जम्मू काश्मीर पोलिसांनी एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी डॉक्टर आदिल अहमदला अटक केली आहे. त्याच्याकडे ३०० किलो स्फोटकं, दारु-गोळा, एक एके ४७ रायफल हे सगळं सापडलं असून ते पोलिसांनी जप्त केलं आहे. तसंच मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे.
८ नोव्हेंबरला काय घडलं?
८ नोव्हेंबरला मोठी कारवाई करत अनंतनागच्या माजी डॉक्टर आदिल अहमदला अटक केली. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये आदिल शिकवत होता. त्याच्याकडे एके ४७ रायफल असल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. जेव्हा दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून डॉ. आदिलला अटक केली. आदिलची चौकशी सुरू आहे आणि त्याने फरीदाबादमध्ये स्फोटके साठवल्याचे कबूल केले आहे. आदिल पूर्वी अनंतनाग येथील जनरल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. त्याने २०२४ मध्ये तिथून राजीनामा दिला आणि त्यानंतर सहारनपूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. ८ नोव्हेंबर रोजी, डॉ. आदिलच्या माहितीच्या आधारे, आणखी एक डॉक्टर मुजाहिल शकील याला पुलवामा (काश्मीर) येथून अटक करण्यात आली.
डॉ. आदिलकडून ४८ गोष्टी जप्त
डॉ. आदिल अहमदने तीन महिन्यांपूर्वी फरीदाबादमधील धौज गावात एक खोली भाड्याने घेतली होती. आरोपी डॉक्टर तिथे राहत नव्हता; त्याने फक्त त्याचे सामान ठेवण्यासाठी खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांकडून खोलीतून १४ बॅगा जप्त करण्यात आल्या, ज्यामध्ये ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल, पाच लिटर रसायने, ८४ काडतुसे आणि दोन स्वयंचलित पिस्तूल होते. फरिदाबाद पोलिस सूत्रांनुसार, बॉम्ब बनवण्याच्या उपकरणांसह ४८ वस्तू जप्त करण्यात आल्या. छापा मारताना १० ते १२ वाहने घटनास्थळी आली. जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांशी संबंध असल्याचे तपासलं जातं आहे. इंडिया टुडे ने हे वृत्त दिलं आहे.
९ नोव्हेंबरला गुजरात एटीएसने अहमदाबादमधील अदलाज येथून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. एटीएस टीम गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर एटीएसने रविवारी सकाळी तिघांना अटक केली. तपासात हे तिघेही आयसिससाठी काम करत असल्याचे उघड झाले. उत्तर प्रदेशातील दोघे, तर हैदराबादचा एक. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की अटक केलेल्या संशयितांपैकी दोघे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत, तर तिसरा दहशतवादी हैदराबादचा रहिवासी आहे. हे तिघेही उत्तर प्रदेशातून गुजरातमधील अदलाज येथे गेले होते. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, ३० काडतुसे आणि मोठ्या प्रमाणात रसायने जप्त करण्यात आली आहेत.
देशभरातील अनेक ठिकाणी हल्ल्यांचे नियोजन
देशभरातील अनेक ठिकाणी हल्ल्यांचे नियोजन करण्यात आले होते. एटीएसला माहिती मिळाली आहे की दहशतवादी शस्त्रे साठवण्यासाठी गुजरातमध्ये येत आहेत आणि देशभरातील अनेक ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखत आहेत. हे तिघेही दहशतवादी दोन वेगवेगळ्या मॉड्यूलचे भाग आहेत. एटीएसच्या रडारवर असलेल्या दहशतवादी देशातील कोणत्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखत आहेत हे शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
