गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटलं आहे. हमासच्या हल्लानंतर इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्बवर्षाव केला आहे. या हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांसह अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. हमास-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाझामधील लोकांच्या बाजुने उभं राहण्याची आणि इस्रायल-हमास युद्धात होरपळलेल्या हजारो निष्पाप लोकांना मदत करावी, असं आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे आणि यापुढेही उभा राहीन. आजही इस्रायलविरोधात लढणाऱ्या गाझातील लाखो शूरवीरांना माझा सलाम! नेतान्याहू (इस्रायली पंतप्रधान) हा एक जुलमी सैतान आणि युद्ध गुन्हेगार आहे. आपल्या देशातील एक बाबा मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) म्हणाले की, पॅलेस्टाईनचे नाव घेणाऱ्यांवर खटले दाखल केले जातील. तर मी त्या बाबा मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, मी आपल्या तिरंग्यासह अभिमानाने पॅलेस्टाईनचा झेंडाही धारण करतो. मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे,” असं विधान ओवेसी यांनी केलं. ते हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलत होते.

हेही वाचा- इस्रायलने युद्धात पांढरा फॉस्फरस’ वापरल्यामुळे टीका का होतेय?

“मला पंतप्रधानांना पॅलेस्टिनींवर होणारे अत्याचार थांबवण्याचं आवाहन करायचं आहे. पॅलेस्टाईन हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न नाही, तो एक मानवतावादी मुद्दा आहे. २१ लाख लोकसंख्या असलेल्या गाझातील १० लाख गरीब लोक बेघर झाले आहेत. पण जग शांत आहे. ७० वर्षांपासून इस्रायल पॅलेस्टाईनवर ताबा मिळवत आहे. इस्रालयने केलेला ताबा तुम्हाला दिसत नाहीये का? पॅलेस्टिनींवरील अत्याचार तुम्हाला दिसत नाहीत का? ” असंही असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

हेही वाचा- “पुढील आव्हानासाठी तयार आहात? युद्धाचा पुढचा…”, इस्रायली पंतप्रधानांच्या सैनिकांना महत्त्वाच्या सूचना

शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासने ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड बॅटल’ची घोषणा करत इस्रायलवर हल्ला चढवला होता. याचा बदला म्हणून इस्रायलने ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ची घोषणा केली. हमास-इस्रायलच्या युद्धात दोन्ही देशातील ३२०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर गाझा पट्टीत १९०० पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये सुमारे ७०० लहान मुलं असल्याचं ‘युनिसेफ’ने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim chief asaduddin owaisi calls israel pm benjamin netanyahu a devil urge pm narendra modi stand with gaza rmm