‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्याचा सरकारचा निर्णय पूर्णपणे योग्य नव्हता. मात्र आता सरकार एकदा घेतलेल्या निर्णयापासून माघार घेऊ शकत नसल्याची कबुली खुद्द माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटलींनी आपल्यासमोर दिली होती, असा गौप्यस्फोट ऑस्कर विजेता रसुल पोकुट्टी याने शुक्रवारी केला. पोकुट्टीने ट्विटरवरून केलेल्या या दाव्यामुळे एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादात नवी भर पडली आहे.
एफटीआयआयच्या संचालक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान यांच्यासह इतर काही सदस्यांना हटवून या संचालक मंडळाची पुनस्र्थापना करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे.
गजेंद्र चौहान यांनी आपल्याला एकदा काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता.
दरम्यान अभिनेते ऋषी कपूर यांनीही शुक्रवारी ट्विटरवरून गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदावरून दूर होण्याचा सल्ला दिला. जर तुम्ही त्यांना नको असाल, तर अध्यक्षपदाचा आग्रह धरण्यात काहीही अर्थ नाही. स्वत:च्या स्वाभिमानाला स्मरून पदावरून दूर व्हा, असे ऋषी कपूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
गजेंद्र यांना पदावरून दूर करा- दिग्विजय
एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना पदावर दूर करावे कारण त्यांची नेमणूक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना सरकारी संस्थांमध्ये घुसवण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे, असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun jaitley admitted not making best of choice on gajendra chauhan appointment claims resul pookutty