गुजरातच्या राजकारणात एक मोठा बदल पाहण्यास मिळतो आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल सोडून सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिली आहे. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळाची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतील आणि नव्या मंत्रिमंडळ स्थापनेचा प्रस्ताव ठेवतील. शुक्रवारी शपथविधी सोहळा पार पडेल आणि नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल. मुख्यमंत्री वगळून इतर सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याच्या या घटनेने गुजरात चर्चेत आलं आहे.
मंत्रिमंडळात १० नव्या चेहऱ्यांना संधी?
भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारात नव्या १० चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच अर्ध्याहून अधिक मंत्र्यांना बदलण्यात येणार आहे. गुजरात सरकारमध्ये सध्या १७ मंत्री आहेत ज्यापैकी आठ कॅबिनेट आहेत, बाकीचे राज्यमंत्री आहेत. संविधानातील तरतुदीनुसार १८२ सदस्यांच्या विधानसभेसाठीचं मंत्रिमंडळ २७ मंत्र्यांपर्यंत वाढवण्याची मुभा आहे.गुजरातच्या राजकारणात हे फेरबदल होत आहेत, जगदीश विश्वकर्मा गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हे फेरबदल पाहण्यास मिळत आहेत. भुपेंद्र पटेल सरकारमध्ये जगदीश विश्वकर्मा मंत्री होते. तसंच या सगळ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील गुजरातला पोहचले आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
गुजरातच्या राजकारणात हे बदल का?
राजकीय जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या राजकारणात भाजपाकडून हे बदल केले जात आहेत कारण राज्यात नवी उर्जा आणि उत्साह असला पाहिजे असं भाजपाला वाटतं आहे. त्यामुळे भाजपाच्या तरुण नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जातं आहे. पाटीदार समाज आणि ओबीसी समाज यांचं संतुलन मंत्रिमंडळात पाहण्यास मिळेल यावरही पक्षाने भर दिला आहे. गुजरातच्या या नव्या समीकरणाकडे २०२७ च्या मिशन च्या दृष्टीनेही पाहिलं जातं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपने पाटीदार समाजात त्यांचं महत्त्व वाढवलं आहे. भुपेंद्र पटेल यांनी १२ डिसेंबर २०२२ ला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आता नव्या मंत्रिमंडळासह ते सरकारवरची त्यांची पकड अधिक मजबूत करतील असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना वाटतो आहे.