गेली ३६ वर्षे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात स्वतची छाप पाडणारे, लोकनायक, झुंजार आणि जनसामान्यांमध्ये रमणारा नेता, अशी ओळख असलेले नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून आणू, एन्रॉन समुद्रात बुडवू, अशा एकाहून एक सनसनाटी घोषणा करत मुंडे कायमच राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिले. राजकारणातील गुन्हेगारीकरणावर प्रहार करताना मुंडे यांनी शरद पवारांसह अनेक काँग्रेस नेत्यांना जेरीस आणले. शर्मा बंधूंना विमानातून नेल्याचे शरद पवारांवरील आरोप असो की अन्य काही प्रकरण असो, मुंडे यांची मुलुखमैदान तोफ कायम धडधडत राहिली. महाराष्ट्राने हा झंझावात गेली अनेक वर्षे अनुभवला. अनेक अवघड प्रसंग, अपयशही त्यांच्या वाटय़ाला आले. पण न डगमगता ते ठामपणे, निर्धाराने लढत राहिले. त्यांनी १९९४ मध्ये संघर्ष यात्रा काढून राज्यात वातावरण ढवळून काढले. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन घडवून भाजप-शिवसेना युतीकडे १९९५ मध्ये सत्ता खेचून आणण्यात मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता.
महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता उलथवल्यानंतर युतीचे सरकार आले आणि मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. गृह, ऊर्जा ही महत्वाची खाती सांभाळताना त्यांनी आपली छाप उमटविली. एन्रॉन विरोधात त्यांनी रान उठविले होते. त्यामुळे सत्ता आल्यानंतर काय करायचे, हा यक्षप्रश्न होता. पण या प्रकल्पाचा पुढे फेरविचार झाला आणि राज्याला हितकारक असा नवीन करार केला गेला. पुढे त्याचे समर्थन करताना मुंडे यांनी आपले राजकीय कसब दाखविले. मुंडे यांनी गृहमंत्रिपदाची कामगिरीही तितकीच उल्लेखनीय होती. १९९० पासून महाराष्ट्रात आणि विशेषत मुंबईत संघटित गुन्हेगारीने थैमान घातले होते. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे लागेबांधे होते. ते निपटून काढण्याचे आव्हान गृहमंत्री या नात्याने मुंडेंपुढे होते. मुंडे यांनी ते यशस्वीपणे पेलले. अनेक गुंडांच्या मुसक्या आवळण्यात आल्या व काही जण पोलीस चकमकीत मारले गेले.
महायुतीचे शिल्पकार
प्रचंड जनाधाराच्या जोरावरच मुंडे यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. १९९५ आधी सत्तापरिवर्तनासाठी राज्यात जे वातावरण तयार झाले होते, तेच राज्यात पुन्हा निर्माण केले. केंद्रातील आणि राज्यातील काँग्रेसविरोधात रान पेटवून घवघवीत यश मिळविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. केवळ भाजप-शिवसेना युतीच्या जोरावर ही निवडणूक लढवून यश मिळणार नाही. मनसेमुळे निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांवर मात करायची असेल आणि युतीच्या मतांचे विभाजन टाळायचे असेल, तर राज्यातील लहान पक्ष आणि दलितांचा पाठिंबा असलेल्या रिपब्लिकन पक्षाशी मोट बांधून महायुती निर्माण करण्याची संकल्पना मुंडे यांचीच होती. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांना त्यांनी युतीबरोबर घेत ‘सोशल इंजिनीअरिंग’चे नवे समीकरण राज्यात घडवून आणले. रिपब्लिकन पक्षाला भाजपच्या वाटय़ाची राज्यसभेतील एक जागाही त्यांनी रामदास आठवले यांना दिली. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांचे बेरजेचे राजकारण सुरूच होते. राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणले.
जिल्हा परिषद ते केंद्रीय मंत्रिपद
महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवून सत्तेपर्यंत पोचविण्याऱ्या नेत्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाते, ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचेच. मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात १९७८ मध्ये बीड जिल्ह्य़ात निवडणूक लढवून झाली व तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ते १९८० मध्ये रेणापूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर १९९० व १९९५ मध्येही ते याच मतदारसंघातून निवडून आले. महाजन दिल्लीत आणि मुंडेंनी महाराष्ट्रात राजकारण करावे, असा सल्लाही दिला होता. मुंडे हे २००९ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि लोकसभेत भाजपचे उपनेते झाले.
