पीटीआय, नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या मजबूत हवाई सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानची एकूण एक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट केली. पाकिस्तानच्या या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील काही लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले असून यात लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा पूर्णत: नष्ट करण्यात यश आल्याची माहिती आहे. त्याच वेळी दोन्ही देशांमध्ये वाढलेला तणाव कमी करणे हे पूर्णत: पाकिस्तानच्या हातात आहे, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने खडसावले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन ताज्या घडामोडींची माहिती दिली. पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्रीनंतर अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कुपवाडा, जालंधर, लुधियाना, अदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलिया आणि भुज येथील लष्करी आस्थापनांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न ‘इंटिग्रेटेड काउंटर एनमॅन्ड एअरक्राफ्ट’ प्रणालीने हाणून पाडला. याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील अनेक रडार यंत्रणांना लक्ष्य केल्याची तसेच या कारवाईत लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा निष्प्रभ करण्यात यश आल्याची शक्यता कर्नल कुरेशी यांनी व्यक्त केली. त्याच वेळी पाकिस्तानने सीमाभागात शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच ठेवले असून गोळीबार तसेच तोफगोळ्यांच्या माऱ्यात १६ सर्वसामान्य नागरिकांचे बळी गेल्याचे मिस्राी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी लाहोरमधील यंत्रणा नष्ट झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केल्याचे ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
गुरुवारी रात्री भारतातील १५ लष्करी ठिकाणांवर पाकिस्तानने हल्ले केले. मात्र हे सर्व हल्ले ‘इंटिग्रेटेड काउंटर-यूएएस ग्रिड’ आणि हवाई संरक्षण प्रणालीने भेदले. प्रत्युत्तरादाखल, आज सकाळी भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानी सैन्याची अनेक रडार लक्ष्य केली. ज्या पद्धतीने आणि प्रमाणात पाकिस्तानने हल्ला केला, त्याच प्रमाणात प्रत्युत्तर दिले जाईल. – कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह
अमृतसरमध्ये क्षेपणास्त्रांचे अवशेष
अमृतसर जिल्ह्यातील एका गावात गुरुवारी कथितरीत्या पाकिस्तानी क्षेपणास्त्रांचे अवशेष आढळून आले. जेठुवाल गावातील शेतामध्ये हे अवशेष सापडले असून भारतीय यंत्रणांनी हवेत टिपलेली ही क्षेपणास्त्रे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे अवशेष तपासणीसाठी न्यायवैद्याक तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले असून लष्करालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.