Sunita Williams return to earth date: बोईंग स्टारलायनर या अंतराळयानाच्या चाचणीसाठी केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर हे अडीच महिन्याहून अधिक काळ अंतराळातच अडकले आहेत. आता त्यांचा परतीचा प्रवास आणखी लांबणीवर गेला असून नासातर्फे बोईंग स्टारलायनर यान मोकळेच पृथ्वीवर आणले जाणार आहे. ५ जून रोजी पृथ्वीवरून अंतराळात झेपावलेल्या सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर पृथ्वीवर कधी येणार? याबाबत आता नासाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
नासाने शनिवारी (दि. २४ ऑगस्ट) जाहीर केले की, सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना न घेताच बोईंग स्टारलायनर पृथ्वीवर परतेल. त्यामुळे दोन्ही अंतराळवीरांना आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात एलॉन मस्क यांची कंपनी ‘स्पेस एक्स’च्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीवर परत आणले जाईल. तोपर्यंत विल्यम्स आणि विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील पथकाबरोबर कार्य करतील. ज्यामध्ये संशोधन, स्थानकाची देखभाल आणि टेस्टिंगसारखी कामे त्यांना करावी लागणार आहेत.
नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, अंतराळयान सुरक्षित आणि नित्याचे असले तरी ते धोकादायक आहे. मात्र ही एक चाचणी होती. जी कधीही पूर्णपणे सुरक्षित नसते. दोन्ही अंतराळवीरांची सुरक्षा आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. नासा आणि बोईंग कर्मचाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी स्टारलायनरच्या समस्यांवर खोलात जाऊन काम केले. आता स्टारलायनरला विना अंतराळवीर परत आणले जाणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्टारलायनर आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकापासून वेगळे करण्यात येईल आणि स्वनियंत्रण प्रणालीद्वारे त्याला पृथ्वीवर आणले जाईल.
६ जून रोजी बोईंग स्टारलायनरमध्ये हेलियमची गळती होण्याची समस्या सुरू झाली. तसेच यानाच्या थ्रस्टर्समध्येही बिघाड झाला. यानात आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अभियांत्रिकी पथकाने अथक प्रयत्न केले. डेटाची तपासणी, सुरक्षा प्रणाली आणि इतर बाबींचा सखोल अभ्यास यादरम्यान करण्यात आला.
नासाचे अंतराळ मोहीम संचालनालयाचे सहयोगी प्रशासक केन बोवर्सॉक्स म्हणाले की, सुरक्षेला महत्त्व देऊन पथकाने अतिशय पारदर्शक असे मतप्रदर्शन केले आहे. अंतराळयान पृथ्वीवरून झेपावल्यापासून ते अंतराळ स्थानकात पोहचण्यापर्यंतच्या प्रवासात आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. विना अंतराळवीर यान पृथ्वीवर आणणे हेदेखील भविष्यातील अंतराळ मोहीमांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
बोईंगच्या स्टारलायनरची ही पहिलीच मानवयुक्त मोहीम होती. बोईंग डिफेन्स, स्पेस अँड सिक्युरिटी या कंपनीने अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्यासाठी स्टारलायनर यानाची निर्मिती केली. नासाच्या व्यावसायिक क्रू कार्यक्रमाअंतर्गत बोईंग यान तयार करण्यात आले होते. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला. नासाने ऑक्टोबर २०११ मध्ये बोईंगला अंतराळयान बनविण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. स्टारलायनरची निर्मिती करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला. २०१७ ते २०१९ पर्यंत याच्या अनेक विना मानव चाचण्या घेण्यात आल्या.
© IE Online Media Services (P) Ltd