Amazon job cuts ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने पुन्हा एकदा नोकर कपातीची घोषणा केली आहे. मागील वर्षात अ‍ॅमेझॉनने २७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते आणि अजूनही अ‍ॅमेझॉन वेगवेगळ्या विभागातून कर्मचारी कपात करत आहे. अ‍ॅमेझॉनने आता त्यांच्या प्रमुख क्लाउड कॉम्प्युटिंग विभाग ‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस'(AWS)मधील कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने टाळेबंदीची नेमकी संख्या अद्याप उघड केलेली नाही. परंतु कंपनीने हे मान्य केले आहे की, नोकर कपातीच्या निर्णयाचा ‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’मधील विशिष्ट गटावर परिणाम झाला आहे, असे ‘रॉयटर्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार

‘सीएनबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभावित गटांमध्ये ‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’च्या ट्रेनिंग आणि सर्टीफिकेशन युनिटचा समावेश आहे. अ‍ॅमेझॉनचे प्रवक्ते ब्रॅड ग्लासर म्हणाले की, हा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आलेला आहे आणि कंपनी नोकर कपातीदरम्यान कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे. अ‍ॅमेझॉनचे असे सांगणे आहे की, या कपातीसाठी कृत्रिम तंत्रज्ञान(एआय) कारणीभूत नाही. परंतु, असे असले तरीही कंपनी जनरेटिव्ह एआय स्वीकारण्यासाठी आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यासाठी मोठ्या संख्येने नोकर कपात करत असल्याची माहिती आहे.

‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’ कंपनीतील महत्त्वाचा विभाग आहे, या विभागातून कंपनीला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. परंतु, गेल्या काही काळात त्यांची वाढ मंदावली आहे. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत, ‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’ने २९.२७ अब्ज डॉलर्स विक्री नोंदवली होती. ही विक्री मागील तिमाहीतील १८.९ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे नोंदवण्यात आले.

कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जॅसी यांच्या नेतृत्वात २०२२ पासून दीर्घकालीन खर्च कमी करण्यासाठी अ‍ॅमेझॉनच्या कॉर्पोरेट विभागांमधील तब्बल २७,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या वर्षीच कंपनीने त्यांच्या रिटेल, संप्रेषण आणि डिव्हाइस विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. गेल्या वर्षी, ‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’ने त्यांच्या सेल्स, मार्केटिंग तंत्रज्ञानातील शेकडो भूकर्मचाऱ्यांना कामावरून काढले.

कॉर्पोरेट रचनेवर एआयच्या परिणामांबद्दलदेखील जॅसी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या कंपनीच्या बैठकीत त्यांनी असे सुचवले की, जनरेटिव्ह एआयमुळे काही नोकऱ्या कमी होऊ शकतात आणि नवीन भूमिकांची मागणी निर्माण होऊ शकते. कर्मचाऱ्यांना सेपरेशन पगाराव्यतिरिक्त, वैद्यकीय विमा, दुसरीकडे नोकरी शोधण्यासाठीही अ‍ॅमेझॉनकडून मदत केली जात आहे.