मुंबईसह देशातील महानगरांमध्ये पाच किलोचे एलपीजी गॅस सिलिंडर निवडक पेट्रोल पंपांवर किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय आता तुम्ही तुमचा एलपीजी गॅस वितरकही केवळ एक बटन दाबून बदलू शकणार आहात. चांगली सेवा मिळण्यासाठी गॅस वितरक बदलून घेण्याची ही सुविधा महाराष्ट्रात पुणे, मुंबई व नागपूर या शहरांत लागू होणार आहे.
तेल मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार तुम्ही आता एलपीजी कनेक्शन वितरक बदलून घेऊ शकता ती प्रक्रिया खूप सोपी करण्यात येत आहे.
ग्राहकराजा
यापुढे तुम्ही जर तुमच्या गॅस वितरकाच्या सेवेबाबत नाराज असाल तर तुम्ही दुसऱ्या वितरकाची सेवा घेऊ शकता. फक्त दुसरा वितरक निवडताना तुम्हाला तो तुमच्या भागातील निवडावा लागणार आहे. देशभरात तीस शहरांत ही सुविधा दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर या शहरांतील ग्राहकांना याचा लाभ मिळेल.
नवे काय? पाच किलोचे स्वयंपाकासाठीचे गॅस सिलिंडर तेल कंपन्यांच्या मालकीच्या असलेल्या पेट्रोल पंपांवर उपलब्ध केले जाणार आहेत. देशात एकूण ४७००० पेट्रोल पंप असून त्यातील केवळ तीन टक्के कंपन्यांच्या मालकीचे आहे, त्यामुळे तुलनेने असे गॅस सिलिंडर पेट्रोल पंपावर मिळण्यात बऱ्याच मर्यादा असणार आहेत. हे गॅस सिलिंडर बाजारपेठ दरानुसार विकले जाणार आहेत, त्यामुळे ते महाग असेल.
फायदा कोणाला?पेट्रोल पंप बऱ्याच उशिरापर्यंत सुरू असल्याने आयटी व्यावसायिक, बीपीओ कर्मचारी, विद्यार्थी किंवा कामाच्या वेगवेगळय़ा वेळा असलेल्या लोकांना या सिलिंडरचा फायदा होणार आहे.
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर हे सिलिंडर मिळतील. प्रत्येक महानगरात १०-१२ पेट्रोल पंपांवरच ते उपलब्ध असतील. बंगलोर येथे ५ ऑक्टोबरला योजनेचा शुभारंभ होईल. हे सिलिंडर दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई व बंगलोर येथे उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
– वीरप्पा मोईली, पेट्रोलियममंत्री