उमा बापट – umaajitbapat@gmail.com

प्रश्न हाताळताना सुलभ, सोपी, कमीत कमी कष्टात आणि लवकर अशी काही उत्तरं मिळावीत अशीच काही लोकांची गोंडस धारणा असते.  सहज उत्तरं मिळाली नाहीत  तर चिडचिड होऊ शकते. प्रश्न सुटेनासे झाले की अस्वस्थता वाढायला लागते.  मुलांचेच नाही कोणत्याही उपक्रमाचे, विचारांचे कृतींचे पालकत्व घेतलं असेल तर ते बिनकष्टाचं असावं  असं मानणंच मुळात अपुरं  आहे. कशाचंही ‘ पालकत्व’ या संकल्पनेतच जबाबदारीमुळे येणारी बांधिलकी,  सातत्य,  न कंटाळणं, आळस न करता परत परत आणि आवश्यक ते कष्ट करत राहाणं हे सामावलेलं असतं..

एकदा एक बाबा त्याच्या छोटय़ा मुलीला घेऊन बाजारात आला होता.  दुकानात गर्दी होती.  रांगेत थांबलेले असताना तो तिच्याशी बोलताना ओझरतं  ऐकू येत होतं. ‘‘ मला आता तुझा  कंटाळा आला आहे, तुला परत शाळेत सोडू का?’’ साहजिक विचार मनात आला, चेष्टेतही कोणी पालकांनी मुलांशी असं बोलावं का? आपल्या मुलांचा आपल्याला कंटाळा येतो म्हणजे नेमकं काय? कंटाळा मुलांचा येतो की पालकत्वातील अंगभूत न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांचा?

कधी कधी मुलं सांगतात, ‘‘ आई म्हणते, तुला हॉस्टेलवर ठेवू का म्हणजे मग मला  तुझा त्रास नाही होणार.’’  त्रास वाटणं  किंवा कंटाळा येणं काही प्रमाणात तरी सापेक्ष असतं.  माणसाला विविध भाव  छटा अनुभवता येतात.  हे तर माणूसपणाचं वैशिष्टय़ आहे. कंटाळा येणं आणि मला कष्ट पडत आहेत किंवा त्रास होत आहे हे जाणवणं गैर नाही.  कंटाळवाणं  झालं किंवा त्रासदायक वाटलं म्हणून आपली जबाबदारी झटकणं, बाजूला  सारणं, त्यात चालढकल करणं  हे अनवधानाने व्हायला लागते का? निशा म्हणाली,  ‘‘मी माझ्या मुलाचा अभ्यास घ्यायला बसले की आमच्या दोघांचीही चिडचिड होते त्यापेक्षा शिकवणी लावलेली परवडली. चिडचिड न होता अभ्यास करायला अजून पर्याय शोधण्याकडे आपण झुकतो का? ऋजुता म्हणाली, ‘‘  मुलाच्या  अभ्यासाच्या वेळी मी सोबत थांबले  म्हणून मला मुलाची पाठांतराची  पद्धत कळली. एकदा वाचून त्याच्या लक्षात राहातं  हे  मला जाणवायला लागलं.  मी सारखं  ‘उजळणी  कर ’ म्हणून त्याच्या मागे लागायचे. त्याने तो  वैतागायचा. त्याला येत असूनही माझ्या समाधानासाठी त्याने का परत परत तीच कविता म्हणायची, जी त्याला पक्की तोंडपाठ झाली आहे. पण मी जर त्याच्याजवळ बसणं सोडून दिलं असतं  तर मला त्याला काय सहज जमतं आणि काय जमत नाही, आवडत नाही किंवा त्याला नेमकी कशासाठी मदत हवी आहे ते कळलं नसतं.  कंटाळा न करता रोज बरोबर बसणं  हे  मात्र मी न चुकता करत गेले. अभ्यास करताना सोबत राहिलो म्हणून आमचं  नातं  अभ्यासापलीकडेही जवळचं  झालं. एखादी गोष्ट स्वत: प्रयत्न करत कशी शिकायची, काय शंका विचारायच्या हे त्याला जाणवायला  लागलं.  तर कुठे त्याला  आपलं आपलं  धडपडू  द्यायचं  आणि कुठे थोडं  सुचवायचं, किंवा उत्तर थेट न संगता ते कसं  शोधायचं  हे  शिकवायला पाहिजे ते मला उमगायला लागलं. मी त्याच्या वैतागण्याला कंटाळून त्याच्या अभ्यासापासून लांब गेले असते तर हे जमलं नसतं.

