Rajasthan Schoolgirl Heart Attack: हृदयविकाराच्या धक्क्याचे प्रमाण तरूणांमध्ये वाढत असतानाच आता लहान मुलांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याचे धक्कादायक प्रसंग घडत आहेत. राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात एका शाळेत अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. ९ वर्षांच्या मुलीने शाळेत मधल्या सुट्टीत खाऊचा डबा उघडला आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर विद्यार्थीनीला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता तिथेही तिला दुसरा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राची कुमावत ही सिकर जिल्ह्यातील आदर्श विद्या मंदीर शाळेत इयत्ता चौथीत शिकत होती. शाळेचे मुख्याध्यापक नंद किशोर म्हणाले की, मंगळवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. प्राचीने डबा उघडताच ती खाली पडली. त्यावेळी आम्ही शाळेच्या मैदानात होतो. सदर घटना समजल्यानंतर आम्ही तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

नंद किशोर पुढे म्हणाले, शाळेत विद्यार्थी बेशूद्ध पडत असतात. आम्ही त्यांना पाणी वैगरे पाजून थोडा वेळ आराम करायला सांगतो आणि ते बरे होतात. पण प्राचीची परिस्थिती वेगळीच दिसत होती. म्हणून आम्ही तिला ५०० मीटर अंतरावरच असलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिची काळजी घेतली आणि सुरुवातीला ती बरी झाल्याचे दिसून आले.

“सामुदायिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तिला सिकल येथील रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली आणि सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र त्याचवेळी तिला हृदयविकाराचा दुसरा धक्का आला. डॉक्टरांनी लागलीच तिला एक इंजेक्शन दिले आणि रुग्णवाहिका तातडीने पाठवून दिली”, अशी माहिती नंद किशोर यांनी दिली.

मुख्याध्यापक पुढे म्हणाले की, आरोग्य केंद्रातून १२.१५ च्या दरम्यान रुग्णवाहिका निघाल्यानंतर ती रुग्णालयात गेली की नाही, याची माहिती आमच्याकडे नाही. पण दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास प्राचीचा मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला समजली.

मंगळवारी सायंकाळी प्राचीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्याध्यापक नंद किशोर म्हणाले, ती फक्त ९ वर्षांची होती. ती अभ्यासात हुशार होती. तिला ४० पर्यंतचे पाढे पाठ होते. ती अतिशय उत्साही आणि आनंदी मुलगी होती. शिक्षक तिला ओरडले तरी ती स्मितहास्य करायची.

रुग्णालयातील डॉ. आरके जांगिड म्हणाले की, मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. शाळेत तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला. तिचे शवविच्छेदन करण्यात आले नसले तरी सामुदायिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी हा हृदयविकाराचा झटका असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी प्राथमिक उपचार दिल्यानंतर तिची प्रकृती काही वेळासाठी सुधारलीही होती. मात्र लगेचच दुसरा हृदयविकाराचा झटका आला. तिथून सिकरमधील शासकीय रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.