जगातील सर्वात महागड्या भाजीची किंमत एक लाख रुपये प्रति किलो आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भाजीची प्रायोगिक तत्वावरील लागवड बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केलीय. या भाजीचं नाव आहे हॉप शूट्स. खरं तर या भाजीचं उत्पादन ११ व्या शतकामध्ये करण्यात आलं आहे. ही वनस्पती त्यावेळी बियरमध्ये फ्लेवर आणण्यासाठी वापरली जायची. नंतर या वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून आणि आता थेट भाजी म्हणून करण्यात येऊ लागलाय. शूट्सला एवढी किंमत असण्यामागील कारण म्हणजे या वनस्पतीमध्ये दोन खास प्रकारची अ‍ॅसिड मिळतात. या अ‍ॅसिडची नावं आहे ह्यूमोलोन्स आणि ल्यूपोलोन्स. या अ‍ॅसिडच्या मदतीने मानवी शरीरामध्ये अनियंत्रित पद्धतीने वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींवर उपचार करता येतो असं मानलं जातं. कॅन्सरसारख्या आजारावर मात मिळवण्यासाठी या वनस्पतीमधील अ‍ॅसिड उपयोगी असल्यानेच तिला एवढा भाव मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील नवीननगर ब्लॉकमधील करमडीह गावातील ३८ वर्षीय शेतकरी अमरेश सिंह हे या भाजीचं उत्पादन घेणारे पहिले भारतीय शेतकरी ठरलेत. सहा वर्षांपूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये एका किलो हॉप शूट्स एक हजार पौंडांना विकले होते. भारतीय चलनानुसार ही किंमत किलोमागे एक लाख रुपये इतकी होते. अर्थात ही भाजी इतकी महाग असल्याने ती भारतात खूपच कमी मिळते. खरं तर विशेष मागणी केल्यानंतर ती उपलब्ध करुन दिली जाते.

अमरेश सिंह यांनी यासंदर्भात द न्यू इंडियन एक्सप्रेशशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॉप शूट्सच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासंर्भात काही निर्णय घेतले तर या वनस्पतीच्या शेतीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय शेतकऱ्याची कमाई आतापेक्षा किमान दहा पटींनी वाढवता येईल. सध्या ऑप शूट्सची शेतकी वाराणसीमधील भारतीय भाजी अनुसंशाधन संस्थेमधील कृषी संशोधक असणाऱ्या डॉ. लाल यांच्या देखरेखीखाली केली जात आहे. आयएएस अधिकारी असणाऱ्या सुप्रिया साहू यांनी अमरेश यांच्या या प्रायोगिक शेतीसंदर्भातील ट्विट केलं असून सध्या ते व्हायरल झालं आहे. “एक किलो भाजीची किंमत एक लाख रुपये इथकी आहे. ही जगातील सर्वात महागडी भाजी आहे. बिहारमधील अमरेश सिंह हे भारतामध्ये या भाजीचं उत्पादन घेणारे पहिले शेतकरी आहेत. भारतीय शेतकऱ्यांसाठी ही भाजी गेम चेंजर ठरु शकते,” असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.

अमरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी या संस्थेमधून हॉप शूट्सचे बियाणे आणून आपल्या शेतात लावलं आहे. आपल्या मेहनतीला नक्की यश येईल आणि या भाजीच्या माध्यमातून बिहारमधील शेतीमध्ये क्रांती घडेल, असा विश्वास अमरेश यांना आहे.  हॉप शूट्सच्या फळाचा, फुलाचा आणि मुळांचाही उपयोग केला जातो. पेय बनवण्यासाठी, बियर तयार करण्यासाठी आणि औषधं बनवण्यासाठी हॉप शूट्सचा वापर केला जातो. काही बातम्यांनुसार या वनस्पतीच्या मुळांचा वापर टीबीवरील औषधं बनवण्यासाठीही केला जातो.

युरोपीयन देशांमध्ये हॉप शूट्स या भाजीला औषधी वनस्पती म्हणून खूप मागणी आहे. येथे या वनस्पतीचा उपयोग त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी केला जातो. या वनस्पतीमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या वनस्पतीपासून बनवलेल्या औषधांचा वापर पचन संस्थेसंदर्भातील तक्रारींवरही केला जातो. तसेच डिप्रेशन आणि अस्वस्थपणासारख्या मानसिक आजारांवरही ही वनस्पती फायद्याची ठरते.

हॉप शूट्सची शेती ब्रिटन, जर्मनी आणि इतर युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतामध्ये यापूर्वी या भाजीच्या उत्पदानचा प्रयत्न हिमाचल प्रदेशमधील सरकारी कृषी संस्थेत करण्यात आलेला. मात्र खूप महाग असल्याने तिची बाजारात विक्री करण्यात आली नव्हती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar aurangabad district farmer grows hop shoots that sell for rs 1 lakh a kg ias officer calls it game changer scsg
First published on: 01-04-2021 at 15:59 IST