ग्रँड ब्लँक टाउनशिप : अमेरिकेमध्ये मिशिगन येथे एका पिक-अप ट्रकचालकाने पिक-अप ट्रक चर्चमध्ये घुसवून अंदाधुंद गोळीबार केला आणि चर्चची इमारत पेटवून दिली. त्यात चार जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले. चर्चमध्ये रविवारच्या ‘‘अमेरिकेतील ही हिंसेची साथ लवकरात लवकर संपायलाच हवी. हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांप्रति प्रार्थना,’’ अशी श्रद्धांजली ट्रम्प यांनी मृतांना वाहिली.

चर्चवरील हा हल्ला अमेरिकी वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता झाला. चर्चेमध्ये पिक-अप ट्रक घुसवल्यानंतर हल्लेखोर दोन अमेरिकी झेंड्यांसह बाहेर आला आणि गोळीबार सुरू केला. पोलीस प्रमुख विल्यम रेन्ये यांनी ही माहिती दिली. हल्ल्यानंतर चर्चमध्ये भीतीचे वातावरण होते. मुलांना सुरक्षित स्थळी लपविण्यासाठी सर्व जण प्रयत्न करीत होते.हल्लेखोराने आग लावण्यासाठी ज्लालाग्राही वायूचा वापर केला. त्याच्याकडे स्फोटकेही होती. पण, त्याने ती वापरली, की नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही.

थॉमस सॅनफोर्ड (वय ४०) असे हल्लेखोराचे नाव आहे. चर्चमधून पोलिसांना पाचारण केल्यानंतर अवघ्या आठ मिनिटांत हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला. सॅनफोर्ड बर्टन येथील तो रहिवासी होता. या प्रकरणाचा ‘एफबीआय’ अधिक तपास करीत आहे.

इतर चर्चमध्ये बॉम्बची अफवा

या हल्ल्यानंतर परिसरातील इतर चर्चमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवा पोलिसांकडे आल्या. तपासणी केली असता त्यांना तेथे काहीही आढळले नाही. मिशिगनचे पोलिस प्रमुख किम व्हेटर यांनी ही माहिती दिली.