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म
मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्य़ातील परळी तालुक्यातील नाथरा या गावी १२ डिसेंबर १९४९ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पांडुरंग आणि तर आई िलबाबाई हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त. त्यांचे वडिलांचे १९६९ मध्ये अकाली निधन झाले. त्यांच्या आई आणि वडील बंधू पंडित अण्णा यांनी गोपीनाथजींच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली आणि त्यांचे शिक्षण पूर्ण केले. मुंडे यांचा विवाह २१ मे १९७८ रोजी प्रमोद महाजन यांच्या भगिनी प्रज्ञा यांच्याशी अंबेजोगाई येथे झाला.
नशिबी कायम संघर्ष..
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या खांद्यावर विसंबून राहून वाटचाल केली, त्या प्रमोद महाजन यांच्यासारखा मित्र व नातलगाचा आधार अचानक गमावला, वडील बंधू अन् मुलासमान असलेला पुतण्या धनंजय दुरावला.. अनेक अपघात झाले व प्रकृतीच्याही तक्रारी सुरू झाल्या..अतिशय संवेदनाशील व हळवे असलेले मुंडे क्षणभर हेलावलेही. पण जबर िहमत आणि राजकीय कसब असलेला हा नेता या अवघड प्रसंगांमधूनही बाहेर पडला. जणू आयुष्यभर साथीला असलेल्या संघर्षांच्या काळातही त्यांची मुलुखमैदान तोफ सतत धडधडतच राहिली. अडीअडचणी व कटू प्रसंगांवर मात करून मुंडेंचा संघर्ष सुरूच राहिला.अगदी अखेपर्यंत..
कोणाच्याही आयुष्यात येऊ नयेत, असे अनेक प्रसंग मुंडे यांना पहावे लागले. पक्षातील काही नेत्यांशी असलेल्या मतभेदांमुळे मुंडे यांना अगदी पक्ष सोडावा लागणार की काय, अशी वेळ आली होती. पण मुंडे शांतपणे व निर्धाराने सर्वाना तोंड देत होते.
लोकसभा निवडणुकीची तयारी दीड-दोन वर्षांपूर्वी सुरू झाली, तेव्हा महाराष्ट्रात पक्षाच्या नेतृत्वाची धुरा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली. काही काळ पक्षात एकाकीपणे काढलेल्या मुंडे यांच्यावर ही जबाबदारी आल्यावर नव्या जोमाने ते कामाला लागले. सत्तापरिवर्तनासाठी मनसेला युतीसोबत घ्यावे लागेल, अशी कल्पना त्यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडली.
विलक्षण योगायोग
प्रमोद महाजन यांची त्यांचा भाऊ प्रवीणनेच हत्या केली आणि महाजन यांचे ३ मे २००६ रोजी निधन झाले. महाजन-मुंडे कुटुंबियांवर हा मोठा आघात होता. महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या, तेव्हा मुंडे आपल्या घरात होते. घटनेची माहिती मिळताच अंगावरच्या वस्त्रानिशी मुंडे धावले आणि रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या महाजन यांना घेऊन ते हिंदूुजा रुग्णालयात गेले. पण उपचार यशस्वी झाले नाहीत आणि महाजन यांचे निधन झाले. मुंडे यांच्या अपघाताचा आजचा दिवसही ३ जूनचा. गाडीची धडक बसल्याने जखमी झालेल्या मुंडे यांनी आपल्याला दवाखान्यात न्यावे, अशी सूचना केली. पण उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले. मुंडे-महाजन कुटुंबियांवर काळाने पुन्हा घाला घातला. जनसंपर्क हेच टॉनिक
मुंडे यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांना भेटायला येणाऱ्याची कायमच रीघ लागलेली असे. सकाळी सहा-साडेसहापासून ते रात्री बारा-एक वाजेपर्यंत त्यांच्या भेटीगाठींना उसंत नसे. दौऱ्यावर असताना एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन घोंगडीवर विसावून चहापाणी घेण्यात विलक्षण आनंद वाटत असे.