ओडिशातील पुरी येथील भगवान विष्णूचे जगन्नाथ मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात देश-विदेशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. आता भगवान जगन्नाथ मंदिराच्या संपत्तीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. जगन्नाथ मंदिराकडे ६०,८२२ एकर जमीन आहे. ओडिशासह ७ राज्यांत ही जमीन आहे.
बीजू जनता दलाचे ( बीजेडी ) आमदार प्रशांत बेहरा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला कायदामंत्री जगन्नाथ सरका यांनी उत्तर देताना ही माहिती दिली. ओडिशातील ३० पैकी २४ जिल्ह्यात महाप्रभू जगन्नाथ बीजे, श्री क्षेत्र पुरी यांच्या नावावर ६०,४२६ एकर जमीन आहे.
यापैकी ३८,०६१.८९२ एकर जमीन मंदिर प्रशासनाच्या ताब्यात आहे. तसेच, गुजरातसह सहा राज्यांत ३९५.२५२ एकर जमीन जगन्नाथ मंदिराच्या नावावर आहे, असं सरका यांनी सांगितलं.
जमिनीवर करण्यात आलेली बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विविध तालुक्यांत ९७४ ठिकाणी तक्रार नोंद केली आहे. जगन्नाथ मंदिर अधिनियम १९५५ च्या कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री सरका यांनी दिली.