नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समूहात अलिकडील काळात प्रमुख अमेरिकी आणि आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या अदानी समूहामध्ये आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केलेली गुंतवणूक ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तामुळे चर्चेत आली आहे.
एलआयसीने मे महिन्यात अदानी बंदरे आणि ‘एसईझेड’मध्ये ५७ कोटी डॉलरची (५ हजार कोटी रुपये) गुंतवणूक केल्यानंतर पुढील महिन्यात, जून २०२५मध्ये अमेरिकास्थित ‘अथेन इन्शुरन्स लिमिटेड’ने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये ७९ कोटी डॉलरची (६,६५० कोटी रुपये) कर्जरूपी गुंतवणूक केली. याशिवाय इतर आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनीही या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे.
‘अथेन’ची पालक कंपनी असलेल्या ‘अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट’ने २३ जूनला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडमध्ये (एमएआयएल) केलेल्या गुंतवणुकीची माहिती दिली होती. अपोलोने ‘एमएआयएल’मध्ये केलेली ही दुसरी मोठी गुंतवणूक होती. अपोलोशिवाय डीबीएस बँक, डीझेड बँक, रोबोबँक आणि बँक सायनोपॅक कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’मध्ये २५ कोटी डॉलर (२,१९५ कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे.
अदानी समूहाने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ‘एपीएसईझेड’, ‘एजीईएल’, ‘अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड’ आणि ‘अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड’ या विविध कंपन्यांमध्ये १० अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्जरूपी गुंतवणूक मिळवली आहे, असे ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’च्या ऑगस्टमधील अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एलआयसीची उद्योगांमध्ये गुंतवणूक (रुपयांमध्ये)
अदानी समूह – ६० हजार कोटी
रिलायन्स समूह – १ लाख ३३ हजार कोटी
आयटीसी लिमिटेड – ८२ हजार ८०० कोटी
एचडीएफसी बँक – ६४ हजार ७२५ कोटी
भारतीय स्टेट बँक – ७९ हजार ३६१ कोटी टीसीएस – ५ लाख ७० हजार कोटी
