करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने माल वाहतुकीवर याचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या औषधनिर्मिती क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता या कंपन्यांनी वर्तवली आहे.

देशभरात लॉकडाऊनमुळे राज्या-राज्यांच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. याचाच फटका भारतीय औषधनिर्मिती क्षेत्राला बसला आहे. यामुळे औषधांच्या पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. फार्मा कंपन्यांच्या मालकांचे म्हणणे आहे की, “औषधांच्या पॅकेजिंगसाठी आवश्यक असणारे फॉइल, पॅकेजिंग मटेरियल आणि प्रिंटर बनवणारी काही सहाय्यक युनिट बंद झाल्यामुळे त्यांना उत्पादन प्रक्रिया थांबविणे भाग पडले आहे.” इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

चंदीगड येथील व्यावसायिक विभोर जैन म्हणाले, “औषधांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या महिला कामगार पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने घराबाहेर पडत नाहीत. सोशल मीडियातून या काळात पोलिसांचे नकारात्मक चित्र उभे राहिले आहे. सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करीत असल्याचे यातून दिसते आहे.”

औषधासारख्या जीवनावश्यक वस्तू तयार करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने सध्या औद्योगिक कंपन्या चालवण्यास स्थगिती दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात काम सुरु ठेवण्यासाठी विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे. यामुळे अनेकांनी त्यांचे फार्मा युनिट बंद ठेवले आहेत, असेही जैन यांनी सांगितले.

त्याचबरोबर, परिवहन सेवाही स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, बद्दी, चंदीगड आणि पंजाबच्या इतर भागांमध्ये औषधांचा साठा तयार आहे. मात्र, ट्रक चालक माल वाहतूक करण्यास तयार नसल्याने हा औषधांचा साठा असाच पडून आहे. त्याचबरोबर पॅकेजिंग सामग्रीच्या अनुपलब्धतेमुळे देखील फार्मास्युटिकल व्यवसायाला फटका बसत असल्याचे जैन यांनी म्हटले आहे.