जसं  कंटाळून चालत नाही तसं  वेळच्या वेळी आवश्यक ते प्रयत्न करण्याची वेळ चुकवूनही चालत नाही.  वैकासिक मानसशास्त्रात योग्य चालनेचं  योग्य वेळी मिळालेलं  योगदान याचं  महत्त्व मांडून ठेवलेलं  आहे. मुलांचा  ठरावीक वाढीचा टप्पा असताना त्याला योग्य चालना मिळाली तर विकासाला ते पूरक ठरतं. जसं  पालथं  पडू पाहणाऱ्या बाळाला मोकळं  खाली खेळायला दिलं  तर मूल आपापलं  पालथं  कसं  पडायला शिकतं  हे सांगता येणार नाही. पण तेव्हाच बाळाला सारखं  दुपटय़ात गुंडाळून कडेवर , मांडीवर घेऊन बसलं  तर मोकळेपणाने हात पाय हलवण्यातून मूल आपापलं  जे शिकतं  त्यात  मदत तर सोडा व्यत्ययही  होऊ शकतो.  जेव्हा  मुलांना पहिल्यांदा चित्र व गोष्ट अशी छोटी पुस्तके स्वत: वाचण्याची गंमत कळते, तेव्हा त्यांची पुस्तकांची भूक खूप असू शकते.  कधी कधी तेच ते पुस्तक परत परत वाचणं  किंवा सारखी नवीन पुस्तकं  मागणं,  असे  दोन्ही प्रकार मुलं करत असतात. तेव्हा उशीर करून त्यांच्या आतल्या ऊर्मीवर पाणी सोडता  कामा नाही.

दरवेळी खूप मोठं काही तरी करणं, म्हणजे मुलाच्या वाढीसाठी कष्ट घेतले असं नसतं. मुलाच्या  वाढीसाठी नेमकी कसली गरज आहे हे बारकाईने लक्षात येणं आणि त्यासाठी त्या—त्या वेळेला छोटी छोटी, पण महत्त्वाची पावलं उचलणं ही पण कष्ट घेण्याची एक आवश्यक पद्धत.  एखाद्या  धडपडय़ा वृत्तीच्या मुलाला एखादं भिंग आणि ते वापरण्याचा खुलेपणा दिला तर तो मुलगा किती प्रयोग करू शकतो हे

‘हर्षू  मोठा होतोय’ या पुस्तकातून वाचण्यासारखं आहे.  सुवर्णा गोखले या पुस्तकात लिहितात,  त्यांचा मुलगा रूढ शालेय पद्धतीत न बसणारा, त्यामुळे शाळेतलं  लेखन, अभ्यास तर सोडा रोज वेळेवर शाळेत जाणं हीसुद्धा अवघड गोष्ट होती. पण या सामान्य अपेक्षा तो पूर्ण करू शकायचा नाही म्हणून आईबाबांनी त्याला  दोष दिला नाही. हताश न होता त्याला समजून घेण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. त्याच्याबरोबर सायकल चालवायला ना बाबांनी आळस केला, ना अंघोळ करायची सोडून तो पाण्यात वेगवेगळे प्रयोग करतो यामुळे आई हतबल झाली.  मुख्य म्हणजे अपार कष्ट आणि वेळेचं  महत्त्व जाणून योग्य वेळी केलेले  जाणीवपूर्वक कष्ट याचं चालतं बोलतं असं हे उदाहरण.

मुलांना कोणत्याही प्रकारची  शारीरिक अक्षमता असेल तर त्या पालकांकडून आळस न करता कष्ट घेणं खरोखर शिकण्यासारखं असतं.  अगदी लहान मुलांना चालता येण्यासाठी वरचेवर घ्यावी लागणारी फिजिओथेरपीची सत्र म्हणजे परत परत एकाच पद्धतीची मेहनत घ्यायला न कंटाळणं.  ‘आमची मुलं आमचं ऐकत नाहीत,’  असं म्हणणाऱ्या पालकांनी कानाने ऐकू न येऊ शकणाऱ्या मुलांच्या पालकांना एकदा तरी भेटावं असं वाटतं.  दीर्घकाळ आजारी असणाऱ्या वृद्धांची काळजी घेणारे नातेवाईक पाहिले तरी जाणवेल की हवे ते परिणाम दिसायला वेळ लागणार असेल किंवा दिसतील का या विषयी अनिश्चितता असेल तरी ही सातत्याने कष्ट करणं न थांबवणं,  हीसुद्धा निरलस श्रमणं याची अजून एक बाजू.

