२१ डिसेंबरला जगाचा अंत होणार हे भाकीत खोटे ठरले, माया संस्कृतीतील कॅलेंडरचा तो शेवटचा दिवस म्हणजे जगाचा अंत असे तद्दन अशास्त्रीय असलेला हा अंदाज होता. पण नासाच्या वैज्ञानिकांना त्यादिवशी सूर्याच्या काढलेल्या छायाचित्रात सूर्याने जणू ‘डोळा मिचकावल्यासारखे’ दिसून आले आहे.
सूर्याचे हे छायाचित्र २२ डिसेंबरला घेतलेले असून माया संस्कृतीचे भाकीत खोटे ठरल्यानंतर काही मिनिटातच टिपलेले आहे. सूर्यावरील चुंबकीय घडामोडींमुळे जे सौरडाग तयार होतात त्यामुळे सूर्याने जणू काही डोळे मिचकावले आहेत, असे या छायाचित्रात वाटते.
डेली मेलच्या वृत्तानुसार सूर्याच्या पृष्ठभागावरील चुंबकीय क्रीयाशीलतेमुळे जेव्हा जेव्हा पृथ्वी नष्ट होण्याची भाकिते करण्यात आली , त्या-त्या वेळी सौरडागामुळे सूर्य काही संकेत देत असतो.
नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्वेटरी या संस्थेने घेतलेल्या सूर्याच्या छायाचित्रात सौरडाग दिसत आहे व १९०२ मध्ये ‘अ ट्रिप टू द मून’ या फ्रेंच चित्रपटातही जे छायाचित्र दाखवले आहे ते असेच आहे, ती पहिली विज्ञानाधारित कल्पित कथा होती.
सेंटर फॉर आर्किओअ‍ॅस्ट्रॉनॉमीचे डॉ.जॉन कार्लसन यांनी सांगितले, की माया संस्कृतीने वर्तवलेले भाकीत हा सुरवातीपासूनच गैरसमज होता. माया संस्कृतीची दिनदर्शिका ही २१ डिसेंबर २०१२ रोजी संपते हे खोटे होते व माया संस्कृतीतील लोकांनी जग नष्ट होईल असे भाकितही केले नव्हते. आता सूर्याची जी छायाचित्रे मिळाली आहेत त्यानुसार सूर्य ज्या तरंगलांबीच्या ऊर्जा शलाका बाहेर टाकतो त्या मानवी डोळ्यांना दिसत नाहीत. या छायाचित्रामुळे सूर्याच्या एकूणच स्थितीविषयी वैज्ञानिकांना नवीन माहिती मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing solar wink tells doomsday prediction was fallacy