Air India Flight Crashes near Ahmedabad: अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ एक एअर इंडियाचे विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातच्या मेघानीनगर परिसरात विमान कोसळलं आहे. एअर इंडियाच्या या प्रवासी विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. शिवाय हे विमान निवासी भागात कोसळलं असल्यामुळे स्थानिक इमारतींचंही मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर एअर इंडियाच चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी पोस्ट केली आहे.
एअर इंडियाचे चेअरमन काय म्हणाले?
या भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाचे चेअरमन यांनी टाटा समूहाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये चंद्रशेखरन यांनी अपघातात सापडलेल्यांया कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये एन.चंद्रशेखरन म्हणाले की, “मी अत्यंत दु:खाने मी पुष्टी करतो की अहमदाबादहून लंडन गेटविक येथे जाणारे एअर इंडिया १७१ विमान दुर्दैवी अपघातात सापडले आहे. या अत्यंत हादरवून टाकणार्या घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांचे कुटुंबिय आणि प्रियजन यांच्याप्रती आम्ही संवेदना आणि शोक व्यक्त करतो.”
“या क्षणी आमचे प्रमुख लक्ष हे प्रभावित झालेल्या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत पुरवणे आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या एमर्जन्सी रिस्पॉन्स पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधितांना आवश्यक ती मदत देण्यासाठी आणि प्रभावित लोकांची काळजी घेण्यासाठी आम्हाला शक्य असेल ते सर्व करत आहोत,” असेही एन. चंद्रशेखरन म्हणाले आहेत.
विमानात प्रवास करत असलेल्या प्रवाशांबद्दल त्यांचे कुटुंबिय माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने आपत्कालिन केंद्र सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहेत. “अधिक व्हेरिफाईड माहिती मिळाल्यानंतर पुढील अपडेट दिली जाईल. माहिती घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी एमर्जन्सी सेंटर सुरू करण्यात आले आहे आणि सपोर्ट टीम तयार करण्यात आली आहे,” असेही एन. चंद्रशेखरन म्हणाले.
With profound sorrow I confirm that Air India Flight 171 operating Ahmedabad London Gatwick was involved in a tragic accident today. Our thoughts and deepest condolences are with the families and loved ones of all those affected by this devastating event.
— Tata Group (@TataCompanies) June 12, 2025
At this moment, our…
नेमकं काय झालं?
एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. तसेच यात दोन पायलटसह १२ क्रू सदस्य होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात (७ किमी दूर) ते कोसळलं. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं व्हिडीओंमध्ये दिसतंय. दरम्यान, अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केलं आहे.