Bangladeshi actress caught in Kolkata : कोलकाता येथील लालबाजार गुप्तहेर विभागाने एका २८ वर्षीय बांगलादेशी महिलेला आधार आणि मतदार ओळखपत्रे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या महिलेचे नाव शांता पॉल असे असून पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती व्यावसायाने अभिनेत्री आणि मॉडल आहे. ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून ओळख लपवून भारतात राहत होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉल या महिलेने बागलादेशात अनेक मॉडलिंग स्पर्धा जिंकल्या आहेत आणि ती बिजॉयगड, जाधवपूर येथे २०२३ पासून राहत आहे. तिला पार्क स्ट्रीट पोलीस ठाण्याजवळून अधिकाऱ्यांनी अटक केली .
तिच्या अटकेवेळी तिच्या घराची झडती घेण्यात आली यावेळी पोलिसांना वेगवेगळी अनेक ओळखपत्रे सापडली आहेत, ज्यामध्ये बांगलादेशी माध्यमिक परीक्षेचे ओळखपत्र, बांगलादेश येथे जारी करण्यात आलेले एक एअरलाइन आयडी, दोन आधार कार्ड- ज्यापैकी एक कोलकाता येथे नोंदणी केलेले आणि दुसर वर्धमान येथील आहे. पोलिसांनी सांगितले की, वर्धमान येथे नोंदणी केलेले आधार कार्ड हे २०२० मध्ये जारी करण्यात आले होते.
पॉलने ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात एक फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे, येथे तिने वेगळाच पत्ता दिला आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने अनेक वेळा तिचा पत्ता बदलला असून ती वेगवेगळ्या नावाने भारतात राहत आी आहे. अॅप-कॅब व्यावसायातील तिच्या सहभागामुळे ती यंत्रणांच्या रडारावर आली.
पोलिसांनी सांगितले की पॉल तिच्याकडून भारतीय कागदपत्रे कशी आली याबद्दल ती समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. तपास अधिकाऱ्यांना यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे आणि ही कागदपत्रे कशी मिळवली गेली याबद्दल सध्या तपास सरू आहे.
लालबजार गुप्तचर विभागाने, युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIAI), निवडणूक आयोग आणि राज्य अन्न विभागाकडे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र, राशन कार्ड यांच्या सत्यतेची तपासणी करण्यासाठी संपर्क साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मूळची बांगलादेशातील बरिसाल येथील आहे.
पॉलला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने तिला ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेल्या तिचा पती तसेच तिच्या पालकांची देखील चौकशी केली जात आहे, जे तिच्याबरोबर दक्षिण कोलकात्यातील फ्लॅटमध्ये राहत होते. याबरोबरच या महिलेच्या एका पुरूष साथिदाराचीही चौकशी केली जात आहे.
पॉलने २०१९ मध्ये केरळमध्ये झालेल्या मिस एशिया ग्लोबल स्पर्धेत भाग घेतला. इतकेच नाही तर एका मुलाखतीत तिने आपण बंगाली आणि तेलगु चित्रपटात काम करत असल्याचे म्हटले होते.