पीटीआय, संयुक्त राष्ट्रे

इस्रायल-हमास युद्धादरम्यान गाझा पट्टीत मानवतावादी मदत पोहोचवणे शक्य व्हावे यासाठी युद्धविराम घेतले जावेत अशी सूचना करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बुधवारी मंजूर होऊ शकला नाही. इस्रायलच्या स्वसंरक्षणाचा उल्लेख नसल्यामुळे नाराज असल्याचे कारण देत अमेरिकेने त्याविरोधात  नकाराधिकार वापरल्यामुळे ठराव मंजूर झाला नाही.  सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद असलेल्या ब्राझीलने ठरावाचा मसुदा तयार केला होता. परिषदेच्या १५ सदस्य राष्ट्रांपैकी १२ राष्ट्रांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. उर्वरित तीनपैकी रशिया आणि ब्रिटनने मतदानात सहभाग घेतला नाही. अमेरिकेने नकाराधिकार वापरल्यामुळे ठराव मंजूर झाला नाही. अमेरिका हा सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य असून इस्रायलचा मित्र देश आहे.

गाझामधील लोकांना मदत सामग्री पोहोचवण्यासंबंधीचा दोन दिवसांत दुसऱ्यांदा मांडलेला ठराव मंजूर होऊ शकला नाही. याआधी सोमवारी रशियाने युद्धामध्ये मानवतावादी युद्धविरामाचा ठराव मांडला होता. मात्र, त्यामध्ये हमासचा उल्लेख नव्हता. बुधवारी मांडण्यात आलेल्या ठरावात नागरिकांविरोधातील सर्व प्रकारच्या हिंसा व शत्रुत्वाचा आणि सर्व दहशतवादी कृत्यांचा निषेध करण्यात आला. तसेच हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचाही निषेध करण्यात आला होता.

हेही वाचा >>>आझम खान यांना पत्नी-मुलासह सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा

द्विराष्ट्रीय तोडग्याला पाठिंबा – बायडेन

इस्रायल आणि पॅलेस्टिनी लोक या दोघांनाही प्रतिष्ठेने आणि शांततेत सुरक्षितपणे जगता यावे यासाठी द्विराष्ट्रीय तोडग्याला पाठिंबा असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी युद्धग्रस्त गाझा आणि पश्चिम किनारपट्टीसाठी मानवतावादी मदत म्हणून १० कोटी डॉलर मदतीची घोषणा केली. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांची भेट घेतल्यानंतर बायडेन यांनी यासंबंधी मतप्रदर्शन केले. ते म्हणाले की, ‘अमेरिका आणि इस्रायलसारख्या विवेकबुद्धी राखणाऱ्या देशांचे मोजमाप केवळ ताकदीच्या आधारे केले जात नाही तर आम्ही घालून दिलेल्या उदाहरणांनी केले जाते. त्यामुळे कितीही कठीण असले तरी आम्ही शांतता कायम राखण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे’. द्विराष्ट्रीय तोडग्याने इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या लोकांना सुरक्षितपणे सन्मानाने आणि शांततेत जगता येईल असा विश्वास बायडेन यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा >>>रुग्णालयावरील स्फोटानंतर आरोप-प्रत्यारोप; गाझामध्ये किमान ५०० जणांचा मृत्यू

रुग्णालयावरील हल्ल्यानंतर आरोप-प्रत्यारोप

गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयावर मंगळवारी रात्री झालेला बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनीच हा स्फोट झाल्याचा आरोप हमासने केला. मात्र, इस्रायलने तातडीने हा आरोप फेटाळून लावला. ‘इस्लामिक जिहाद’ या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेने डागलेले रॉकेट दिशा भरकटून रुग्णालयावर आदळले असा दावा इस्रायलच्या सैन्याकडून करण्यात आला. इस्रायलच्या हवाई हल्ल्याने हा स्फोट झाला असता तर घटनास्थळी मोठा खड्डा पडला असता. मात्र, असा कोणताही खड्डा तिथे पडलेला नाही असे लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

पश्चिम आशियाई देशांमध्ये संतापाची लाट

रुग्णालयावरील स्फोटामुळे पश्चिम आशियाई देशांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्रायलला पोहोचण्याच्या काही तासच आधी हा स्फोट झाला. त्याचा बायडेन यांच्या पश्चिम आशिया दौऱ्यावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. इस्रायल आणि हमासदरम्यानच्या युद्धामुळे संपूर्ण प्रदेश युद्धाकडे ढकलला जात आहे, अशी भीती जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री आयमान सफादी यांनी व्यक्त केली. स्फोटानंतर बायडेन यांचा जॉर्डन दौरा रद्द झाला. जॉर्डनमध्ये जो बायडेन, राजे अब्दुल्ला द्वितीय, पॅलेस्टाईनचे पंतप्रधान महमूद अब्बास आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी यांची बैठक होणार होती. ही बैठक रद्द झाल्याचे जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले. व्हाइट हाऊसनेही बायडेन यांचा जॉर्डन दौरा रद्द झाल्याचे सांगितले.