माणसांच्या सांभाळापलीकडे अनेक बाबतीत अथक परिश्रम घ्यावे लागतात.   सध्याच्या परिस्थितीतील महत्त्वाचं असं एक उदाहरण म्हणजे ओला कचरा, सुका कचरा वेगळं करणं, जिरवणं, त्यातून काही रोपं पिकवणं,  ही सवय एखाद्या व्यवसायाच्या यंत्रणेत बसवणं.  यासाठी झटणारे एक स्नेही आहेत. वारंवार कृतीतून आणि संवादातून महत्त्व पटवून देऊन त्यांनी महानगरपालिकेने या उपक्रमाची सन्मानपूर्वक दखल घ्यावी, इतका लांबचा आणि मोठा टप्पा  सगळ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गाठला; ते निरलस श्रमल्यामुळे.

एका अंध मुलीचे भरतनाटय़म बघण्याची संधी मिळाली. तिच्याबरोबरच तिला शिकवणाऱ्या  गुरूंचंही कौतुक वाटलं.  वेगळ्या पद्धतीनं  शिकवायलासुद्धा कष्ट पडू शकतात. आपल्याला तजवीज पडणार नाही अशा शिकवण्याच्या पद्धती वापरायच्या  असा काही शिक्षकांचाही पिंड असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांंच्या गरजांनुसार शिक्षकांनी शिकवणं हा शिक्षणाचा गाभा.  कोणाला सोपं करून सांगितल्यावर कळणार तर कोणाला चित्र काढून दाखवल्यावर. असं शिक्षकांचं निरलस श्रमणं असेल तर शिक्षण मूलकेंद्री होऊ शकतं.  अनेक ठिकाणी अधीर, उतावीळ होऊन चालत नाही.  लोकसेवा आयोगाच्या किंवा यासारख्या स्पर्धा  परीक्षा देणाऱ्या  तरुण मुलांच्या पालकांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांनासुद्धा धीर बाळगावा लागतो. पदवीनंतर नोकरी मिळालेली असतानादेखील काही तरुण तो मार्ग बदलून व्यवसायाकडे वळतात, शेती करून बघतात, सामाजिक कामात उतरतात  तेव्हा त्यांचे श्रम असतातच. त्यांच्याबरोबर मानसिक स्वीकार, कधी आर्थिक निश्चिंतता, स्थायिक होण्याचं दडपण न देणं असे मानसिक बदलांचे कष्टही पालकांना घ्यावे लागतात. अशा अर्थानेही पालकांचं निरलस श्रमणं  ही नित्य बाब आहे.

पण कोणी एकाने  कष्ट करायचे याचा अर्थ असा नाही की संबंधित इतरांना आळशी बनवून सोडायचे. त्यांना सगळं चमच्यानं भरवायचं. आपण विचार करू या की मी कोणत्याही गोष्टीसाठी अभ्यासपूर्वक, योग्य दिशेने मेहनत घेतो का ? की मेंढय़ांचा कळप चालला आहे त्यात पुढे मागे न बघता चालू लागतो?  काही मिळवण्यासाठी ‘ काहीही करण्याची’ तयारी असणं. याचा  विपर्यास तर होत नाही ना . मुलाला अमूक तमूक शिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी पालक म्हणून माझी धडपड कोणत्या मूल्यांवर ठरते?

आळस न करता श्रमाचं मोल माझ्याबरोबर माझ्या मुलांपर्यंत, सहकाऱ्यांपर्यंत पोहचतयं का ? त्यासाठी मी आवर्जून काय करतो? मुलाला कधी बस, सायकलने  परीक्षेच्या दिवशीही जाताना कष्ट पडले तरी आपण पाहू तरी शकतो का ? इथपासून सुरुवात असू शकते.

आळसाला विसरून रोज काही श्रम आनंदाने घेऊ या.  जबाबदार व्यक्ती म्हणून जगण्यातील  हे निरलस श्रमणं व्रतासारखं जपू या.  कष्टातही निवांत रमू या.  कष्टाचंही नि:स्पृह देणं देऊ या. निश्चिंत मनाने न कंटाळता ऐकू या.  निर्मळतेचे अथक परिश्रम आपल्या आणि अनेकांच्या निरामय घरटय़ासाठी..