एपी, लंडन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण योग्यरीत्या प्रसारित न करण्यावरून टीका झाल्यानंतर ‘बीबीसी’चे महासंचालक टीम डेवी आणि वृत्तप्रमुख डेबोरा टर्नेस यांनी रविवारी राजीनामा दिला आहे. ‘बीबीसी’ने ही माहिती दिली. दरम्यान, या घडामोडींनंतर ‘बीबीसी’चे अध्यक्ष समीर शाह यांनी या प्रकरणावरून सोमवारी दिलगिरी व्यक्त केली.

ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी वॉशिंग्टनमध्ये केलेले भाषण योग्यरीत्या संकलित न केल्याबद्दल ‘बीबीसी’वर टीका करण्यात आली होती. या भाषणादरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

‘बीबीसी’ने ट्रम्प यांचे भाषण डॉक्युमेंटरीसाठी संपादित केलेले भाषण दिशाभूल करणारे होते. समर्थकांनी शांततेने निदर्शने करावीत, हे ट्रम्प यांचे आवाहन संकलातून वगळण्यात आले होते, असा टीकाकारांचा आक्षेप होता.

डेवी यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून राजीनाम्याची माहिती दिली. ‘हा निर्णय पूर्णपणे माझा आहे,’ असे त्यांनी सांगितले. टर्नेस यांनी सांगितले, की ट्रम्प यांच्या भाषणावरून तयार झालेला वाद आता इथपर्यंत पोहोचला आहे, की ‘बीबीसी’चे, जी माझी अत्यंत आवडती संस्था आहे, तिचे आता नुकसान होत आहे.

दरम्यान, ‘बीबीसी’च्या महासंचालकांच्या राजीनाम्याचे ट्रम्प यांनी स्वागत केले आहे. तसेच, अशा प्रकारे भाषण संपादित करणे हा अध्यक्षीय निवडणुकीवर परिणाम करणारा घटक होता, असे म्हटले आहे. ‘बीबीसी’चे अध्यक्ष समीर शाह यांनी लोकप्रतिनिधींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ‘भाषण ज्या पद्धतीने संपादित केले, ते पाहता त्यातून हिंसक कृतीला चिथावणी दिली गेली, हे आम्ही मान्य करतो.‘बीबीसी’शी ट्रम्प यांनी संवाद साधला असून, त्याला प्रतिसाद कसा द्यायचा, याचा विचार सुरू आहे.’

‘ट्रम्प : अ सेकंड चान्स’ या नावाची डॉक्युमेंटरी अमेरिकेच्या २०२४च्या निवडणुकीपूर्वी प्रसारित करण्यात आली. ट्रम्प यांच्या भाषणातील तीन संदर्भ त्यांनी त्यात नमूद केले होते. भाषणातील दोन वेगवेगळ्या वेळी उद्धृत केलेले मुद्दे ‘बीबीसी’ने जोडले होते. त्यात ट्रम्प समर्थकांना जोरदार लढा देण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. ट्रम्प यांनी शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करा, हा भाग त्यातून वगळला आहे.

कायदेशीर कारवाईचा इशारा

दरम्यान, ‘बीबीसी’ने सांगितले, की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण संपादित करण्यावरून ‘बीबीसी’ला पत्र लिहिले असून, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.