‘आप’च्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने लक्ष्मीनगर मतदारसंघाचे आमदार विनोद बिन्नी नाराज असल्याची माहिती समोर आली होती. यावर बिन्नी आज (बुधवार) सकाळी स्पष्टीकरण देत माझ्यात आणि पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे.
दिल्लीत सत्तास्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची बैठक घेऊन ‘आप’ल्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांची नावे निश्चित केली. त्यात बिन्नी यांना स्थान मिळालेले नाही.
बिन्नी म्हणाले, माझ्या आणि पक्षाच्या मतांमध्ये कोणताही दूरावा नाही. मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून कोणत्याही प्रकारची नाराजी मी व्यक्त केलेली नाही. उलट मीच स्वत:हून मंत्रीपद नाकारले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या बैठकीत सहा मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आल्यानंतर आमदार विनोद बिन्नी पक्षाची बैठक अर्धवट सोडून निघून गेले. आपण आताच काही बोललो, तर मोठ्या वादास आमंत्रण मिळेल एवढीच प्रतिक्रिया देऊन बिन्नी बैठकस्थानाहून निघून गेले होते. यानंतर ‘आप’चे नेते संजयसिंह आणि कुमार विश्वास मंगळवारी रात्री उशीरा बिन्नी यांच्या घरी गेले. त्यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याच्या चर्चा चुकीच्या असल्याचे बिन्नी यांनी स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A day after walking out of aap meeting binny denies rift with kejriwal and party