विज्ञानाला उत्तेजन देण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता असून विज्ञान तंत्रज्ञानावरील खर्च हा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्के तरी असला पाहिजे, असे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. जम्मू येथील पहिल्या तर एकूणात १०१  व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन करताना ते बोलत होते. नॅशनल मिशन ऑन हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग व न्यूट्रिनो वेधशाळा यांच्यासाठी ९००० कोटी रुपयांचा योजनाखर्च त्यांनी यावेळी जाहीर केला.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नॅशनल मिशन ऑन हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग या कार्यक्रमाची घोषणा केली त्यात ४५०० कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे. नॅशनल जिऑग्राफिकल इनफॉर्मेशन सिस्टीम या व्यवस्थेसाठी ३००० कोटींचा योजना खर्च अपेक्षित आहे. आपल्या शिक्षकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी राष्ट्रीय योजना हाती घेतली जाईल असेही त्यांनी सूचित केले. बीटी पिकांचे म्हणजे जनुकसंस्कारित पिकांचे समर्थन करताना  त्यांनी सांगितले की, यात सुरक्षा महत्त्वाची आहे. गैरवैज्ञानिक बाबींना आम्ही महत्त्व देत नाही. अन्न सुरक्षा व पाण्याची उपलब्धता यासाठी सदाहरित क्रांती होण्याची गरज आहे. पंचवीस जणांना जवाहरलाल नेहरू फेलोशिप जाहीर करण्यात येत असून त्यात बाहेरील वैज्ञानिकांना तीन वर्षांतून एकदा १२ महिने भारतात संशोधन करता येईल. या उपक्रमाअंतर्गत १ लाख अमेरिकी डॉलरचे अनुदान संशोधकांना तीन वर्षांत दिले जाईल. सरकारने पाच वैज्ञानिकांची निवडही केली असून ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो आहेत.
सीएनआर राव यांना भारतरत्न जाहीर करून आम्ही विज्ञानाला महत्त्व देण्यास सुरूवात केली आहे. या क्षेत्रात आणखी भारतरत्न तयार व्हावेत हीच आमची सदिच्छा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जयपाल रेड्डी यांनी सांगितले की, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने तीन वर्षांत २ लाख अभिनव कल्पना शोधल्या. त्यात एक हजार मुलांना पारितोषिके मिळाली आहेत.  बंगलोर हे जगातील चौथे अभिनव संकल्पना शोधणारे शहर मानले जाते. तेथील संस्थांनी पाच हजार पेटंट घेतली आहेत. अमेरिकेच्या अ‍ॅसेनश्युअर कंपनी खालोखाल सर्वाधिक पेटंट ही इन्फोसिसची आहेत. सॅपमध्ये २० टक्के विकासात्मक काम हे हैदराबाद येथे झाले आहे. सरकारने इन्स्पायर योजनेत १ लाख मुलांना अभिनव शोधांसाठी बक्षिसे दिली व त्यातील ४०० पेटंट दर्जाची संशोधने आहेत असे ते म्हणाले.
पाच वैज्ञानिकांना
जवाहरलाल नेहरू विद्यावृत्ती
टेक्सास विद्यापीठातील कॉम्प्युटेशनल बायॉलॉजिस्ट प्रा.एम.विद्यासागर, कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे  खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी, कॅनडातील बेडफर्ड सागरशास्त्र संस्थेचे भूगर्भशास्त्रज्ञ  प्रा.ट्रेव्हर चार्लस प्लॅट, न्यूयॉर्क विद्यापीठातील गणित वैज्ञानिक प्रा. श्रीनिवास वर्धन व केंब्रिज विद्यापीठातील प्रा.अझीम सुरानी यांची जवाहरलाल नेहरू विद्यावृत्तीसाठी निवड झाली आहे.

विज्ञानात आपला आलेख चढाच..
विज्ञानात काही करायचे असेल तर विज्ञान व तंत्रज्ञानावरील खर्च हा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्के तरी असायला हवा. सरकार व उद्योग यांनी संयुक्तपणे हा खर्च करावा. भारत युरोपियन ऑरगनायझेशन फॉर न्युक्लियर रीसर्चच्या सर्न या संशोधन संस्थेत सदस्य म्हणून सहभागी होत आहे. गुरूत्वीय लहरी प्रयोगात भारतात जगातला तिसरा डिटेक्टर असणार आहे. तामिळनाडूत न्यूट्रिनो वेधशाळा १४५० कोटी रुपये खर्च करून उभारली जात आहे. भारतीय वैज्ञानिक फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टरसाठी जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. अणुतंत्रज्ञानाच्या या नवीन क्षेत्रात भारत अग्रेसर असणार आहे. चांद्र मोहीम, मंगळ मोहीम हे भारताच्या प्रगतीचे पुरावे आहेत. सुनामी लाटा उसळणार असतील तर तेरा मिनिटे आधी पूर्व सूचना मिळवण्याची क्षमता लवकरच प्राप्त होत आहे.
    – पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग</strong>