सीमा हैदरने सचिन मीनासाठी पाकिस्तान सोडून भारत गाठला तर अंजू थॉमसने फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसाठी भारत सोडून पाकिस्तानला जाणं पसंत केलं. अशात बांगलादेशातून आलेल्या जुली अख्तर आणि अजय सैनी यांच्या लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट आला आहे. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये राहणाऱ्या प्रमोद सैनीने बांगलादेशी महिला जुली अख्तरशी लग्न केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर हा तरुण बांगलादेशात गेला आहे.

जुली आणि अजय यांची प्रेमकहाणी तेव्हाच प्रकाशात आली कारण अजयच्या आईने याविषयीची माहिती दिली. उत्तर प्रदेश पोलिसांत अजयच्या आईने या बाबत तक्रार दिली तेव्हा हे प्रकरण समोर आलं. अजयला बांगलादेशातून परत आणण्यासाठी अजयच्या आईने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीत काय समोर आलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुलिया अख्तर ही बांगलादेशच्या ढाबा येथील गाजीपूर या गावातली रहिवासी आहे. तिने जुली नावाने फेसबुक अकाऊंक तया केलं होतं. तर गौतम नगर या ठिकाणी राहणाऱ्या अजय सैनीने अजय सिंह नावाने फेसबुकवर अकाऊंट ओपन केलं होतं. या दोघांमध्ये दोन वर्षे फेसबुकवरुन चांगली मैत्री झाली. अजय रिल बनवून फेसबुकवर पोस्ट करायचा. हे रिल्स जुलीला आवडत होते. त्यामुळे या दोघांमध्ये संपर्क वाढला. त्यानंतर मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. माझ्याकडे गाडी, घर आहे असं अजयने जुलीला सांगितलं होतं. मात्र जुली भारतात आली तेव्हा कळलं की अजयने तिला सगळं खोटं सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये मोठं भांडण झालं.

अजयच्या आईने पोलिसांना काय सांगितलं?

अजयच्या आईचं नाव सुनीता असं आहे. त्यांनी पोलिसांना हे सांगितलं की अजय मागच्या दोन वर्षांपासून जुली नावाच्या महिलेशी फेसबुकवरुन चॅटिंग करत होता. जून २०२२ या महिन्यात जुली माझ्या मुलाला म्हणजेच अजयला भेटायला आमच्या घरी आली होती. तिच्या बरोबर तिची ११ वर्षांची मुलगी हलीमाही होती. चार-पाच दिवस ती इथे राहिली त्यानंतर ट्यूबवेल कॉलनी या ठिकाणी असलेल्या शंकराच्या मंदिरात दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर जुली दहा दिवसांनी पुन्हा बांगलादेशात निघून गेली. त्यानंतर तीन चार महिन्यांपूर्वी जुली तिच्या मुलीसह पुन्हा आमच्या घरी आली. यावेळी ती दीड महिना आमच्या बरोबर राहिली. होळी झाल्यानंतर जुली तिची मुलगी हलीमासह पुन्हा बांगलादेशात गेली. यानंतर माझा मुलगा अजयही कोलकात्यातून बांगलादेशात गेला. बांगलादेशात पोहचल्यानंतर त्याने मला फोन केला होता. १० जुलै २०२३ ला अजयने मला Whats App नंबरवर फोन केला होता. त्यानंतर त्याने मला काही फोटोही पाठवले ज्यात त्याच्या डोक्याला जखम झाली होती आणि रक्त येत होतं. काही फोटो असे आहेत ज्यात डोक्याला पट्टी बांधलेली होती असंही अजयच्या आईने सांगितलं.