Agra Conversion Racket: उत्तर प्रदेशच्या आग्रा पोलिसांनी शनिवारी एका धर्मांतराच्या रॅकेटचा शोध लावला. आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या या रॅकेटद्वारे भारतातील मुलींचे धर्म परिवर्तन केले जात होते. तसेच या मुलींचा संपर्क पाकिस्तानमधील काही लोकांशी करून दिला जात होता. तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स, एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन्स प्लॅटफॉर्म आणि डार्क वेबद्वारे रॅकेटचे काम चालू होते. हिंदुस्तान टाइम्सने सदरची बातमी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील काही लोक भारतातील मुलींचे धर्मांतर करण्यासाठी त्यांच्याशी इस्लामवर चर्चा करत असत. इस्लामवर श्रद्धा निर्माण व्हावी, असा त्यांचा प्रयत्न असे. यामध्ये काही काश्मिरी महिलांचाही समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिला हिंदू धर्मातील काही बाबींवर टीका करून त्याविषयी मुलींच्या मनात नकारात्मक भावना निर्माण करत आणि त्यानंतर इस्लामचे महत्त्व समजावून सांगत असत.

आग्रा पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी माझ्यमांशी बोलताना सांगितले, “आम्ही या प्रकरणात १४ जणांची अटक केली आहे. तसेच ज्या मुलींची सुटका करण्यात आली, त्यांच्याशीही चर्चा केली. मुलींशी बोलल्यानंतर त्यांनी पाकिस्तानमधील लोकांशी संवाद साधल्याचे सांगितले. त्यांनी त्यांच्याशी इस्लाम धर्माबाबत चर्चा केली. तसेच काश्मीर मधील काही महिलाही या मुलींवर प्रभाव टाकत होत्या.”

सोशल मीडियावर करडी नजर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनवीर अहमद आणि साहील अदीम हे दोन पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियाद्वारे पीडित मुलींच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. या रॅकेटद्वारे ऑनलाइन गेमिंगमधून मुलींना लक्ष्य केले जात असे. तसेच त्यांना बाहेरच्या देशातील लोकांशी बोलते करायला लावून त्यांचे ब्रेनवॉश केले जात असे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली असल्याचे हिंदुस्तान टाइम्सने वृत्तात सांगितले.

गेमिंग आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सच्या गुप्ततेचा फायदा घेत अल्पवयीन मुलांवर विशेषतः मुलींवर धार्मिक विचार बिंबवण्याचा प्रयत्न केला जात होता, अशीही माहिती समोर आली आहे.

पीडित मुलगी झाली महत्त्वाची साक्षीदार

या प्रकरणात २१ वर्षीय पीडित मुलीने समोर येऊन साक्ष दिली आहे. या मुलीची उत्तराखंडमधून सुटका करण्यात आली होती. आग्र्यातील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १८३ द्वारे जबाब नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, देहरादून, बरेली, अलीगड, झज्जर आणि रोहतोक येथून अनेक पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.