Glacier Burst: उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तराखंडच्या काही भागांत सुरू असलेल्या बर्फवृष्टी दरम्यान ही दुःखद घटना घडली आहे. वृत्तानुसार, चमोली येथील बद्रीनाथ धाम येथील माना गावाजवळील हिमनदीखाली गाडलेल्या ५७ कामगारांपैकी १६ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित ४१ कामगारांचा शोध सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी सांगितले की, “चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथजवळील माना येथे हिमस्खल झाल्यामुळे ५७ कामगार गाडले गेले आहेत. त्यापैकी १६ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

हे सर्व कामगार बीआरओशी करार केलेल्या कंत्राटदाराचे असल्याचे सांगण्यात येत आहे. चमोलीच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर महामार्गाजवळ हा अपघात झाला.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघातावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओकडून सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अनेक कामगार हिमस्खलनाखाली दबल्याची दुःखद बातमी कळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो”, असे मुख्यमंत्री धामी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले.

पोलीस मुख्यालयाचे प्रवक्ते आयजी नीलेश आनंद यांनी दुजोरा दिला की, हिमस्खलनात अडकलेल्या ५७ कामगारांपैकी १० जणांना वाचवण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मानाजवळील लष्करी छावणीत दाखल करण्यात आले आहे.

बचावकार्यात अडथळे

या अपघातानंतर बचाव कार्यात तीन ते चार रुग्णवाहिका देखील सहभागी झाल्या आहेत. बचाव पथके हिमस्खलनाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जोरदार हिमवृष्टीमुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहचण्यात अडथळे येत आहेत. चमोलीचे संदीप तिवारी म्हणाले की, “मुसळधार बर्फवृष्टीमुळे तिथे हेलिकॉप्टर सेवा वापरता येत नाही. संवाद साधण्यासाठी सॅटेलाइट फोन किंवा इतर उपकरणेही नाहीत.”

चार धाम यात्रेची घोषणा

उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आता ही दुर्घटना बद्रीनाथच्या अगदी जवळ घडली असल्याने, बर्फ हटवण्याचे काम खूप वेगाने केले जात आहे, रस्ता वेळेत मोकळा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून डोंगराळ भागात हवामान खूपच खराब आहे. उत्तराखंडसह, हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक वाहनेही वाहून गेली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badrinath glacier burst 2025 workers trapped avalanche aam