Reddit Post या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक लोक त्यांच्या व्यथा मांडत असतात. जॉब मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला?, कामाच्या ठिकाणी कसा त्रास आहे?, टॅक्सी मिळवताना काय घडलं? टॅक्सी किंवा तत्सम सार्वजनिक किंवा खासगी वाहनांचे अनुभव या सगळ्या गोष्टींच्या पोस्ट या ठिकाणी पोस्ट करतात. अशातच बंगळुरुतल्या एका कर्मचाऱ्याने मला सांगा मी मरतोय का? असा प्रश्न विचारत एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल झाली आहे.

रेडइटच्या पोस्टमध्ये या कर्मचाऱ्याने काय म्हटलंय?

“तुम्हा सगळ्यांप्रमाणेच मी देखील एक कॉर्पोरेट विश्वात वावरणारा गुलाम आहे. मी जे काम करतोय त्या कामच्या चक्रात मी पुरता पिचून गेलो आहे. तीन वर्षे झाली आहेत रोज मी १४ ते १६ तास काम करतो आहे. हे १४ ते १६ तास मी काम किंवा त्याच्याशी संबंधित इतर कामं करतो आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मी कंपनी जॉईन केली. तीन वर्षांत माझं वजन २४ किलोंनी वाढलं आहे. माझ्या झोपेचं मागची तीन वर्षे खोबरं झालं आहे. रोज रात्री मला झोपायला दोन वाजतात. सकाळी ९ वाजता मला ऑफिसला पोहचावं लागतं.”

मी आनंदी राहूच शकत नाही, बंगळुरु सोडून कुठेही गेलो नाही-कर्मचाऱ्याने मांडली व्यथा

पुढे हा कर्मचारी म्हणतो, “माझं व्यक्तिगत आयुष्य संपलं आहे. मागच्या अडीच वर्षांत मी बंगळुरु सोडून कुठेही गेलेलो नाही. नंदी हिल्स तर बंगळुरुत आहे मी तिथे जाऊ शकलेलो नाही. माझ्या गर्लफ्रेंडकडे माझं दुर्लक्ष होतं आहे. माझ्यासाठी समाधान एवढंच आहे की ती माझ्या आयुष्यात आहे.” मी माझ्या कंपनीत रोज १४ ते १६ तास काम करुन थकून गेलो आहे. माझ्या आयुष्याचा समोतल बिघडून गेला आहे. मी एक चांगला कर्मचारी बनता बनता आयुष्य जगणंच विसरुन गेलो आहे. बऱ्याचा माझी साप्ताहिक सुट्टी रद्द केली जाते. सुट्टीसाठी अर्ज केला तर तो देखील मंजूर होत नाही. पगार कमवण्याशिवाय मी आनंदी राहण्यासाठी दुसरं काही करतोय असं वाटतच नाही. मी आता काय केलं पाहिजे? मला वाटतंय की मरतोय की काय? असं म्हणत या कर्मचाऱ्याने रेडइटवरच प्रश्न विचारले आहेत. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

लोकांनी या कर्मचाऱ्याला काय सांगितलं?

अनेक लोकांनी त्याला उत्तरं दिली आहेत. काहींनी त्याला काम सोडून घरी बस आणि ब्रेक घे त्यानंतर दुसरा जॉब शोध असा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या काही युजर्सनी तू जर प्रामाणिक कर्मचारी आहेस तर मग सुट्टीसाठी अर्ज कर. मोठी सुट्टी घे, जॉब सोडू नको. तसंच तुला कंटाळा आला की चित्रपट पाहा, मित्रांशी चर्चा कर वगैरे सल्लेही दिले आहेत.