Social Media Post Against CJI Bhushan Gavai: भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संबंध भारतात खळबळ उडाली. या घटनेनंतर सरन्यायाधीश बीआर गवई यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. मात्र बंगळुरूमध्ये राकेश किशोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर काही जणांनी सोशल मीडियावर सरन्यायाधीश गवई यांच्याबद्दल अपमानास्पद मजकूर पोस्ट केला होता. याबद्दल आता बंगळुरू सायबर क्राइम पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बंगळुरू सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केसरी नंदन, श्रीधरकुमार, नागेंद्र प्रसाद, रमेश नाईक आणि मनुनाथ मंजूर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५२ अंतर्गत शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

गोडसेचा उल्लेख करत हिंसाचाराचे संकेत

पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलला फेसबुकवरील कमेंट्स आढळल्यानंतर त्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. एका अकाऊंटवरून कन्नड भाषेत पोस्ट करण्यात आली होती. ज्यात नथुराम गोडसेचा उल्लेख करत हिंसाचाराचे संकेत देण्यात आले होते. तर इतरांनी सरन्यायाधीशांवर वैयक्तिक हल्ले केले होते. तसेच त्यांना अपशब्दही वापरण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…” (छायाचित्र लोकसत्ता टीम)

६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला. ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांच्याविरुद्ध विधानसभा पोलीस ठाण्यात बुधवारी शून्य एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी सदर कारवाई केली. विशेष म्हणजे सरन्यायाधीश गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार-जनरलला गुन्हा दाखल न करण्याचे निर्देश दिल्यानंतर राकेश किशोर यांना पोलिसांनी त्याच दिवशी सोडून दिले.

राकेश किशोर यांची प्रतिक्रिया

दरम्यान, वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या त्यांच्या कृतीचे समर्थन केले आणि मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जिर्णोद्धार करण्याच्या मागणीच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या टिप्पणीमुळे ते दुखावले असल्याचे म्हटले.

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर केलेल्या हल्ल्याबाबत बोलताना वकील राकेश किशोर यांनी त्यांना या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नसल्याचे म्हटले आहे. “हे मी केले नाही, हे देवाने केले आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी सनातन धर्माची थट्टा केली. हा देवाचा आदेश होता, कृतीची प्रतिक्रिया होती”, असे ते म्हणाले.