Avimukteshwaranand Saraswati on Thackaray Family : हिंदी भाषेला मराठी भाषेच्या आधी ओळख मिळाली आहे. महाराष्ट्र तेव्हा अस्तित्वातही नव्हता असं विधान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं आहे. एवढंच नाही तर भगवा दहशतवाद या शब्दावर आणि देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसवरही अविमुक्तेश्वरानंद यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद?

हिंदी भाषेला कधी ओळख मिळाली? मराठीला ओळख कधी मिळाली याचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की हिंदी भाषेला आपल्या देशात राजभाषा म्हणून आधी ओळख मिळाली आहे. १९६० मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्य तयार झालं तेव्हा मराठी भाषेला राज्यभाषा म्हणून ओळख मिळाली असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.

अविमुक्तेश्वरानंद यांची काँग्रेसवर टीका

अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, “ज्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली त्यांचे अनुयायी काहीही बोलतात. देशाचे दोन तुकडे ज्यांच्यामुळे झाले ते आम्ही नाही. हिंदू कधीही वाटण्याच्या गोष्टी करत नाही. तो एकोप्याने राहतो. आमच्यामुळे देशाचे तुकडे झालेले नाहीत.” असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. तसंच भगवा दहशतवाद याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं.

दहशतवादाला कशाला रंग देता?

“दहशतवादाला कुठलाही रंग किंवा धर्म नसतो. दहशतवादी हा दहशतवादी असतो. भगवा दहशतवादी असेल तर काय पूजा करणार का त्याची? रंगाचा आणि दहशतवादाचा काय संबंध आहे? दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशक्ती दाखवायला हवी. मुंबईत स्फोट झाले दहशतवादी सापडलेले नाहीत. मालेगावच्या स्फोटातले आरोपी सापडलेले नाहीत. दहशतवादाला रंग नसतो, विविध रंगी आयुष्य असतं. दहशतवादाला रंग नसतो रंगाचा आणि दहशतवादाचा काहीही संबंध नाही” असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.

जुलै महिन्यात काय म्हणाले होते अविमुक्तेश्वरानंद?

मराठीला कानशि‍लात लगावणारी भाषा बनवल्याने यश मिळेल का?, हिंदी ही राजभाषा आहे, त्याचा प्रोटोकॉल असतो, असे म्हणत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी हिंदी-मराठीच्या भाषेवर आपली थेट प्रतिक्रिया दिली. ठाकरे हेही महाराष्ट्राच्या बाहेरुन आले होते, ठाकरे मगधमधून आले होते, त्यांनाही मराठी येत नव्हती. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत, असे म्हणत सरस्वती महाराजांनी ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यावरुन परखडपणे भूमिका मांडली होती.

ठाकरे कुटुंब मूळचं बिहारचं

मराठीचा आग्रह जे धरत आहेत ते ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरुन आले आहेत. त्यांच्याच कुटुंबातील आजोबा-पणजोबांनी जे लिहून ठेवलंय त्यात हे म्हटलं आहे की आम्ही मगधहून आलो होतो. मगधहून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का? महाराष्ट्राने मगधहून आलेल्या ठाकरेंना स्वीकारलं. त्यांना इतकं मोठं केलं की त्यांचे वंशज मराठीसाठी भांडत आहेत. मराठीला थोबाडीत देणारी भाषा, मारहाण करणारी भाषा बनवायची आहे का? असा प्रश्न अविमुक्तेश्वरानंदांनी विचारला होता. त्यावर आज राज ठाकरे काही भाष्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.