Punjabi Grandmother Deported From US : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे जगभरात पडसाद पाहायला मिळत आहेत. ट्रम्प प्रशासनाकडून देशातील बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात देखील मोहिम उघडण्यात आली आहे. यादरम्यान एका ७३ वर्षीय आजींचे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे.

या आजी ३० वर्ष अमेरिकेत राहिल्या. त्यांनी सर्वकाही योग्य पद्धतीने केल, त्यांनी काम केले, कर भरला आणि कधीही इमिग्रेशन तपासणीची तारीख चुकवली नाही, पण त्यांना क्रूरपणे देशाबाहेर काढण्यात आले. इतकेच नाही तर विमानात त्यांना त्यांची औषधे देखील नाकारण्यात आली, ताब्यात असताना त्यांना अगदी थंडगार जेवण देण्यात आले.

या वर्तणुकीबद्दल हरजीत कौर यांनी त्यांची वेदना माडली आहे. “इतका दीर्घकाळ तिथे राहिल्यानंतर, तुम्हाला अचानक ताब्यात घेतले जाते आणि अशा प्रकारे हद्दपार केले जाते, हे सहन करण्यापेक्षा मरण बरं . अशा परिस्थितीत एखाद्याने जिवंत राहू नये,” असे हरजीत कौर दुःख व्यक्त करताना म्हणाल्या.

टाइम्स ऑफ इंडियाशी गुरूवारी बोलताना त्यांनी सांगितले की, “माझ्या पायांकडे पाहा, ते शेणाच्या गोळ्यांसारखे सुजले आहेत. मला ना औषधे मिळाली ना मला चालता येत आहे .”

हरजित कौर या गुरुवारी दुपारी नवी दिल्लीत दाखल झाल्या आणि त्यांनी त्यांच्या बहिणीच्या घरी मोहाली येथे जात असताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यातील पंगोता गावाच्या मूळ रहिवासी असलेल्या कौर या पती सुखविंदर सिंग यांच्या निधनानंतर सुमारे ३३ वर्षांपूर्वी आपल्या दोन मुलांसह अमेरिकेत गेल्या होत्या.

कौर या सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये राहत होत्या आणि बर्कले येथील एका कापड दुकानात काम करत होत्या. चालू वर्षात जानेवारीमध्ये त्यांच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे (complications) त्यांना काम सोडावे लागले. त्यांना
८ सप्टेंबर रोजी इमिग्रेशन अधिकाऱ्यांबरोबर नियमित तपासणीसाठी गेल्या असताना ताब्यात घेण्यात आले.

त्यांचा आश्रयासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता, त्यांचा असा अखेरचा अर्ज २०१२ मध्ये फेटाळण्यात आला होता. त्यानंतर कौर यांना बेकर्सफिल्ड येथील Mesa Verde IC Processing Centre मध्ये हलवण्यात आले.

“मला ताब्यात घेतले गेल्यानंतर इतका संताप आणि माझ्याबद्दल सहानुभूती व्यक्त होत असतानाही अमेरिकन अधिकारी जराही हलले नाहीत,” असे त्या म्हणाल्या. त्यांना जॉर्जियाहून आर्मेनिया आणि नंतर नवी दिल्ली येथे विमानाने आण्यात आले. त्यांच्याबरोबर इतरही १३२ जण होते, ज्यापैकी बहुतांश जण पंजाबी होते. १३२ लोकांमध्ये ज्यांना साखळदंडाने बांधलेले नव्हते किंवा हातकड्या घालण्यात आल्या नव्हत्या अशा त्या एकमेव व्यक्ती होत्या.

अमेरिकेतील त्यांच्या घराला योग्यपणे निरोप देणेही कौर यांना जमले नाही, याबद्दल त्यांनी वेदना बोलून दाखवली. “मी माझ्या सामानाची देखभालीसाठी एकदाही परत जाऊ शकलो नाही, ते मी सोडून आले तसंच पडलं होतं,” असे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. भारतात परतल्यावर त्या म्हणाल्या की त्या बऱ्या आहेत आणि सध्या ती मोहालीमध्ये तिच्या बहिणीसोबत राहतील.

कौर यांनी त्यांच्याबरोबर देशाच्या बाहेर काढण्यात आलेल्या लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. “त्यांनी तेथे जाण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. त्यापैकी काहींनी १० महिने ते एक वर्ष तुरूंगात घालवले होते आणि आता ते रिकाम्या हाताने परतत आहेत. अमेरिकेत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांची जमीन विकली असल्याने ते चिंतेत होते,” असे त्या म्हणाल्या.