केवळ सोबत म्हणूनही काळजीवाहक ठेवला जातो. या परिस्थितीत रुग्णाशी संबंधित ठरावीक कामाव्यतिरिक्त तो बसूनच असतो. पण मोबदला त्या-त्या संस्थेच्या नियमाप्रमाणे किंवा परस्परांत ठरल्यानुसार द्यावाच लागतो.
समाजात असलेली त्यांची ही वाढती गरज लक्षात घेता वैद्याकीय क्षेत्रात अनेक जण वैयक्तिकरित्याही काळजीवाहक पुरवण्याचं काम करतात. मात्र नोंदणीकृत संस्थेमार्फत आपल्या रुग्णासाठी काळजीवाहक ठेवणं, हे सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. कारण त्या व्यक्तीने पूर्वी केलेलं काम, पडताळणी केलेली तिची वैयक्तिक, कौटुंबिक माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असते. काही अडचणी आल्यास काळजीवाहक आणि ग्राहक दोघांचीही जबाबदारी केंद्रामार्फत घेतली जाते.
वैद्याकीय क्षेत्र असं आहे की जिथे ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’या तत्त्वाचा पुरेपूर अनुभव घेता येतो. या ओढीतूनच रिना कासारे-चंदनशिवे यांनी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर पाच वर्षं एका संस्थेमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला आणि दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:चा ‘नर्सिंग ब्युरो’ सुरू केला. त्या सांगतात, ‘‘या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करताना समाजाला असलेली काळजीवाहकाची वाढती गरज ध्यानात आली. तसंच स्वत:साठी रोजगाराची संधी उपलब्ध करतानाच इतरांनाही त्यांचा फायदा करून देता यावा, या जाणिवेतून मी संस्था सुरू केली. ‘काळजीवाहक’ म्हणून काम देताना कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून अतिशय काळजी घ्यावी लागते. कधी कधी कामावर जायचं सांगून कर्मचारी आगाऊ पैसे मागतात आणि तिथे जातच नाहीत. तर कधी कधी काही जण फोन करून कामाची चौकशी करतात आणि जेव्हा कामावर जायचं असेल तेव्हा फोनच बंद करून ठेवतात. बऱ्याच वेळा प्रसंगावधान राखून आम्हाला निर्णय घ्यावे लागतात. मुख्यत्वेकरून जे ज्येष्ठ नागरिक एकटे घरी राहतात त्यांना सेवा देताना आम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी काही वेळा प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन भेटही द्यावी लागते. जेव्हा चांगली सेवा दिली म्हणून जेव्हा एखाद्या ग्राहकाची पोचपावती मिळते, तेव्हा फार बरं वाटतं. ‘सतर्कता’ आणि ‘सुरक्षितता’ हे जणू जगण्याचे मूलभूत नियम बनून गेले आहेत.’’ खरं तर कित्येक मुलांची, आपल्या आई-वडिलांची सेवा करायची इच्छा असली तरी नोकरी-व्यवसायापायी, वेळेअभावी त्यांना ते पूर्णवेळ करणं शक्य नसतं. तसंच पंचावन्न-साठीतील ज्येष्ठांना आपल्या ८५-९० पार केलेल्या ज्येष्ठ पालकांची शुश्रूषा करणं तब्येतीला झेपत नसल्यामुळे अखेर काळजीवाहक ठेवण्याशिवाय पर्याय उरत नाही. प्रसाद आणि नूतन हे असंच एक साठीकडे वाटचाल करणारं जोडपं. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परगावी. घरात ८० वर्षांचे आईवडील. तब्येतीने उत्तम. पण म्हणतात ना वेळ काळ सांगून येत नाही. प्रसादचे वडील पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि कमरेच्या खुब्याला जबर दुखापत झाली. त्वरित शस्त्रक्रियाही करावी लागली. गुंतागुंत वाढली आणि ते अंथरुणाला खिळले. सुरुवातीला त्यांनी प्रेमानं, आवडीनं वडिलांची सेवा केली. मात्र नंतर ही परिस्थिती अवघड आहे, हे दोघांच्याही ध्यानात आलं. त्यात त्यांच्या मुलाचं लग्नही तोंडावर आलेलं. काळजीवाहकाचा कधीही विचारसुद्धा न केलेल्या त्यांना आता मात्र त्याची नितांत गरज भासली. पूर्ण दिवस काळजीवाहक ठेवल्यामुळे पैसा गेला तरी शारीरिक श्रम वाचले, मानसिक स्थिती चांगली राहिली आणि त्यांना लग्नाची तयारी करणंही सोप्प गेलं.
