Bengaluru : देशभरात दररोज अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या संदर्भातील घटना समोर येतात. संपत्तीचा वाद किंवा घरगुती हिंसाचार किंवा लिव्ह इन रिलेशनशीपमधून थेट खून झाल्याच्याही काही घटना घडतात. आता अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. एका ३५ वर्षीय महिलेला तिच्या लिव्ह-इन पार्टनरने जिवंत जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

बंगळुरूमधील एका ३५ वर्षीय महिलेला तिच्या लिव्ह-इन पार्टनरने जिवंत जाळलं आहे. वनजाक्षी असं पीडितेचं असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठल हा कॅब ड्रायव्हर आहे आणि त्याला दारूचं व्यसन आहे. तसेच त्याच यापूर्वी तीन वेळा लग्न झालेलं आहे. हे दोघेही सुमारे चार वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, आरोपीच्या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी पीडित महिला त्याच्यापासून वेगळी झाली होती.

दरम्यान, आरोपीने पीडितेचा कारने पाठलाग केला असता एका सिग्नलवर गाडी थांबवली आणि पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेसह गाडीतील लोक खाली उतरले. यावेळी पीडित महिला त्या ठिकाणाहून निघून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि लाईटरने तिला पेटवून दिलं. यामध्ये ती महिला तब्बल ६० टक्के भाजली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटलं की, “हे संपूर्ण प्रकरण वैवाहिक जीवनात झालेल्या वादातून घडलेलं आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. तसेच तिच्या बचावासाठी मदत केलेल्या व्यक्तींचे देखील आम्ही मनापासून कौतुक करतो. तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करूनही महिलेचा मृत्यू झाला. या घृणास्पद गुन्ह्यात आरोपीवर कठोर कारवाई होईल.”