Mir Yar Baloch Balochistan independence from Pakistan : बलोच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी (१४ मे) बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे. अनेक दशकांपासून बलुचिस्तानात चालू असलेली हिंसा, मानवी तस्करी, बेपत्ता होणारी माणसं, मानवाधिकाराचं उल्लंघन पाहून आम्ही पाकिस्तानपासून स्वतंत्र होत असल्याची मीर यार बलोच यांनी घोषणा केली आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. “जगाने आता शांत बसू नये, त्यांनी आम्हाला देश म्हणून मान्यता द्यावी”, असंही मीर यार बलोच यांनी म्हटलं आहे. त्यांनी भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाकडे समर्थनाची मागणी केली आहे.
मीर यार बलोच यांनी पाकिस्तानी सरकार व लष्कराला उद्देशून म्हटलं आहे की “तुम्ही आम्हाला माराल, तर आम्ही पुन्हा उभे राहू, आम्ही आमचा वंश वाचवण्यासाठी धडपडतोय, आम्हाला साथ द्या”. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेल्या बलुचिस्तानमधील बलोच लोक रस्त्यावर उतरले आहेत. बलुचिस्तान हा आता पाकिस्तानचा भाग नाही असा निर्णय त्यांनी घेतला आहे. जगाने डोळ्यावर पट्टी बांधून याकडे केवळ बघत बसू नये, असंही मीर यार यांनी म्हटलं आहे.
आम्हाला पाकिस्तानी म्हणणं थांबवा : बलोच नेत्याची विनंती
बलोच नेत्याने भारतीय प्रसारमाध्यमं, युट्यूबर्स व बुद्धीजीवी लोकांना विनंती केली आहे की “आम्ही बलुची लोक आहोत. आम्ही पाकिस्तानी नाही. आम्हाला पाकिस्तानी म्हणणं थांबवा. पंजाबी लोक (पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लोक) हे केवळ पाकिस्तानी आहेत. कारण त्यांनी कधी त्यांच्यावर हल्ले झालेले पाहिले नाहीत. ना त्यांच्यावर बॉम्बवर्षाव होतो, त्यांना कधी नरसंहाराचा सामना करावा लागलेला नाही किंवा त्यांचे लोक अचानक बेपत्ता देखील होत नाहीत”.
भारताने पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडून तो प्रदेश रिक्त करण्यास सांगितलं आहे. भारताच्या या मागणीचं मीर यार बलोच यांनी समर्थन केलं आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानी सरकारकडे मागणी केली आहे की त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा. ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर सोडण्यास सांगावं. आम्ही भारताच्या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन करतो. पाकिस्तानने भारताचं ऐकलं नाही तर १९७१ सारखी घटना पुन्हा पाहायला मिळू शकते. पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या मनातील लालसेमुळे पुन्हा एकदा ९३,००० पाकिस्तानी सैनिकांना भारतासमोर शरणागती पत्करावी लागू शकते. १९७१ ला ढाक्यात जे झालं तेच काश्मीरमध्ये होऊ शकतं. भारत पाकिस्तानी लष्कराला पराभूत करण्यास सक्षम आहे.”
बलुचिस्तानचं स्वातंत्र्य व सार्वभौमत्त्व मान्य करावं : मीर यार बलोच
मीर यार बलोच यांनी भारतासह जगभरातील देशांना आवाहन केलं आहे की त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता द्यावी. बलुचिस्तान हे जबरदस्तीने आणि परकीय शक्तींच्या सहाय्याने पाकिस्तानात विलीन करण्यात आलं होतं. मात्र, आता आम्ही स्वतंत्र आहो. जगानेही आमचं स्वातंत्र्य व सार्वभौमत्त्व मान्य करावं.
© IE Online Media Services (P) Ltd