भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर काल (२८ जून) सायंकाळी उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला. देवबंद या ठिकाणी ते कारने जात होते. तेव्हा काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार गेला. या गोळीबारात चंद्रशेखर आझाद जखमी झाले आहेत. एक गोळी कारच्या दरवाजातून आरपार जाऊन आझाद जखमी झाले. ही गोळी त्यांच्या बरगडीला चाटून गेली. दरम्यान, याप्रकरणातील चार हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या मारूती स्विफ्ट डिझायर या चारचाकीने आले होते. ही चारचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. चंद्रशेखर त्यांच्या फॉर्च्यूनर कारने देवबंद दौऱ्यावर निघाले होते. देवबंदजवळ पोहोचले तेव्हा अचानक काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. गोळी त्यांच्या बरगडीला चाटून गेली आहे. त्यांच्या कारवर अनेक गोळ्यांचे ठसे दिसत आहेत. कारच्या सगळ्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरू केला आहे.
हेही वाचा >> VIDEO: गोळीबारानंतर जखमी अवस्थेत चंद्रशेखर आझाद यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हल्लेखोरांची गाडी…”
पोलिसांकडून नाकेबंदी
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर ज्या कारने आले होते, त्या कारचा नंबर हरियाणात नोंदणीकृत आहे. हल्लेखोर पळून जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी देवबंदसह सहारनपूर परिसरात अनेक ठिकाणी नाकेबंदी केली होती. यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले गेले.
चंद्रशेखर आझाद म्हणाले, “मला आठवत नाही. मात्र, माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी हल्लेखोरांना ओळखलं आहे. हल्लेखोरांची गाडी सहारनपूरच्या दिशेने गेली. आमच्या गाडीत एकूण पाच लोक होते. गोळीबार झाल्यावर आम्ही यू टर्न घेतला. त्यानंतर काय घडलं मला माहिती नाही.”
“गोळीबार झाल्यावर मी सहारनपूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला”
गोळीबार झाल्यावर मी सहारनपूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला. तसेच माझ्यावर गोळीबार झाल्याची त्यांना माहिती दिली. मला वेदना होत आहेत. त्यामुळे मला गोळी लागली असावी, असंही त्यांना सांगितल्याची माहिती आझाद यांनी दिली.
“माझं कुणाशीही काही भांडण नाही”
कुणावर काही संशय आहे का असं विचारल्यानंतर चंद्रशेखर आझाद म्हणाले की, माझं कुणाशीही काही भांडण नाही. त्यामुळे कुणावर संशय नाही.