चांगल्या काळजीवाहकाच्या तुलनेत वाईटच जास्त असतात असा सर्वत्र समज आहे, पण आपलेपणानं काळजी घेणारे, तसंच काही ठिकाणी ज्येष्ठ रुग्णांना त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य होऊन वर्षानुवर्षं सेवा देणारेही खूप जण पाहायला मिळतात. याबाबतीत प्रत्येकाला येणारे अनुभव वेगवेगळे आहेत. यामागे त्या त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची वृत्ती, तडजोड, समजूतदारपणा, माणुसकी याही गोष्टी तितक्याच कारणीभूत आहेत. या क्षेत्रात गेली दहा वर्षं कार्यरत असलेले देविदास पंदीरकर सांगतात, ‘‘कोणाही व्यक्तीच्या कपाळावर काही लिहिलेलं नसतं किंवा त्यांच्या अंतर्मनात आपण घुसू शकत नाही. गेली अनेक वर्षं मी केंद्र चालवत आहे. काळजीवाहक ठेवताना कोणत्याही ग्राहकाचा विश्वास केंद्रावर किंवा तो चालवणाऱ्या मालकावर असतो. आम्ही कर्मचारी ठेवताना त्यांच्या घराचे कागदपत्र, आधारकार्ड, जवळच्या नातेवाईकांचे दूरध्वनी क्रमांक. सर्व महत्त्वाच्या गोष्टींची सखोल पडताळणी करतो. तरीही क्वचित एखाद्या काळजीवाहकाच्या बाबतीत वाईट अनुभव येतो. पुरुष आणि स्त्री काळजीवाहूही चोरी करणं, रुग्णाशी वाईट वर्तन करणं असे प्रकार करतात. त्यावेळी खूप मनस्तापाला सामोरं जावं लागतं. माझ्याकडे जवळपास १२० कर्मचारी आहेत. खरं सांगायचं तर माझ्यासारखी कित्येकांची मुंबईत केंद्रं आहेत. तसेच मोठमोठ्या कंपन्याही या क्षेत्रात आहेत. माणसाचं आयुष्यमान वाढल्यामुळे पार्किन्सन्स, डिमेंशिया, गुडघ्याच्या समस्यांचे वाढते प्रमाण, इतरही दीर्घकालीन आजार यामुळे सद्याकाळात काळजीवाहकांची मागणी खूप आहे, मात्र अतिशय पारख करून काळजीवाहक ठेवावे लागतात. खरं तर केंद्र चालवणं मोठं जोखमीचं आणि जबाबदारीचं काम आहे.’’
आताच्या काळात अनेकांची परदेशी स्थायिक असलेली मुलं किंवा विभक्त राहणारी मुलं आणि त्यांचे वृद्ध आई-वडील एकमेकांच्या सहमतीनं काळजीवाहकाचा पर्याय सहजतेनं स्वीकारताना दिसतात. अविवाहित, नि:संतान, एकेकटे राहणारे ज्येष्ठ जे स्वत:ची दैनंदिन देखभाल करण्यास सक्षम नाहीत; पण आर्थिक बाजू मजबूत असेल तर अशांसाठीही काळजीवाहकाची भूमिका सध्या खूप महत्त्वपूर्ण आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्यांच्या खिशाला हा मार्ग परवडणारा नाही. मग त्यांनी हातपाय जागेवर राहिल्यावर असंच खितपत पडायचं का? त्यांच्या कुटुंबीयांनी कुठवर मानसिक, शारीरिक त्रास काढायचा? की शेवटी वृद्धाश्रम हा पर्याय राहील. पण हा पर्यायही खात्रीलायक आणि परवडण्यासारखा आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतातच. ज्याची उत्तरं सध्या तरी प्रत्येकाची प्रत्येकाने सोडवायला हवीत. सध्या तरी परावलंबी झालेल्या ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी आधार ठरतोय, तो म्हणजे काळजीवाहक. तुमची इच्छा असो वा नको गरज म्हणून तरी हा पर्याय सध्या लोक स्वीकारत आहेत. कालाय तस्मै नम:!