उत्तर प्रदेशमध्ये सध्या अत्तर व्यापारी आणि शेकडो कोटींच्या घबाडाची जोरदार चर्चा सुरू आहे. पियुष जैन नावाच्या एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागानं टाकलेला छापा तीन दिवस चालला. यामध्ये तब्बल २५७ कोटींचं घबाड त्यांच्या हाती लागलं. ही रोकड एवढी होती, की ती जप्त करून नेण्यासाठी विभागाला चक्क कंटेनर मागवावा लागला! पण त्यानंतर आता अजून एक अत्तर व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहे. विशेष म्हणजे त्याचं नाव देखील पी. जैन अर्थात पुष्पराज उर्फ पाम्पी जैन आहे. हा व्यापारी देखील कानपूरमध्येच राहातो. एवढंच काय, तर हे दोघे जैन एकाच परिसरात देखील राहतात!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने पुष्पराज उर्फ पाम्पी जैनच्या सुमारे ५० ठिकाणी छापमारी सुरू केली आहे. यामध्ये त्याच्या कानपूरमधील कार्यालये, कारखान्यांसोबतच कनौजमधील ठिकाणांचा देखील समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या बाहेर देखील पाम्पी जैनच्या नावे काही मालमत्ता असून तिथे देखील छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पियुष जैनकडून तब्बल २५७ कोटींचं घबाड हाती लागल्यानंतर आता पाम्पी जैनकडून किती वसूली होणार? याची जोरदार चर्चा उत्तर प्रदेशमध्ये सुरू झाली आहे.

समाजवादी अत्तर!

पाम्पी जैन यांनी काही दिवसांपूर्वीच ‘समाजवादी अत्तर’ नावाने एक नवीन अत्तर लाँच केलं होतं. ते समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. आणि लवकरच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव पाम्पी जैन यांच्यासोबत कनौजमध्ये एक पत्रकार परिषद देखील घेणार होते. याच कारणामुळे भाजपानं लगेच कारवाई करत पाम्पी जैन यांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरू केल्याचा आरोप सपाकडून केला जात आहे.

एकाच नावाचे फायदे-तोटे!

पियुष जैन आणि पुष्पराज जैन यांच्यामध्ये नेहमीच नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडत असल्याचं स्थानिक सांगतात. दोघांच्या नावांची आद्याक्षरं आणि आडनाव सारखंच असल्यामुळे हे घडतंय. त्यामुळे काही कायदेशीर बाबींमध्ये देखील पियुष जैन यांची प्रकरणं पुष्पराज जैन यांच्यापर्यंत पोहोचल्याचं देखील सांगितलं जातं. हे दोघेही अत्तर व्यावसायिकच आहेत.

अत्तर व्यापाऱ्याच्या घरात २५७ कोटींसोबत सापडल्या सोन्याच्या विटा आणि बिस्कीटं, आता तपास यंत्रणांना वेगळाच संशय

मलिक मियाँ नामक व्यावसायिकावरही छापे?

दरम्यान, या दोघांसोबतच मलिक मियाँ नावाच्या प्रसिद्ध अत्तर व्यावसायिकावर देखील ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून छापेमारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. ही छापेमारी मंडई आणि छिप्पट्टी भागामध्ये केली जात आहे. कन्नौजसोबतच कानपूर आणि नोएडा भागातही छापेमारी सुरू आहे.

पियुष जैनच्या घरी तीन दिवस चाललेल्या छापेमारीमधून तब्बल १९४ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच त्याच्याकडे २६ किलो सोनं आणि ६०० लिटर चंदनाचं तेल सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After piyush raids at pushparaj jain malik miyan ittra makers in kanpur kannauj pmw