ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या २३ मार्च रोजी लोकपाल, लोकायुक्तसाठी दिल्लीत उपोषण करणार आहेत. परंतु, या उपोषण आंदोलनाला ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बोलावणार नाहीत. केजरीवाल हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशा लोकांनी माझ्याकडे येण्याची गरज नाही. त्यांच्या आमदारांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. ही बाबही चांगली नाही. निष्पक्ष कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
अण्णा हजारे मंगळवारी सीतापूर (उत्तर प्रदेश) येथील राजा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. ते म्हणाले, दिल्लीमध्ये मी दोनवेळा उपोषणाला बसलो.. दोन्ही वेळेस तेथील सरकार पडले. यावेळी हेच होणार आहे. काँग्रेसने लोकपाल कायदा करून फसवणूक केली आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे एक प्रामाणिक व्यक्ती होते. पण त्यांनी कायदा न करता देशाला धोका दिला.
अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मला अपेक्षा होती की अच्छे दिन येतील. पण त्यांनी भ्रष्टाचार आणखी वाढवून ठेवला आहे. कलम ४४ संमत करून अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. ही पण एक चोरीच आहे, असे ते म्हणाले.
पिकाला योग्य दर मिळावा, लोकपाल कायदा व्हावा, प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमावा या सर्वांसाठी लढण्याची वेळ आली आहे. शेतकरी संघटनांना संघटीत व्हावे लागेल. समाजसेवी संस्थांनाही एकजूट व्हावे लागेल, असे सांगत सरकार पिकांचे योग्य भाव ठरवत नसल्यामुळे कृषी मूल्य आयोगाची स्थापना करून त्याला संवैधानिक दर्जा देण्याची त्यांनी मागणी केली. योग्य भाव न मिळाल्याने मागील २२ वर्षांत १३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ते म्हणाले.