after indias operation sindoor pakistan strike military base in amritsar is false : भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान चांगलाच चवताळला आहे. पाकिस्तानकडून वारंवार खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) या विभागाने याची पोलखोल केली आहे. पाकिस्तानने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दावा केला होता की त्यांनी अमृतसर येथील लष्कराच्या ठिकाणांवर हल्ला कला आहे आणि यामध्ये अनेक जण ठार झाले असून अनेक गंभीररित्या जखमी झाले आहेत. मात्र पीआयबी फॅक्ट चेकमध्ये पाकिस्तानचा हा खोटा दावा समोर आला आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये पाकिस्तानकडून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ हा २०२४ मधील एका जगंलात लागलेल्या आगीचा असल्याचे समोर आले आहे. वृत्तसंस्था एएफपीने गूगल रिव्हर्स सर्च आणि कीवर्ड सर्चच्या माध्यामातून या व्हिडीओचे फॅक्ट चेक केले आहे. ज्यामध्ये आढळून आले की पाकिस्तानकडून शेअर केलेला व्हिडीओ ३ फेब्रुवारी २०२४ रोजीचा आहे आणि तो टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता.

वृत्तसंस्था एएफपीने पुढे सांगितले खी टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दावा केला होता की हा व्हिडीओ चिलीच्या विन्या देल मार सिटीच्या अचुपलास भागात लागलेल्या आगीचा आहे. या समुद्र किनाऱ्यावरील शहरात एकाच वेळी अनेक ठिकाणी आग लागली होती. या घटनेत १३३ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ७००० हून अधिक घरे नष्ट झाली होती.

पीआयबीचे नागरिकांना आवाहन

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने सर्व देशवासीयांना आवाहन केले आहे की खात्री न करता कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि भारत सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यानंतर पाकितान चांगलाच गांगरून गेला आहे. यानंतर पाकिस्तानकडून बनावट आणि खोटे दावे करत व्हिडीओ आणि फोटोंच्या मदतीने खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.