Father of Lt. Vinay Narwal, Killed in Pahalgam to Asim Munir: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या वडिलांनीही आपल्या मुलासाठीही इतर कुठल्याही सामान्य वडिलांसारखंच स्वप्न उराशी बाळगलं होतं. विनय यांचं लहानपणापासूनच सैन्यात जायचं स्वप्न होत. सैन्य दल रस्त्यावरून जाताना ते वडिलांना घेऊन जात असत. त्यांच्या स्वभावात धैर्य, नेतृत्वगुण, प्रामाणिकपणा आणि शिस्त होती. दोन वर्षांतच त्यांनी नौदलात लेफ्टनंट पद मिळवलं. मात्र त्यांच्या लग्नाच्या काही दिवसांतच आयुष्याने त्यांच्यावर मोठा आघात केला.
२२ एप्रिल रोजी विनय आणि त्यांच्या पत्नी हिमांशी बैसरणच्या कुरणावर बसून भेळ खात होते. त्याच वेळी एका दहशतवाद्याने त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. त्या घटनेनंतरचा हिमांशी नरवाल यांचा पतीच्या मृतदेहाजवळ बसलेला फोटो देशभर व्हायरल झाला आणि दहशतवाद्यांच्या निर्घृणतेचे भयानक चित्र सर्वांसमोर आलं.
राजेश नरवाल यांनी सांगितलं की, कुटुंब अद्याप जबर धक्क्यात आहे. “आम्हाला झोप लागत नाही. औषधं घेतली, डॉक्टरांकडे गेलो, पण या वेदनेवर कोणताही इलाज नाही,”
अमेरिकेने TRF ला (द रेसिस्टन्स फ्रंट) दहशतवादी संघटना घोषित केल्याचं स्वागत केलं, पण ही कारवाई अपुरी असल्याचं ते म्हणाले. TRF ही पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची संघटना आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारीही TRF ने घेतली होती. “फक्त आर्थिक निर्बंध लावून हे थांबणार नाही. अशा संघटनांचं जाळं पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
१६ जुलैच्या रात्री भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून कारवाई केली. त्यात मुजफ्फराबाद, कोटली, बहावलपूर, रावळकोट, चक्सवारी, भिंबर, नीलम व्हॅली, झेलम आणि चाकवा या भागांचा समावेश होता.
राजेश नरवाल म्हणाले, “आम्ही मुलाला सत्य आणि प्रामाणिकपणाचं धडे देऊन मोठं केलं. तो निर्भयपणे जगला आणि तसाच गेला. माझ्यासाठी तो नेहमीच हिरो राहील.” आम्ही जे दु:ख अनुभवलं आहे, त्याची कल्पना पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांना तेव्हाच येईल जेव्हा त्यांच्या स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला कोणीतरी हानी पोहोचवेल. जर मला कोणी बंदूक दिली आणि मी त्यांच्या मुलाला किंवा मुलीला मारलं, तर त्याच वेळेसत्यांना माझं दु:ख कळेल,” असं राजेश नरवाल यांनी NDTV शी बोलताना सांगितलं.