भारताकडून पाकिस्तानमध्ये अस्थिरता पसरविण्यात येत असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केला. ते बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलत होते. यावेळी शरीफ यांनी आपल्या भाषणात भारत आणि पाकमध्ये शांतता नांदावी यासाठी चार कलमी प्रस्तावदेखील मांडला. यामध्ये काश्मीर आणि सियाचीनमधून सैन्य मागे घेणे, २००३ च्या शस्त्रसंधीच्या कायद्याचा अवलंब करणे अशा अटींचा समावेश आहे. दोन देशांमध्ये शांतता राखण्यासाठी हे अत्यंत सोपे उपाय असल्याचे शरीफ यांनी म्हटले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत शरीफ यांनी केलेले बहुतांश भाषण काश्मीरच्या मुद्द्याभोवतीच केंद्रित होते. यावेळी शरीफ यांनी काश्मीरच्या नागरिकांची तुलना त्यांनी थेट पॅलेस्टिनी नागरिकांशी केली. पॅलेस्टिनी आणि काश्मीरी नागरिकांच्या भूमीवर परकियांची सत्ता आहे. त्यामुळे येथील जनतेला अत्याचार सहन करावे लागत आहेत. असे शरीफ यांनी म्हटले . तसेच काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सुटू शकतो. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये संवाद व्हायला हवा. असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, शरीफ यांनी मुंबई आणि भारतातील दहशतवादी हल्ल्यांविषयी बोलणे सोयीस्करपणे टाळले.
दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शरीफ यांच्या आरोपांना ट्विटरवरून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीरमधून लष्कर हटवणे हे समस्येवरचे उत्तर नाही. स्वत:च्या देशात पोसत असलेल्या दहशतवादामुळेच पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. शेजाऱ्यांवर आरोप करणे हे तुमच्या समस्येचे उत्तर नसल्याचा सणसणीत टोला विकास स्वरूप यांनी पाकला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At un sharif accuses india of fomenting instability in pak proposes 4 point peace formula