Air India : एअर इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली ते वॉशिंग्टन ही विमानसेवा १ सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबर २०२५ नंतर वॉशिंग्टन डीसीला किंवा तेथून एअर इंडियाने बुकिंग केलेल्या ग्राहकांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था देण्यात येणार असल्याचं एअर इंडियाने एअरलाइन्सने सांगितलं आहे.
एअर इंडियाने सोमवारी घोषणा केली की कंपनी १ सप्टेंबर २०२५ पासून दिल्ली आणि वॉशिंग्टन डीसी या दरम्यानच्या त्यांच्या नॉन-स्टॉप फ्लाइट्स बंद करण्यात येणार आहेत. ही सेवा बंद करण्यामागचं कारण हे फ्लाइट्स अपग्रेडेशन आणि हवाई निर्बंधांमुळे ऑपरेशनल अडचणी येत असल्याचं सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
एअर इंडिया एअरलाइन्सने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. त्या निवेदनात म्हटलं की, “एअर इंडियाच्या ताफ्यात नियोजित फ्लाइट्सच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गेल्या महिन्यात एअर इंडियाने त्यांच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांचे रेट्रोफिटिंग सुरू केलं होतं. तसेच पाकिस्तानने हवाई क्षेत्र सतत बंद असल्यामुळे एअरलाइनच्या लांब पल्ल्याच्या फ्लाइट्सवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे उड्डाणांचे मार्ग लांबतात आणि ऑपरेशनल गुंतागुंत वाढते”, असं एअरलाइन्सने निवेदनात म्हटलं आहे.
बुकिंग केलेल्या प्रवाशांचं काय होणार?
दिल्ली ते वॉशिंग्टन ही विमानसेवा १ सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, काही प्रवाशांनी सप्टेंबरनंतर बुकिंग केलेल्या ग्राहकांचं काय होणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. मात्र, त्यासंदर्भात कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने म्हटलं की, सप्टेंबरनंतर दिल्ली ते वॉशिंग्टन या मार्गावर प्रवास करणाऱ्या तथा बुकिंग केलेल्या प्रवाशांशी संपर्क साधला जाईल आणि त्यांना पर्यायी फ्लाइट्सवर पुन्हा बुकिंग करण्याची किंवा पूर्ण रक्कम परत करण्याची ऑफर दिली जाईल, असं म्हटलं आहे.