Israel-Iran Conflict Latest News : इस्त्रायलने इराणावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा फोन आल्याची माहिती दिली आहे. नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांना या फोन कॉलमधून त्या प्रदेशातील परिस्थितीची माहिती दिली.

प्रंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. “इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा फोन आला. त्यांनी मला विकसीत होत असलेल्या परिस्थितीची माहिती दिलीय मी भारताला असलेल्या चिंता व्यक्त केल्या आणि या प्रदेशात लवकर शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

शुक्रवारी पहाटे इस्त्रायलने तेहराणमधील काही ठिकाणांना लक्ष्य करत लष्करी कारवाई केली आहे. या कारवाईत इराणच्या न्युक्लिअर आणि लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. इराणच्या राजधानीत मोठे स्फोट झाल्याचे ऐकायला मिळाले, ज्यामुळे सर्वत्र भीतीची लाट पसरली होती. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव चांगलाच वाढला आहे.

बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला आहे की इस्त्रायलने इराणच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र प्रोग्राम वर हल्ला केला आहे. यानंतर इराणमध्ये एअरस्पेस बंद करण्यात आला. तसेच सरकारने देशात आपत्काल जाहीर केला आहे. दरम्यान या हल्ल्यात इराण सरकारचे मोठे नुकासान झाले असल्याचे सांगितले जात आहे. या वाढलेल्या तणावादरमयान इराण आणि इस्त्रायल येथील भारतीय दुतावासांनी देशातील आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये आवश्यक नसल्यास येथे प्रवास करू नये असे सांगण्यात आले आहे.

ऑपरेशन रायझिंग लायन

इस्रायलने १३ जूनच्या पहाटे केलेल्या हल्ल्यात इराणच्या लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना ठार केले. इराणवर हल्ला करण्याची योजना इस्रायल अनेक महिने आखत होता. पण अमेरिकेची इराणशी चर्चा सुरू असल्यामुळे असेल किंवा हेजबोला व हमासचा निःपात करण्यास इस्रायलने प्राधान्य दिल्यामुळे असेल हा हल्ला लांबला. दरम्यान या मोहिमेस इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव दिले.

इराणची राजधानी तेहरानच्या आसपासचे सहा लष्करी तळ, लष्करी कमांडरांसाठी असलेली दोन निवासी संकुले, ताब्रिझ आणि नान्ताझ येथील युरेनियम समृद्धीकरण आणि संशोधन केंद्रे यांवर १३ जूनच्या पहाटे तीन ते साडेचार या काळात सहा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांची पुष्टी इराणकडून झाली.

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सकाळी व्हिडियो संदेशाद्वारे इस्रायली नागरिकांना या हल्ल्यांची माहिती दिली. तेहरान शहरात ठिकठिकाणी हल्ले झाल्यामुळे इराणी नेतृत्वाला आणि नागरिकांना मोठा धक्का बसला. लष्करी नियंत्रण कक्ष, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र केंद्रे, हवाई बचाव प्रणाली यांनाही लक्ष्य करण्यात आले. नान्ताझ येथील युरेनियम समृद्धीकरण केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात किरणोत्सर्ग झाला का, याची चौकशी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेने इराण सरकारच्या सहकाऱ्याने सुरू केली आहे.