Importance of AI Learning: “आता एआय आलंय, काय होणार कुणास ठाऊक”, “एआय सगळ्यांच्या नोकऱ्या खाणार रे”, “एआय काय काय करू शकतंय याची गणतीच नाही”, “एका एआयमुळे शेकडो-हजारोंच्या नोकऱ्या जाणार”, असे संवाद हल्ली येता-जाता कानांवर पडत असतात. एआयमुळे ऑनलाईन किंवा ऑफलाईन कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टी अगदी चुटकीसरशी होतात. पण एआयचा नोकऱ्यांवर आणि पर्यायाने अनेकांच्या रोजच्या आयुष्यावरच परिणाम होणार असल्याचं बोललं जात असल्यामुळे त्याबाबत भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात Nvidia चे सीईओ जेन्सन ह्युआंग यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

जेन्सन ह्युआंग यांनी एकीकडे एआयमुळे नोकऱ्या कमी होणार नसून त्या वाढणार असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळू शकणार असला तरी एआयचा वापर न करणाऱ्यांची जागा लवकरच एआयचा वापर करू शकणारं मनुष्यबळ घेऊ शकतं, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती चमाथ पॅलिहॅपिटिया यांच्या पॉडकास्टमध्ये जेन्सन ह्युआंग यांची याबाबत सविस्तर मुलाखत नुकतीच पार पडली.

AI बाबत काय म्हणाले जेन्सन ह्युआंग

जेन्सन ह्युआंग यांनी यावेळी एआयचं ज्ञान सगळ्यांनी आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. “इंटरनेटने गेल्या २० वर्षांत जेवढ्या नोकऱ्या तयार केल्या, त्यापेक्षा जास्त नोकऱ्या एआय येत्या पाच वर्षांत तयार करेल”, असं ते म्हणाले. “खरंतर आपण त्या नोकऱ्या तयार करण्यासाठी पुरेशा वेगाने काम करत नाही आहोत याची मला काळजी वाटतेय. जे कुणी आत्ता एआयचा वापर करत नाही आहेत, ते लवकरच असा वापर करू शकणाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये आपली नोकरी गमावून बसतील”, अशी भीतीही जेन्सन ह्युआंग यांनी व्यक्त केली.

कमी मनुष्यबळात जास्त प्रभाव!

यावेळी बोलताना जेन्सन ह्युआंग यांनी एआयवर संशोधन करणाऱ्या अगदी छोट्या गटाकडून साधला जाऊ शकणारा मोठा प्रभाव आणि त्याच धर्तीवर एनविडियानं साधलेल्या प्रगतीचा कंपनीचं नेतृत्व करणाऱ्यांना झालेला मोठा आर्थिक फायदा यावरही भाष्य केलं. “जगभरात कोणत्याही सीईओने केले नसतील, एवढे कोट्याधीश मी माझ्या कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळात तयार केले आहेत. त्यांचं अगदी उत्तम चाललं आहे. माझ्या पातळीवरच्या कुणासाठीही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका”, असं जेन्सन ह्युआंग म्हणाले. छोट्या एआय टीमचं महत्त्व आणि प्रभाव यावर ते बोलत होते.

“यात महत्त्वाची बाब म्हणजे पुरेसं आर्थिक पाठबळ असणारे साधारण १५० एआय संशोधक किती मोठा परिणाम साध्य करू शकतात हे समजून घेणे. OpenAI ची सुरुवात अशा १५० कर्मचाऱ्यांपासून झाली होती. चीनच्या DeepSeek ची सुरुवातदेखील जवळपास इतक्याच कर्मचाऱ्यांनिशी झाली होती”, असं जेन्सन ह्युआंग यांनी नमूद केलं.

AI मुळे नोकऱ्यांवर गदा येणार?

दरम्यान, एआयमध्ये पारंगत नसणाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त करतानाच जेन्सन ह्युआंग यांनी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी पसरण्याची शक्यता मात्र फेटाळून लावली. उलट एआयमुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होतील, असं भाकित त्यांनी वर्तवलं.

“माझ्याबाबती बोलायचं झाल्यास एआयमुळे नवनवीन नोकऱ्या तयार होत आहेत. एआयमुळे लोक अशा गोष्टी तयार करू लागले आहेत, ज्या इतर लोक विकत घेऊ इच्छितात. यामुळे आणखी प्रगती, आणखी नोकऱ्या तयार होत आहेत. आणि हे सगळं एकत्र चाललं आहे. AI हा वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानांचा समतोल साधणारा सर्वकालिक महान घटक आहे”, अशा शब्दांत जेन्सन ह्युआंग यांनी एआयबाबत भाष्य केलं.

“हल्लीच्या एआयच्या युगात प्रत्येकदण एक प्रोग्रॅमर आहे. कोडिंगच्या भाषांपैकी सी++, पायथन अशा पारंपरिक भाषा आता अस्तंगत होत चालल्या आहेत. यासाठी आता लोकांना फक्त एआयशी बोलायचं आहे. AI मुळे आता प्रत्येकजण एक कलाकार आहे. प्रत्येकजण एक लेखत आहे”, असंही ते म्हणाले.