Amazon India Layoff News: गेल्या काही महिन्यांपासून AI मुळे वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांना कसा आणि किती फटका बसणार? यासंदर्भात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात आयटीसह अनेक क्षेत्रातील लहान-मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. यासाठी प्रत्यक्ष कारणं वेगळी दिली जात असली, तरी अप्रत्यक्षपणे एआयमुळे कमी झालेली कर्मचाऱ्यांची गरजच याचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच अ‍ॅमेझॉननंदेखील जगभरात तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली असून त्यात भारतातील ८०० ते १००० कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची बाब आता समोर आली आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅमेझॉन इंडियाकडून यासंदर्भात पावलं उचलण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, जागतिक स्तरावर कंपनीमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या बदलांचा भाग म्हणून भारतातदेखील कर्मचारीकपात करण्यात येणार आहे. त्यात जवळपास ८०० ते १००० भारतीयांना नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे.

तीन दिवसांत Amazon India काढणार सूचना!

दरम्यान, अ‍ॅमेझॉननं जागतिक स्तरावर कर्मचारी कपातीची घोषणा मंगळवारीच केली असली, तरी भारतात कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये यासंदर्भातील सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात कंपनीच्या बंगळुरूमधील PXT अर्थात People Experience and Technology टीमनं तशा सूचना प्राप्त झाल्याची माहिती फायनान्शियल एक्स्प्रेसला दिली आहे.

Amazon India कडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

एकीकडे इतक्या मोठ्या संख्येनं कर्मचारी कपात होणार असताना दुसरकडे यासंदर्भात प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला असता अ‍ॅमेझॉन इंडियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. शिवाय, नेमक्या किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाणार आहे? यासंदर्भातदेखील नेमकी आकडेवारी देण्यात आलेली नाही.

Amazon PXT च्या वरीष्ठ उपाध्यक्षांचा मेमो…

दरम्यान, अ‍ॅमेझॉन पीएक्सटीच्या वरीष्ठ उपाध्यक्षा बेथ गलेटी यांनी जागतिक स्तरावरील कर्मचारी कपातीमागे एआयसंदर्भातील कंपनीचं धोरण असल्याचे सूतोवाच केले. याशिवाय, कंपनीत वेगवेगळ्या स्तरावरील पदाधिकाऱ्यांवरचं अवलंबित्व कमी केलं जाणार असून त्यावर खर्च होणारं भांडवलदेखील कमी केलं जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

अ‍ॅमेझॉनचे सीईओ Andy Jassy यांचा संदेश…

अ‍ॅमेझॉनचे सीईओ अँडी जेस्सी यांनी करोना काळात अ‍ॅमेझॉनसाठी कर्मचारी कपातीचा मोठा कार्यक्रम जाहीर केला होता. कंपनीतील बहुविध पातळ्यांवरील कर्मचाऱ्यांची पद्धत संपुष्टात आणून या पातळ्या कमीत-कमी ठेवण्यावर भर असेल, असंही जेस्सी तेव्हा म्हणाले होते.

AI चा स्वीकार नोकरकपातीसाठी कारणीभूत

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अँडी जस्सी यांनी एआयमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, असे सूतोवाच केले होते. या वर्षी जून महिन्यात कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये याचा उल्लेख त्यांनी केला होता. “अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक प्रक्रिया पद्धती स्थिरस्थावर होत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत एआयमुळे आपल्या एकूण कर्मचारी संख्येत घट होईल”, असं त्यांनी या मेमोमध्ये नमूद केलं होतं.