Aniruddhacharya On CJI B. R. Gavai Verdict Of Lord Vishnu Statue: काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील भगवान विष्णूंची सात फूट उंच मूर्ती पुन्हा निर्माण करण्याची आणि त्याची पुन्हा स्थापना करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यांनी याचिकाकर्त्याने ही याचिका प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाखल केल्याचे म्हटले होते. आता, कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी या प्रकरणी नाव न घेता सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर टीका केली आहे.

एका कथावाचन कार्यक्रमादरम्यान अनिरुद्धाचार्य म्हणाले, “एक न्यायाधीश म्हणाले, ‘आम्ही का निर्णय घ्यावा? जर तुमच्या देवाकडे इतकी शक्ती असेल तर तो ते स्वतः करेल.’ न्यायाधीशांना विचारा, जर देव सर्वकाही करणार असेल तर तुम्ही खुर्चीवर का बसला आहात? तुम्हाला न्याय देण्यासाठी न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे. आता तुम्ही हिंदू सनातन संस्कृतीचा अपमान करत आहात आणि तुम्ही म्हणता, ‘जर तुमच्या देवाकडे शक्ती असेल तर त्याने स्वतः मंदिर बांधावे.’ देव काहीही करू शकतो, तो प्रकट होऊन रावणाला मारू शकतो, तो हिरण्यकशिपूची छातीही फाडू शकतो.”

अनिरुद्धाचार्य म्हणाले की देव अधर्म्यांचा नाश करण्यासाठी येतो, परंतु देवाला वाटते की, तुम्ही खुर्चीवर बसलेले असल्याने तुम्हीच याचा निर्णय घ्यावा, आम्हाला यायला लागू नये. म्हणूनच देव येत नाही. ते म्हणाले की जर तुम्ही न्यायाच्या खुर्चीवर न्यायाधीश म्हणून बसला असाल तर तुम्ही फक्त भाकरी तोडण्यासाठी आहात की न्याय देण्यासाठी आहात?

अनिरुद्धाचार्य यांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या श्रोत्यांना विचारले, “ते तिथे का बसले आहेत ते सांगा? ते न्याय देण्यासाठी आहेत की नाही? सनातन भारतात राहून हे लोक उच्च पदांवर बसून सनातनविरुद्ध बोलत आहेत.”

अनिरुद्धाचार्यांनी विचारले, “कोणताही न्यायाधीश एखाद्या मुस्लिम धार्मिक नेत्याबद्दल असे बोलू शकतो का? तो मशिदीविरुद्ध किंवा अल्लाविरुद्ध बोलू शकतो का? कल्पना करा, असा उच्चपदस्थ न्यायाधीश भगवान विष्णूंचा अपमान करत आहे, त्यांच्याबद्दल हे सर्व बोलत आहे कारण हिंदू त्यांच्या देवाचा अपमान सहन करतात.”