एका २४ वर्षांच्या महिलेचा लैंगिक छळ करत तिला उबर या टॅक्सीत कोंडल्याबद्दल आणि तिला धमकावल्याबद्दल टॅक्सीचालकाला अटक करण्यात आली आहे. दिल्लीत हा प्रकार घडला. महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच उबर टॅक्सीही जप्त केली आहे. संजीव अलीस संजू असे या चालकाचे नाव आहे अशी माहिती दिल्लीचे वाहतूक पोलीस उपायुक्त अस्लम खान यांनी दिली. या चालकाला हरयाणा येथील एका गावातून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आहे. या कारला पिवळी नंबर प्लेट नाही. टुरिस्ट गाड्यांसाठी ही नंबर प्लेट आवश्यक असते पण ती लावण्यात आलेली नाही असेही खान यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर उबर या टॅक्सी सेवेने आपल्या यादीतून आणि अॅपवरून या ड्रायव्हरचे नाव हटवले आहे. उबरच्या प्रवक्त्याने या संदर्भातली माहिती दिली. तसेच या चालकाविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचेही उबर प्रशासनाने म्हटले आहे. संजीव संजू हा उबरचा नोंदणीकृत ड्रायव्हर नाही. ही कार ज्या चालकाच्या नावावर नोंदवण्यात आली आहे त्याने ही कार संजीवला चालवायला कशी दिली? याची माहिती आम्ही घेत आहोत तसेच त्याचे नाव चालकांच्या यादीतून हटवले आहे असेही उबरच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

पीडित महिला दिल्लीत रोहिणी परिसरात राहते. तिने काही कामानिमित्त शुक्रवारी उबर टॅक्सीने जायचा पर्याय निवडला. तिला संध्याकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान उबर कार घ्यायला आली. या कारला पिवळी नंबर प्लेट नाही ही गोष्टी तिच्या लक्षात आली होती तरीही या पीडित महिलेने या कारमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळातच चालक मोबाइलवर जे बोलत होता ते या महिलेने ऐकले. तो कोणासोबत तरी मद्यसेवन करण्यासाठी येतो असे सांगत होता. यानंतर या महिलेला हा ड्रायव्हर उबरचा नसावा असा संशय आला. त्यानंतर महिलेने मोबाइल अॅपवर कारचे डिटेल्स टाइप केले तेव्हा तिला ही गाडी दुसऱ्या चालकाची असल्याचे समजले. या सगळ्या दरम्यान तिला हे देखील लक्षात आले की ड्रायव्हर आपल्याला वर्दळ नसलेल्या रस्त्यावरून घेऊन जातो आहे.

मुकरबा चौकात या महिलेने कारमधून उडी टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र ड्रायव्हरने सेंट्रल लॉकिंग सिस्टिम ऑन केली होती. त्यामुळे कारचे सगळे दरवाजे बंद झाले होते. त्यानंतर या ड्रायव्हरने तिला अश्लील इशारे केले. घाबरलेली महिला ओरडू लागली पण तिचा आवाज बंद काचांमुळे कोणापर्यंतही पोहचला नाही. त्यानंतर जहांगीरपुरीजवळ ही कार आली. CNG पंपाजवळ कार येताच या महिलेने कारचे दरवाजे अनलॉक केले. कारमधून उडी मारून स्वतःची कशीबशी सुटका केली अशी माहिती खान यांनी दिली.

या घटनेनंतर या महिलेने पोलीस ठाणे गाठले. आम्ही संजीव संजू विरोधात अपहरण, लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच उबरकडून आम्हाला ही कार ज्या चालकाच्या नावावर नोंद केली आहे त्याचेही तपशील मिळाले आहेत असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 year old uber cab driver arrested for allegedly abducting and molesting a women passenger