गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते देशासाठी घातक ठरेल, असे वक्तव्य पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले असले तरी मोदी यांची लोकप्रियता आता दक्षिणेकडील राज्यातही वाढत चालली असल्याचे उघड झाले आहे. ‘नमो पेरावाई’ (नमो चळवळ) ही बिगर राजकीय संघटना युवकांनी स्थापन केली असून तामिळनाडूतील चहाच्या किमान २०० टपऱ्यांना मोदी यांचे नाव देण्याचे संघटनेने ठरविले आहे.
सदर चळवळीचे समन्वयक प्रवीण श्रीनिवासन यांनी याबाबतची घोषणा शुक्रवारी केली. इरोड जिल्ह्य़ातील चित्तूर येथे मोदी यांच्या नावाने चहाची एक टपरी सुरू करण्यात आली असून अन्य सात टपऱ्या शहरांत सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, असे श्रीनिवासन म्हणाले.
युवकांनी आणि समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन ही चळवळ सुरू केली असून आमची संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. राज्यभरांत सर्वत्र आणि दुर्गम भागांत बैठकांचे आयोजन करून मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणे कसे गरजेचे आहे, यावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे, असेही श्रीनिवासन म्हणाले.
चहाच्या टपरीवाल्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून किराणा मालाच्या काही दुकानदारांनीही दुकानाला मोदी यांचे नाव देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. ‘नमो गीतम’ हे शीर्षक असलेल्या गाण्याच्या सीडीचेही रविवारी प्रकाशन करण्यात येणार असून त्या वेळी तामिळनाडूतील भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माहिती तंत्रज्ञान, विद्यार्थी, व्यापारी आणि उद्योगपती असे विविध स्तरांमधील घटक एकत्र आले असून ही चळवळ सुरू करण्यात आल्याचे श्रीनिवासन म्हणाले.