कॅनडा मध्ये एक नवा इतिहास रचला गेला आहे. देशातील ओकविल ईस्टच्या खासदार अनिता आनंद यांना कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच एका हिंदू वंशाच्या महिलेला इतकं प्रतिष्ठित पद कॅनडामध्ये मिळालं आहे. १३ मे च्या दिवशी भगवद्गीतेवर हात ठेवून त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह मणिंदर सिंधू, रुबी सहोता आणि रणदीप सराय हे सगळेही सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.

कोण आहेत अनिता आनंद?

५८ वर्षीय अनिता आनंद यांची आई सरोज तमिळी तर वडील एस. व्ही. आनंद पंजाबी वंशाचे डॉक्टर होते. अनिता या केंटविल, नोवा स्कॉटिया या ठिकाणी लहानाच्या मोठ्या झाल्या. क्वीन्स विद्यापीठ आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. २०१८ मध्ये त्या ओकविलच्या खासदार झाल्या, त्यवेळी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार होणाऱ्या त्या पहिल्या हिंदू वंशाच्या नेत्या ठरल्या.

अनिता आनंद यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?

अनिता आनंद या २०१९ ते २०२१ सार्वजनिक सेवा मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. करोना काळात कुणालाही लसी कमी पडणार नाहीत याची खबरदारी त्यांनी उत्तम पद्धतीने घेतली. त्यानंतर त्यांना संरक्षण मंत्रालय देण्यात आलं. त्यावेळी त्यांनी कॅनडातील सैन्यदलांचं आधुनिकीकरण केलं. आता परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. आता विविध देशांशी असलेले व्यापार संबंध सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

अनिता आनंद यांच्या समोरची आव्हानं काय?

अनिता आनंद या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री झाल्याने कॅनडा आणि भारत यांच्यातले बिघडलेले संबंध सुधारु शकतील अशी अपेक्षा आहे. तसंच कॅनडाचे अमेरिकेशी असलेले संबंधही बिघडले आहेत. त्यामुळे परराष्ट्र मंत्री म्हणून अनिता आनंद यांना मोठी आव्हानं पेलावी लागणार आहेत. दरम्यान मेलानी जोली यांना उद्योग मंत्री करण्यात आलं आहे. तर फ्रँकोईस फिलिप या अर्थमंत्रीच राहणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा विरोधात दाखवलेल्या आक्रमकतेचा प्रतिकार करु हे आश्वासन देऊन कर्नी यांनी ही निवडणूक जिंकली आहे. आता पुढे काय होणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे.

कॅनडामध्ये लिबरल पक्ष पुन्हा सत्तेत

पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवून लिबरल पक्ष कॅनडामध्ये सत्तेत परतला. पक्षाला १६७ जागा मिळाल्या. तथापि, हे बहुमताच्या १७२ च्या आकड्यांपेक्षा ५ ने कमी आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये कॅनडामध्ये निवडणुका अधिकृतपणे होणार असल्या तरी, पंतप्रधान मार्क कार्नी यांनी गेल्या महिन्यात नवीन निवडणुकांची घोषणा केली आणि ट्रम्पशी सामना करण्यासाठी त्यांना मजबूत जनादेशाची आवश्यकता असल्याचे सांगितले. २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान असलेले जस्टिन ट्रूडो यांनी या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर मार्क कार्नी यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली.